निष्क्रियतेचा डावा यु-टर्न

    05-Nov-2024   
Total Views |

Left U-turn
 
केरळमधील मंत्री चक्क ‘यू-टर्न’ आणि ‘स्पीड बंप’चे उद्घाटन करत आहेत. यावरून केरळमधील विकास प्रकल्पांच्या दयनीय अवस्थेचा अंदाज लावला जाऊ शकतो. केरळचा एक राज्यमंत्री थेट ‘यू-टर्न’चे उद्घाटन करण्यासाठी येतो, यावरून आता तेथील मंत्र्यांना करण्यासारखे काहीच उरलेले नाहीये. केरळ सरकारसाठी आता फक्त ‘यू-टर्न’ आणि ‘स्पीड ब्रेकर’चे उद्घाटन इतकाच कार्यक्रम बाकी आहे. त्यामुळे ‘इंडी’ आघाडी नुसती ‘बोलाची कढी आणि बोलाचा भात’ असून, हा तर निष्क्रियतेचा डावा ‘यु-टर्न’च!
 
इकडे महाविकास आघाडी महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला जाण्यावरून आकांडतांडव करत असते. मात्र, खरी परिस्थिती माहीत असूनही त्यांच्याकडून हे आकांडतांडव केले जाते, हे आता जगजाहीर. थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्राने पुन्हा गरूडभरारी घेतली असून, देशातील एकूण गुंतवणुकीच्या ५२.४६ टक्के परकीय गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात झाली आहे. २०२०-२१ दरम्यान, १ लाख, १४ हजार, ९६४ कोटी, २०२१-२२ मध्ये १ लाख, २२ हजार, ४२२ कोटी, २०२२-२३ मध्ये १ लाख, २५ हजार, १०१ कोटी आणि २०२३-२४ च्या पहिल्या तिमाहीपर्यंत ७० हजार, ७९५ कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात झाली. मात्र, गोंधळलेल्या महाविकास आघाडीला हे कधीच जाणून घ्यायचे नसते. उलट तिकडे कर्नाटकात ‘गृहलक्ष्मी योजना’, तेलंगणमध्ये ‘महालक्ष्मी योजना’ आणि हिमाचल प्रदेशमध्येही १ हजार, ५०० रूपये दर महिन्याला देण्याच्या आश्वासनाला काँग्रेस सरकारने पद्धतशीर चुना लावला. दुसरीकडे गोवा, मध्य प्रदेश, ओडिशा आणि छत्तीसगढमध्ये मात्र भाजप सरकारकडून दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली जात आहे. लोकसभा निवडणुकीला ‘इंडी’ नामक आघाडीचा तर कधीच बट्ट्याबोळ झालेला आहे. असे असताना तिकडे केरळमध्ये मात्र उद्घाटनासाठी एकही प्रकल्प शिल्लक नसल्याचेच दिसून येत आहे. कारण, केरळचे मंत्री पी. राजीव यांनी कोचीमधील चक्क एका रस्त्यावरील ‘यु-टर्न’चे उद्घाटन केले आहे. या संदर्भातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मंत्री महाशयांनी अनोख्या पद्धतीने पारंपरिक फित कापण्याऐवजी वॉर्निंग टेप कापून उद्घाटन केले. डावे आणि काँग्रेसशासित केरळमध्ये उद्योगधंदे बंद पडत आहेत आणि नवीन प्रकल्पांचे उद्घाटन होत नाही. त्यामुळे आता केरळमधील मंत्री चक्क ‘यू-टर्न’ आणि ‘स्पीड बंप’चे उद्घाटन करत आहेत. यावरून केरळमधील विकास प्रकल्पांच्या दयनीय अवस्थेचा अंदाज लावला जाऊ शकतो. केरळचा एक राज्यमंत्री थेट ‘यू-टर्न’चे उद्घाटन करण्यासाठी येतो, यावरून आता तेथील मंत्र्यांना करण्यासारखे काहीच उरलेले नाहीये. केरळ सरकारसाठी आता फक्त ‘यू-टर्न’ आणि ‘स्पीड ब्रेकर’चे उद्घाटन इतकाच कार्यक्रम बाकी आहे. त्यामुळे ‘इंडी’ आघाडी नुसती ‘बोलाची कढी आणि बोलाचा भात’ असून, हा तर निष्क्रियतेचा डावा ‘यु-टर्न’च!
‘सतेज’ नेत्याची, निस्तेज कृती
 
राज्यामध्ये काँग्रेस आणि आघाडी कितीही सत्तेत येण्याच्या गमजा मारत असली तरीही काँग्रेसने ‘आहे ते टिकवले तरी मिळवले’ अशी सध्याची परिस्थिती. इथे महापुरूषांचा मान-सन्मान काँग्रेसला करता येत नाही, तिथे स्त्रियांचा मान-सन्मान ही काँग्रेससाठी म्हणा फार दूरची गोष्ट. दि. ४ नोव्हेंबर हा महाराष्ट्र विधानसभेसाठी अर्ज माघारी घेण्याचा अखेरचा दिवस होता. या दिवशी महायुतीने बर्‍यापैकी आपल्या बंडखोरांना शांत करण्यात यश मिळवले. मात्र, माघारीच्या दिवशी मविआचे तीनतेरा वाजले. बंडखोर उमेदवारांबाबत घेतलेल्या पत्रकार परिषदेत फक्त शरद पवार, उद्धव ठाकरे आणि संजय राऊतच उपस्थित होते. जागावाटपासारखेच इथेही काँग्रेसला सामावून घेतले गेले नाही. त्यामुळे काँग्रेस महाविकास आघाडीत कितीही ‘मोठा भाऊ’ म्हणून मिरवत असला, तरी प्रत्यक्षात मात्र चित्र फार वेगळे आहे. त्यात काँग्रेसचे आपआपसातच बिनसले आहे. अधिकृतरित्या जाहीर केलेले उमेदवारही काँग्रेसची उमेदवारी नाकारत असून, कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून तर चक्क काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या जागेवरच काँग्रेसचा ‘पंजा’ गायब होण्याची नामुष्की ओढवली आहे. नंतर आता काँग्रेसने अपक्ष उमेदवार राजेश लाटकर यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे, ज्यांना आधी उमेदवारी देऊन ती पुन्हा रद्द करण्यात आली होती. दरम्यान, मधुरिमाराजे यांनी आपली काँग्रेसची उमेदवारी मागे घेताना मोठा गोंधळ पाहायला मिळाला. मधुरिमाराजे यांनी केवळ उमेदवारी अर्ज मागे घेतला म्हणून काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी ‘दम नाहीतर कशाला अर्ज भरला’ अशा शब्दांत संताप व्यक्त केला. छत्रपती घराण्याच्या सुनेवर अशाप्रकारे अतिशय खालच्या शब्दांत सतेज पाटील यांनी टीका केली. कोल्हापूरच्या पवित्र भूमीत खा. शाहू महाराज आणि थेट गादीचा अपमान करण्यापर्यंत सतेज पाटलांची मजल गेली. यामुळे काँग्रेसची नीच मानसिकता पुन्हा एकदा उघड झाली. दुसरीकडे भाजपने संभाजीराजे छत्रपती यांना राज्यसभेवर २०१६ ते २०२२ दरम्यान खासदारकीचा मान दिला. मात्र, पुढे विरोधात जाऊनही भाजपने कोल्हापूरच्या गादीचा नेहमीच सन्मानच केला. मात्र, इकडे सतेज पाटलांसारखे काँग्रेसी नेते छत्रपती घराण्याच्या सुनेचा अपमान करायलाही मागेपुढे पाहत नाही, यातच सर्वकाही आले.

पवन बोरस्ते

सध्या दै. मुंबई तरुण भारत वृत्तपत्रामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. मागील नऊ वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय. स्वा. सावरकरांच्या जन्मभूमीत वास्तव्य. पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. राजकारण, मराठी साहित्य आणि जनसंपर्क वृद्धीत विशेष रुची.