कल्याण : तुमच्या आघाडी सरकारने अडीच वर्षांत काय केले? आणि महायुती सरकारने दोन वर्षांत काय केले हे होऊन जाऊ द्या दूध का दूध पानी का पानी, आम्ही हिशोब द्यायला तयार असून तुम्ही काय केले ते सांगा अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीला खुले आव्हान दिले. निमित्त होते ते कल्याण पश्चिमेतील महायुतीचे उमेदवार विश्वनाथ भोईर यांच्या मध्यवर्ती निवडणूक प्रचार कार्यालय उद्घाटन सोहळ्याचे.
शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, रिपाई महायुतीचे सर्व प्रमुख नेते, शेकडो समर्थक आणि हजारो लाडक्या बहिणींच्या भरगच्च उपस्थितीत विश्वनाथ भोईर यांच्या निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शासकीय योजनांवरून विरोधकांचा खरपूस समाचार घेतला.
आमचे सरकार हे देना बँक आहे लेना बँक नाही. हे तुमच्या खात्यामध्ये 5 हफ्ते भरणारे सरकार आहे. पूर्वीचे सरकार हे हफ्ते घेणारे होते. त्यामुळेच त्यांचे मंत्री, अधिकारी जेलमध्ये गेले. पण आमचे सरकार हे तुमच्या खात्यामध्ये हफ्ते भरणारे सरकार असल्याचे त्यांनी सांगितले.
तर हे सामान्यांचे, गोरगरीबांचे सरकार असून आम्ही सुरू केलेल्या लाडकी बहीण, लेक लाडकी, वयोश्री, लाडका भाऊ, शेतकरी अशा 11 योजना आम्ही सुरू केल्या. या सर्व योजनांची आम्ही चौकशी करून दोषींना जेलमध्ये टाकणार असल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे. त्यामुळे तुमचे तुमचे दृष्ट आणि सावत्र भाऊ तुमच्या विरोधामध्ये आले तर त्यांना त्यांची जागा दाखवा असे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगत निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केले.
या उद्घाटन सोहळ्याला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, भाजपचे आमदार कुमार आयलानी, राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, कोळी महासंघाचे आमदार रमेश पाटील, शिवसेना उपनेत्या विजया पोटे, ठाणे ग्रामीणचे जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, जिल्हाप्रमुख अरविंद मोरे, रिपाईचे ज्येष्ठ नेते अण्णा रोकडे, जिल्हाध्यक्ष प्रल्हाद जाधव, शिवसेना शहरप्रमूख रवी पाटील, श्रेयस समेळ, भाजप ज्येष्ठ पदाधिकारी डॉ. चंद्रशेखर तांबडे, शिवसेना विधानसभा संघटक मयूर पाटील, माजी नगरसेवक माजी नगरसेवक जयवंत भोईर, प्रभूनाथ भोईर, वैशाली भोईर, दुर्योधन पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस सुभाष गायकवाड यांच्यासह महायुतीतील घटक पक्षांचे सर्व प्रमुख नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.