वॉशिंग्टन : अमेरिकेत ( America) राष्ट्राध्यक्ष पदाची दि. ५ नोव्हेंबर रोजी निवडणूक होत आहे. डेमोक्रेटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस आणि माजी राष्ट्राध्यक्ष रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यात अनेक ठिकाणी चुरशीची लढत अपेक्षित आहे. त्यामुळे अमेरिकेच्या या निवडणुकीत कोणाला आघाडी मिळणार, याबाबतची उत्कंठा वाढीस लागली आहे. निवडणुकप्रचार संपण्यापूर्वी दोन्ही उमेदवारांनी प्रचारासाठी झोकून दिले. त्यामुळे निवडणुकीत चुरस आणखी वाढली आहे.
“आम्ही जिंकणारच. आमच्या विजयाने अमेरिकेच्या राजकारणात नवे पर्व सुरू होईल,” असा विश्वास कमला हॅरिस यांनी व्यक्त केला, तर, “अमेरिकेतच नाही, तर जगभरात शांतता प्रस्थापित करण्यासाठी आपल्याला व्हाईट हाऊसमध्ये पाठवावे,” असे आवाहन ट्रम्प यांनी केले. तसेच, “कमला हॅरिस डाव्या विचारसरणीच्या आणि कट्टरतावादी आहेत,” असा आरोप ट्रम्प यांनी केला.