अमेरिकेतील भारतीय मतदारांचा कौल कुणाला?

    04-Nov-2024
Total Views |

us
 
अमेरिकेतील सार्वत्रिक निवडणुकीचे मतदान उद्या, दि. ५ नोव्हेंबर रोजी पार पडणार असून, प्रत्येक उमेदवार मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी प्रयत्नरत आहे. यावेळी प्रत्येक मतदाराचे मत दोघांसाठीही आवश्यक ठरणार आहे. अमेरिकेत भारतीय मतदारही बहुसंख्य आहेत. अमेरिकेतील भारतीय मतदारांच्या सामर्थ्याचा घेतलेला हा आढावा...
 
अमेरिकेतील भारतीय, निरनिराळ्या राज्यात कसे विखुरलेले आहेत, राज्यागणिक त्यांची संख्या तसेच, राज्यातील एकूण लोकसंख्येशी या संख्येचे टक्केवारीने प्रमाण किती आहे, याबाबत अगदी ढोबळमानाने विचारात घेतलेले हे आकडे, निदान तुलनात्मक अभ्यासासाठी पुरेसे मानायला हरकत नसावी.
 
१) भारतीयांची ०.५ लक्ष किंवा त्यापेक्षा जास्त लोकसंख्या (लाखात) असलेली राज्ये आणि त्यांची राज्यातील एकूण संख्येशी असलेली टक्केवारी अशी आहे.
 
१) कॅलिफोर्निया - पाच लाख (१.४ टक्के), २) न्यूयॉर्क - तीन लाख(१.६ टक्के), ३) न्यू जर्सी - तीन लाख (३.३ टक्के), ४) टेक्सास- २.५ लाख (१ टक्के), ५) इलिओनॉईस - दोन लाख (१.५ टक्के), ६) फ्लोरिडा - १.३ लाख(०.७ टक्के), ७) व्हर्जिनिया - एक लाख (१.३ टक्के), ८) पेन्सिलव्हॅनिया - एक लाख (०.८ टक्के), ९) जॉर्जिया - एक लाख (एक टक्के), १०) मेरी लॅण्ड - ०.८ लाख (१.४ टक्के), ११) मॅसॅच्युसेट्स - ०.८ लाख (१.२ टक्के), १२) मिशिगन - ०.८ लाख (०.८ टक्के), १३) ओहायहो - ०.६ लाख (०.६ टक्के), १४) वॉशिंग्टन - ०.६ लाख (०.९ टक्के), १५) नॉर्थ कॅरोलना - ०.६ लाख (०.६ टक्के), १६) कनेक्टिकट - ०.५ लाख (१.३ टक्के);
२) भारतीयांची लोकसंख्या ०.५ लाखापेक्षाही कमी (हजारात) पण, टक्केवारी मात्र ०.५ टक्क्यांपेक्षा जास्त असलेली राज्ये
अ) रिझोना - ३६ हजार (०.६ टक्के), ब) मिनेसोटा - ३३ हजार (०.५ टक्के), क) डेलावेअर - ११ हजार (१.३ टक्के), ड) नॉर्थ हॅम्पशायर - आठ हजार (०.६ टक्के), इ) वॉशिंग्टन (डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबिया) - पाच हजार (०.९ टक्के), फ) कॅनसस - १४ हजार (०.५ टक्के)
 
ट्रम्प प्रशासनानेही भारतातील अंतर्गत प्रश्नांबाबत, कधीही भारताविरोधात भूमिका घेतलेली नव्हती. यात जसे काश्मीर आले, तसेच अरुणाचलही आले आहे. जागतिक व्यासपीठावर भारताचे स्थान कसे उंचावेल, व्यक्त होण्याची संधी भारताला कशी मिळेल, यासाठी ट्रम्प यांचा प्रयत्न असतो. याउलट डेमोक्रॅट पक्षाचे सर्व अध्यक्ष यात खुद्द बायडनही येतात, (अपवाद जॉन एफ केनेडी) सर्व दोष भारताच्याच माथी मारून, उपदेशाचे डोस देत आले आहेत. अध्यक्षपदाच्या मुस्लीमधार्जिण्या असा आरोप असलेल्या, सुविद्य उमेदवार व कायदेपंडित कमला हॅरिस, स्वत:ची ओळख आफ्रिकन - अमेरिकन अशी पूर्वी करून देत असत. आता मात्र त्यांना आपला भारतीय वारसा आठवतोय. बहुदा यामुळेच कमला हॅरिस यांची भारतीय - अमेरिकनांवर फारशी पकड असल्याचे दिसत नाही. आजवर तसा त्यांनी कधी प्रयत्नही केलेला नाही. उलट त्या सातत्याने आपल्या आफ्रिकन वारशावर भर देत, भारत आणि भारतीयांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांबाबत विरोधी भूमिकाच घेत आल्या आहेत. याचे एक कारण असे असेल, की अमेरिकेत आफ्रिकनांची संख्या १५ टक्क्यांच्या वर आहे, तर अमेरिकेच्या कोणत्याही राज्यात एखादा अपवाद वगळता भारतीय १.५ टक्क्यांपेक्षा जास्त नाहीत.
 
भारतीय - अमेरिकन नागरिकांचा कुणीना कुणी नातेवाईक भारतात असतोच. अमेरिकेने भारताला सन्मानाने वागवावे, तसेच चीनच्या बाबतीत अमेरिकेने भारताला साथ द्यावी, अशी भारतीयांची अपेक्षा असते. ही साथ ट्रम्प व रिपब्लिकन पक्षच देईल, असा त्यांचा विश्वास आहे. हा संदेश हे नातेवाईक आपल्या अमेरिकेतील बांधवांना नेमकेपणाने पोचवत असतात.
 
महत्त्वाची राज्ये व भारतीयांची संख्या
 
मिशिगन, पेन्सिलव्हॅनिया, जॉर्जिया, नॉर्थ कॅरोलिना, व्हर्जिनिया, टेक्सास या राज्यातून, एकूण ५३८ इलेक्टर्सपैकी ११८ इलेक्टर्स निवडले जातात. या राज्यात एकूण पाच लक्षाहून अधिक अमेरिकन - भारतीय मतदार आहेत. त्यामुळे ११८ इलेक्टर्सच्या निवडीवर या मतदारांचा प्रभाव पडू शकेल, असे म्हटले जाते.
 
अमेरिकन लोकसंख्येचे वंशश: विभाजन असे आहे. गोरे ७७.३ टक्के आहेत. पण, यापैकी २३.८ टक्के गोरे डोनाल्ड ट्रम्प यांचे विरोधक आहेत. यात प्रामुख्याने क्युबन, मेक्सिकन, दक्षिण किंवा मध्य अमेरिकन लोकांचा समावेश असतो. पण, उरलेल्या ५३.५ टक्के गोर्‍यांपैकी , बहुसंख्य अमेरिकन गोर्‍यांचा डोनाल्ड ट्रम्प यांना फार मोठ्या प्रमाणात पाठिंबा आहे. काळ्यांची टक्केवारी १६.९ टक्के आहे. हे डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधातच मतदान करणार हे सांगायला नको. अमेरिकन - भारतीय टक्केवारी पूर्ण देशाचा विचार करता, एक टक्क्यांपेक्षाही कमी आहे. पण, यातील बहुसंख्य भारतीय मतदार डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांवर खूश असलेले आहेत. एच१बी व्हिसाबाबतचे ट्रम्प प्रशासनाचे धोरण तिथे स्थायिक झालेल्या भारतीयांनाही आवडत नसले, तरी या धोरणाचा अमेरिकेत नोकरीसाठी येऊ इच्छिणार्‍यांना, ग्रीन कार्ड मिळवू इच्छिणार्‍यांना जसा त्रास होतो, तसा तो अमेरिकेत स्थायिक होऊन नागरिकत्व आणि मताधिकार मिळालेल्या भारतीयांना होत नाही, हेही लक्षात घेतले पाहिजे. एकेकाळी हे डेमोक्रॅट पक्षाला एक गठ्ठा मतदान करीत असत. पण, मोदींचा भारतातील उदय, त्यांची धोरणे व अमेरिकेतील विद्यमान शासन आणि प्रशासनव्यवस्थेशी भारताचे असलेले सलोख्याचे संबंध, यामुळे भारतीय मतदार फार मोठ्या प्रमाणावर रिपब्लिकन पक्षाकडे वळले आहेत. खलिस्तान समर्थकांबाबतची बायडन व हॅरिस प्रशासनाचे धोरण तेथील, भारतीयांना आवडलेले नाही. यामुळेही देशभरातल्या प्रत्येक राज्यात, डोनाल्ड ट्रम्प यांची मते काहीना काही प्रमाणात वाढणार आहेत आणि तेवढ्यानेच डेमोक्रॅट पक्षाची मते कमी होणार आहेत.
 
मुळात अमेरिकेतील भारतीय समाज डेमोक्रॅट पक्षाला अनुकूल राहिलेला होता व आहे. मोदींच्या दमदार व धाडसी पुढाकारामुळे, भारतात होत असलेल्या, परिवर्तनाने अमेरिकन-भारतीय अतिशय प्रभावित झाले आहेत. काश्मीरला भारतापासून वेगळे ठेवणारे ३७० कलम कधी दूर होऊ शकेल, ही आशा अमेरिकन - भारतीयांनी केव्हाच सोडून दिली होती. नागरिकत्व सुधारणा कायद्याबद्दल तर त्यांच्या मनात विचारही येण्याची शक्यता नव्हती. पुढची चार वर्षे अमेरिकेत ट्रम्प आणि भारतात मोदी ही जोडी, दोन्ही देशांना प्रगतीच्या एका नवीन उंचीवर घेऊन जाईल, असे वाटणार्‍यांची संख्या अमेरिकेत वाढलेली दिसते आहे.
 
मतदारनोंदणी आणि मतदान या दोन्ही बाबतीत अमेरिकन - भारतीय मतदार, जागरूक असल्याचे आढळून आले आहे. २०१६ व २०२० सालामध्ये त्यांची मतदान करण्याची टक्केवारी अनुक्रमे ६२ टक्के व ७१ टक्क्यांच्या जवळपास, म्हणजे अमेरिकेच्या राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त होती. २०२४ सालामध्ये ही टक्केवारी आणखी वाढते किंवा कसे, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. तशी ती वाढल्यास रिपब्लिकन पक्षाचे पारडेच जड होण्याची शक्यता आहे.
 
२०२० सालच्या अध्यक्षीय निवडणुकीत, अंदाजे २४० दशलक्ष लोक मतदान करण्यास पात्र होते आणि त्यापैकी अंदाजे ६६.१ टक्के लोकांनी मतपत्रिका सादर केल्या. एकूण १५ कोटी ८४ लाख २७ हजार ९८६ मते, अंदाजे ८१ दशलक्ष पात्र मतदारांनी मतदान केले नाही.
 
अमेरिकेतील भारतीय मतदारांपैकी, ९६ टक्के मतदार या निवडणुकीत मतदानात सहभागी होतील. ६० टक्के भारतीय अमेरिकन मतदार, केंद्रावर स्वत: जाऊन मतदान करतात. तर २५ टक्के ई-मेल करून मतदार करतात, तर ९ टक्के निवडणूक कार्यालयात जाऊन मतदान करतात.
 
या वर्षी ५५ टक्के भारतीय अमेरिकन मतदारांनी आपला कल डेमोक्रॅट पक्षाकडे आहे. असे नोंदणीचे वेळीच जाहीर केले आहे. (अमेरिकेत अशी तरतूद आहे) २०२० सालामध्ये ही टक्केवारी ५९ टक्के इतकी होती.
 
यावर्षी २६ टक्के भारतीय अमेरिकन मतदारांनी आपला कल डेमोक्रॅट पक्षाकडे आहे, असे नोंदणीचे वेळीच जाहीर केले आहे. २०२० सालामध्ये ही टक्केवारी २१ टक्के इतकी होती.
 
यावर्षी २५ टक्के भारतीय अमेरिकन मतदारांनी आपला कल जाहीर केलेला नाही. २०२० सालामध्ये ही टक्केवारी २८ टक्के इतकी होती.
वसंत काणे