प्रियांकांना तरी जमणार का ?

    04-Nov-2024   
Total Views |
 
Priyanka Gandhi-Vadra
 
प्रियांका गांधी-वाड्रा खासदार झाल्यास त्यांच्यापुढे आव्हानांचा मोठा डोंगर उभा असणार आहे. सध्या तरी ९९ खासदारांच्या बळावर काँग्रेस फार मोठी क्रांती घडविण्याचा आव आणत आहे. मात्र, प्रत्यक्षात तसे नाही, हे हरियाणाच्या पराभवानंतर काँग्रेसचे मोठमोठे नेते ज्या पद्धतीने हवालदिल झाले होते, त्यातून दिसून आले आहे. आतादेखील झारखंड आणि महाराष्ट्राची निवडणूक होऊ घातली आहे. एकूणच प्रियांका गांधी-वाड्रा यांना संसदेत अभ्यास करून जावे लागण्याचे शिवधनुष्य पेलावे लागणार आहे.
 
काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी-वाड्रा अखेर वायनाड या केरळमधील सोप्या मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. आपल्या भावाचा असलेला हा मतदारसंघ आपल्यालाही निवडून देईल, असा विश्वास असल्याने त्यांनी या मतदारसंघाची निवड केल्याचे दिसते. त्याचप्रमाणे राहुल गांधी अमेठीतून म्हणजे उत्तर भारतातून आणि प्रियांका गांधी-वाड्रा या वायनाड म्हणजे दक्षिण भारतातून निवडून लोकसभेत जाणे, यातून काँग्रेसला त्यांचे उत्तर-दक्षिण समीकरण साधायचे असल्याचे दिसते. प्रियांका गांधी -वाड्रा या लोकसभेमध्ये गेल्यास काँग्रेस पक्षावर पुन्हा एकदा गांधी कुटुंबाचेच वर्चस्व प्रस्थापित होणार असल्याचे दिसते. सध्या राहुल गांधी हे लोकसभेतील विरोधी पक्षनेते आहेत, तर मल्लिकार्जुन खर्गे हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. मात्र, जर प्रियांकादेखील लोकसभेत आल्या, तर कदाचित खर्गे यांचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांना रितसर निवृत्त करून त्याजागी प्रियांका यांची वर्णी लागणारच नाही, याची शाश्वती देता येणार नाही. मात्र, भविष्यात तसे झाल्यास काँग्रेसमध्ये पुन्हा बदल होण्याची सुतराम शक्यता नाही. यंदा मिळालेल्या ९९ जागा या अपघाती असल्याचे हरियाणा आणि जम्मू - काश्मीर विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसची कामगिरी पाहून एव्हाना स्पष्ट झाले आहे. लोकसभा निवडणुकीप्रमाणेच हरियाणातही राहुल गांधी यांनी ‘भाजप संविधान बदलणार’ वगैरे अपप्रचार केला होता. मात्र, भाजपच्या योगी आदित्यनाथ यांच्या ‘बटेंगे तो कटेंगे’ या एका वाक्याने राहुल गांधींचा अख्खा अजेंडाच धुतला गेला होता. त्यामुळे आता हा अजेंडा आणि नेता नेहमीच चालणारा नसल्याचे काँग्रेसजनांच्या लक्षात आले असावे, त्यामुळे आता प्रियांका गांधी-वाड्रा यांच्या रुपात नवा तारणहार निर्माण करण्याचे काँग्रेसचे प्रयत्न दिसत आहेत.
 
प्रियांका गांधी या इंदिरा गांधींचे प्रतिबिंब आहेत आणि त्या एक करिष्माई नेत्या असल्याचे काँग्रेसला वाटत होते आणि अद्याप वाटते. काँग्रेसमधील गांधी परिवार त्यांना नेहमीच ‘ट्रम्प कार्ड’ मानत आला आहे. तसेच प्रियांका गांधी-वाड्रा जेव्हा-जेव्हा राजकारणात येतात, तेव्हा काँग्रेसला त्याचा खूप फायदा होऊ शकतो आणि मोठा बदल होऊ शकतो, असेही त्यांचे मत आहे. त्यासाठीच प्रियांका गांधी-वाड्रा यांना एवढी वर्षे राजकारणापासून दूर ठेवल्याचे जाणकार सांगतात. मात्र, त्यांची पहिली कसोटी उत्तर प्रदेशात होती. मात्र, त्यात त्या सपशेल अपयशी ठरल्या होत्या. काँग्रेस हायकमांडने प्रियांका यांना उत्तर प्रदेशातील २०२२ सालच्या विधानसभा निवडणुकीचे प्रभारी बनवले होते. मात्र, निकाल अतिशय निराशाजनक लागला होता. २०१७ सालामधील सहा टक्के मतांची टक्केवारी २०२२ साली दोन टक्क्यांवर घसरली होती. त्याचे प्रमुख कारण होते ते पक्षसंघटनेवर नियंत्रण मिळविण्यास आलेले अपयश. त्यानंतरही तेथेच काम करून पक्षाला मजबूत करण्याऐवजी त्यांनी नंतर उत्तर प्रदेशकडे लक्षही दिले नाही. त्यामुळे उत्तर प्रदेशात आजही विधानसभेमध्ये काँग्रेसला यश मिळण्याची खात्री नाही.
 
हरियाणाच्या निवडणुकीने काँग्रेसला आपल्यावरील संकट अद्याप टळलेले नसल्याची जाणीव झाली आहे. गेल्या सहा वर्षांपासून (दक्षिण भारत आणि हिमाचल प्रदेश वगळता) भाजपविरुद्ध थेट लढत त्यांनी कोणतीही निवडणूक जिंकलेली नाही. त्यामुळे प्रियांका गांधी-वाड्रा यांना पक्षाचे पुनरुज्जीवन करण्याच्या दृष्टीने काही निश्चित प्रभाव पाडायचा असेल, तर त्यांनी संघटनात्मक यंत्रणा मजबूत करण्यावर भर द्यावा लागणार आहे. काँग्रेससाठीची दीर्घकालीन समस्या म्हणजे संस्था-बांधणीत आलेले अपयश. सोनिया गांधी यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीमुळे पक्षामध्ये काही प्रमाणात तशी बांधणी झाली होती. मात्र, पुढे राहुल गांधी संस्थात्मक र्‍हासाची प्रक्रिया थांबवण्यात अपयशी ठरले. राहुल गांधी यांनी नवीन संस्थात्मक बांधणीचा प्रयत्न केला आणि तोही अयशस्वी झाला. युवक काँग्रेस आणि ‘एनएसयुआय’चा कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांनी अनेक नवे नेतेही पुढे आणले होते. मात्र, त्यातील बहुसंख्य नेते आज काँग्रेसमध्ये नाहीत, तर उरलेले नेते ज्येष्ठांच्या वजनांना दबून गेले आहेत. त्यामुळे एकीकडे राहुल गांधी यांनी संसदेत मोदी सरकारचा सामना करणे आणि प्रियांका गांधी-वाड्रा यांनी त्यांना झेपल्यास संघटनाबांधणी करणे, अशा दोन स्तरावर काम करणे अपेक्षित आहे.
 
प्रियांका गांधी-वाड्रा खासदार झाल्यास त्यांच्यापुढे आव्हानांचा मोठा डोंगर उभा असणार आहे. सध्या तरी ९९ खासदारांच्या बळावर काँग्रेस फार मोठी क्रांती घडविण्याचा आव आणत आहे. मात्र, प्रत्यक्षात तसे नाही, हे हरियाणाच्या पराभवानंतर काँग्रेसचे मोठमोठे नेते ज्या पद्धतीने हवालदिल झाले होते, त्यातून दिसून आले आहे. आतादेखील झारखंड आणि महाराष्ट्राची निवडणूक होऊ घातली आहे. महाराष्ट्रात तर भाजपने दोन महिन्यात परिस्थिती यशस्वीपणे बदलली आहे. झारखंडमध्येही घुसखोरीचा मुद्दा भाजपने तापवला आहे. या दोन्ही राज्यांमध्ये भाजपला सत्ता मिळाली अथवा केवळ महाराष्ट्रात जरी सत्ता मिळाली. तरीदेखील ते भाजपची धार वाढविण्यासाठी कारणीभूत ठरणार आहे. कारण, मोदी सरकारने आगामी काळात संसदेत ‘वक्फ’ सुधारणा विधेयकासह एकत्रित निवडणुका, शहरी नक्षलवादविरोधी कायदा आणि समान नागरी कायदा अशी विधेयके आणण्याची तयारी केली आहे. त्यामुळे प्रियांका गांधी-वाड्रा यांना संसदेत अभ्यास करून जावे लागण्याचे शिवधनुष्य पेलावे लागणार आहे.