हिंदू मंदिरावर खलिस्तानी समर्थकांचा हल्ला निषेधार्ह : आलोक कुमार
04-Nov-2024
Total Views |
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Canada Hindu Temple VHP) कॅनडातील हिंदू मंदिरावर खलिस्तानी समर्थकांनी केलेला हल्ला अत्यंत निषेधार्ह असल्याचे विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष आलोक कुमार यांनी सोमवारी म्हटले आहे. भारतीय दूतावासाने मंदिर परिसरात एक शिबिर आयोजित केले होते. दूतावासाने याबाबतची पूर्व कल्पना कॅनडा सरकारला तीन दिवसांपूर्वी दिली होती आणि योग्य सुरक्षेची विनंतीही केली होती. याकडे दुर्लक्ष झाले असून खलिस्तानी समर्थकांनी मंदिर परिसरात हिंदूंवर हल्ला केल्याचे दिसते आहे.
आलोक कुमार यावेळी म्हणाले की, ३१ ऑक्टोबर रोजी दिवाळीच्या निमित्ताने कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी त्यांच्या वक्तव्यात 'इंडो-कॅनडियन कॅनडाचे सर्वोत्तम प्रतिनिधित्व करतात' असे म्हटले होते. पुढे असंही म्हटलं की, हिंदू कॅनेडियन लोकांच्या सुरक्षिततेसाठी आम्ही नेहमीच त्यांच्या पाठीशी उभे राहू जेणेकरून ते मुक्तपणे आणि अभिमानाने त्यांच्या धर्माचे पालन करू शकतील. मात्र या घटनेवरून त्यांची ही घोषणा फोल ठरल्याचे दिसते आहे."
कॅनडातील हिंदू मंदिरांवरील झालेल्या हल्ल्याचा खुलासा करत आलोक कुमार पुढे म्हणाले, कॅनडातील मंदिरावर हल्ल्याची ही पहिली घटना नाही. याआधीही ग्रेटर टोरंटो, ब्रिटिश कोलंबिया आणि ब्रॅम्प्टनमध्ये हिंदू मंदिरांवर हल्ले झाले आहेत. जस्टिन ट्रुडो यांची लोकप्रियता कॅनडामध्ये घसरली आहे. त्यांच्याच खासदारांनी जाहीरपणे त्यांचा राजीनामा मागितला आहे. त्यांची खुर्ची खलिस्तान समर्थक खासदारांवर आहे, त्यामुळे त्यांचा उघड पाठिंबा खलिस्तानींना आहे असे दिसते. त्यांच्या या वृत्तीमुळे भारत आणि कॅनडाचे संबंधही बिघडले आहेत. कॅनडाची लोकशाही, कायद्याचे राज्य आणि धर्मनिरपेक्षता या मूलभूत तत्त्वांचेही उल्लंघन होत आहे. त्यामुळे हिंदू मंदिरावरील हल्ल्याचा आम्ही निषेध करतो.