नवी दिल्ली : पुढील वर्षी होणार्या बिहार विधानसभा निवडणुकीसाठी बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दल युनायटेडचे (जदयु) सर्वेसर्वा नितीश कुमार ( Nitish Kumar ) सज्ज झाले आहेत. ते राज्यातील मतदारांशी थेट संवाद साधण्यासाठी लवकरच राज्यव्यापी यात्रा काढणार आहेत.
नितीश कुमार यांच्या या यात्रेला ‘महिला संवाद यात्रा’ असे नाव देण्याची तयारी सुरू आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने हे महत्त्वाचे ठरते. बिहारच्या महिला मतदारांवर नितीश कुमार यांची नजर असून, या भेटीदरम्यान नितीश महिलांशी संवाद साधणार आहेत. महिलांशी संवाद साधून आगामी निवडणुकीसाठी रणनिती तयार करण्याचा जदयुचा मनसुबा आहे.
मुख्यमंत्र्यांच्या यात्रेदरम्यान राज्यातील विविध जिल्ह्यांची निवड केली जाणार असून, मुख्यमंत्री त्या जिल्ह्यात पोहोचल्यावर त्या जिल्ह्यातील काही ठिकाणांना भेटी देतील. यादरम्यान नितीश कुमार सात निश्चय भाग १, सात निश्चय भाग-२, जल जीवन हरियाली आणि इतर महत्त्वाच्या कार्यक्रमांच्या प्रगतीचा आढावा घेतील. यादरम्यान मुख्यमंत्री जिल्हास्तरीय योजनांची आढावा बैठक घेऊन विकासकामांचे वास्तव जाणून घेणार आहेत. या यात्रेसाठी सर्व जिल्हाधिकार्यांना सूचना पाठविण्यात आल्या असून, त्यांनी स्थळाची निवड योग्य पद्धतीने करावी. दि. १५ ते दि. २५ डिसेंबर रोजी दरम्यान मुख्यमंत्र्यांचा दौरा होऊ शकतो, असे सूत्रांचे म्हणणे आहे.