मुंबई : नवनीत राणांच्या मानलेल्या नणंदबाई म्हणजे काँग्रेस नेत्या आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर ( Yashomati Thakur ). नवनीत राणा कायम आपल्या सभेतून यशोमतीताईंचा नणंदबाई असा उल्लेख करतात. सलग तीन टर्म तिवसा मतदारसंघात वर्चस्व असलेल्या यशोमती ठाकूर यांचा यंदाच्या विधानसभा निवडणूकीत पराभव झाला. त्यांचा हा पराभव चांगलाच चर्चेचा विषय ठरला.
अमरावती लोकसभा मतदारसंघात मोडणाऱ्या तिवसा विधानसभेत २००९ पासून तर २०१९ पर्यंत सलग तीन टर्म काँग्रेसच्या यशोमती ठाकूर आमदार होत्या. यंदाच्या विधानसभा निवडणूकीत यशोमती ठाकूर यांच्यापुढे भाजपच्या राजेश वानखडेंचे आव्हान होते. यशोमतीताई यंदा विजयाचा चौकार मारणार अशा चर्चा सुरु असतानाच राजेश वानखडे यांनी ७ हजार ६१७ मतांनी त्यांचा पराभव केला. खरंतर यशोमती ठाकूर यांच्याकडे काँग्रेसचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून पाहिले जाते. त्यामुळे हा पराभव काँग्रेससाठी मोठं अपयश मानले जाते.
अमरावती लोकसभा मतदारसंघात यशोमती ठाकूर आणि नवनीत राणा कायमच चर्चेत असतात. लोकसभा निवडणूकीच्या वेळीदेखील या दोघींची विशेष चर्चा होती. याचे कारण म्हणजे नवनीत राणांनी भाजपच्या तिकीटावर लोकसभेची निवडणूक लढवली. मात्र, काँग्रेसच्या बळवंत वानखडेंनी त्यांचा पराभव केला. या पराभवात यशोमतीताईंचा मोठा वाटा होता. त्यावेळी निघालेल्या विजयी रॅलीमध्ये यशोमती ठाकूरांनी नवनीत राणांची नक्कल करत त्यांना डिवचले होते आणि त्यांचा हा व्हिडीओ माध्यमांमध्ये बराच व्हायरलही झाला होता.
पण म्हणतात ना प्रत्येकाची वेळ येते. तसेच काहीसे विधानसभेला घडले. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणूकीत भाजपच्या उमेदवाराने यशोमती ठाकूरांचा पराभव केला. त्यानंतर नवनीत राणांनीदेखील आपल्या प्रचार रॅलीमध्ये यशोमतीताईंची नक्कल केली आणि त्यांना जशास तसे प्रत्युत्तर दिले. नवनीत राणांचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच गाजतोय. यशोमतीताईंच्या पराभवामुळे नवनीत राणांनी एकप्रकारे लोकसभेचा बदला घेतल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.
परंतू, सलग तीन टर्म सत्ता गाजवलेल्या यशोमतीताई स्वत:च्याच मतदारसंघात पराभूत होण्याची नेमकी कारणे काय? हे समजून घेऊया. महाविकास आघाडी सरकारच्या काळात यशोमती ठाकूर या अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री होत्या. मात्र, सरकार बदलले आणि त्यांचे मंत्रीपदही गेले. मंत्रीपदाच्या काळात मुंबईत अडकून राहिल्याने स्वत:च्याच मतदारसंघात यशोमतीताईंचे दुर्लक्ष झाले. त्यानंतर आलेल्या महायूतीच्या लाटेत त्यांचा दारूण पराभव झाला.
विधानसभा निवडणूकीच्या प्रचारावेळी नवनीत राणांच्या एका प्रचारसभेत अल्लाहू अकबरचे नारे देण्यात आल्याच्याही बातम्या माध्यमांमध्ये झळकल्या होत्या. १७ नोव्हेंबर रोजी दर्यापूर येथील खल्लार गावात आयोजित त्यांच्या सभेत काही लोकांनी खुर्च्या फेकत राणांना शिवीगाळ केल्याचा आरोप त्यांनी केला होता. शिवाय हे उद्धव ठाकरेंच्या तालुकाध्यक्षांचे गाव असून उद्धव ठाकरे हे आता जनाब उद्धव ठाकरे झाल्याची टीकाही त्यांनी केली होती. या सगळ्यानंतर आता यशोमतीताईंच्या पराभवाने नवनीत राणांनी नणंदबाईंना दिलेले चॅलेंज पूर्ण केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगलीये.