वो सुबह आयेगी?

    30-Nov-2024   
Total Views |
wo subah ayegi


‘पत्थर तो मार रहे थे। जान थोडी न ले रहे थे।’ संभल, उत्तर प्रदेश येथील दंगलीचा आढावा घेण्यासाठी ती पत्रकार गेली असता हिजाबधारी महिलेने तिला हे उत्तर दिले. जामा मशिदीचे सर्वेक्षण करणार्‍या चमुला तिन्ही बाजूंनी घेरून दगडफेक करणे, हे त्या महिलेच्या मते काही गंभीर नव्हते. गुन्हाही नव्हता. ही अशी मानसिकता का बरं असेल? आता कुणी म्हणेल की, हिंदू-मुस्लीम भेद का करता? नक्षली हिंसेमध्येही महिला नक्षली असतातच ना? आहेतच. पण, सध्या केवळ काही मुस्लीम भगिनींच्या संदर्भात आलेल्या अनुभवांचा धांडोळा या लेखात सारांश रूपाने घेतला आहे.

स्त्रीच्या हृदयात अखंड मातृत्व वसते, त्या क्रूर नसतात वगैरे वगैरे असे आपण ठामपणे मानतो. खरे तर ते गृहितकच आहे. ‘पत्थर ही तो मारा। जान थोडी ले रहे थे।’ असे म्हणणार्‍या संभल, उत्तर प्रदेश येथील महिलेची मानसिकता या सगळ्या गृहितकांना छेद देते. संभल दंगलीचे गुन्हेगार म्हणून उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी महिलांनाही अटक केली आहे. काश्मीरमध्ये दगडफेक करणार्‍या जमावामध्ये तोंड लपवलेल्या अनेक महिलाही आपण पाहिल्या आहेत. पुढे सिद्ध झाले की, त्यांना दगडफेकीचे पैसे मिळतात, म्हणून त्या दगडफेक करायच्या. पण, पैसे मिळणार म्हणून दगडफेक करून कायदा-सुव्यवस्था हातात घेणे, हे अतीच होते. या महिलांना काय हवे? मागे पंतप्रधान मोदींच्या पुढाकाराने तिहेरी तलाक विरोधी कायदा संमत झाला. यावर मुस्लीम भगिनींचे म्हणणे काय, हे पाहण्यासाठी मुस्लीम वस्त्यांमध्ये गेले होते. तिहेरी तलाकविरोधी कायद्याबद्दल विचारल्यावर समोर बसलेल्या त्या सगळ्याजणी चवताळून म्हणू लागल्या “शरीयाने हमारे शोहर को हक दिया हैैैं। तीन तलाक का कानून हम मानेंगे तो शरीया कानून की तौहीन (अपमान) होगी। हमे दोजख(नरक) मिलेगा। हम मुस्लीम खवातीनो को अल्ला दोजख फरमाये, इस लिये ये कानून किया हैं। ये काफिरो की चाल हैं।” त्यांचे हे बोलणे ऐकून मला खरच आश्चर्याचा धक्का बसला. पण, नंतर विचार केल्यावर वाटले, त्या अशा म्हणत होत्या कारण, त्यांच्या घरातल्या शौहरनी त्यांना तसे बोलायला सांगितले होते. तसेच बालपणापासून त्यांच्या धर्माचा पगडा त्यांच्यावर होता. त्यापलीकडे काही स्वीकारण्याची मानसिकताच नव्हती. बहुसंख्य नातेवाईकांच्या विरोधात जाणार कसे आणि कुठे? याची भीती या महिलांमध्ये होती.
 
गेल्याच महिन्यात मराठवाड्यात गेले होते. तिथली एक घटना - गावातला आधीच निकाह झालेला आणि मुल असलेला माणूस गावातल्याच एका हिंदू युवतीला घेऊन पळून गेला. त्या मुलीचे नातेवाईक त्याच्या बीबीला भेटले. त्याच्या बीबीने या लोकांना उत्तर दिले, “मेरा शोहर मर्द हैं। दो क्या चार बिबी करे। हमारे में चलता हैं।’ तिच्या नवर्‍याने दुसरी मुलगी पळवून आणली, याचा तिला आनंद, अभिमान होता. अर्थात, वरवर जरी हे असे ती दाखवत असली, तरी ‘सवत माझी लाडकी’ हे केवळ सिनेमात असते. सत्यात नसते. त्यामुळे त्या महिलेलाही वाईट वाटलेच असेल. पण, चार मुले घेऊन परत माहेरी जाणे शक्यच नव्हते. अल्पशिक्षण असल्यामुळे अर्थार्जनाला मर्यादा. कुशीत चार मुले असतातच, त्यांचे कसे होणार ही आई म्हणून काळजी असणारच. त्यामुळे काहीही झाले, तरी शौहरला विरोध करायचा नाही, याच भूमिकेत ती आणि तिच्यासारख्या महिला असाव्यात असे वाटते. ‘पहेले हिजाब बाद में किताब’ म्हणणार्‍याही याच मानसिकतेच्या असतील का?

असो. मातृत्व म्हणजे एका स्त्रीचा पुनर्जन्म. पण, आजही तळागाळातील मुस्लीम महिलांना हा पुनर्जन्म आहे असे वाटते का? अर्थातच वेदना, त्रास त्यांनाही होतोच. पण, वास्तव पाहिले की वाटते, त्या मातृत्व हे धार्मिक मिशनच समजत असाव्यात. संतती जन्माला घालणे हेच आपले कार्य आहे. संतती नाकारण म्हणजे अल्लाचा अपमान आहे, हे या महिलांच्या मनात बालपणापासूनच कोरले गेले आहे. आपल्या मुलामुलींचे संगोपन करण्यातही मुस्लीम म्हणून त्या तसूभरही कमी पडत नाहीत. मुलामुलींने मदरसा, नमाजसंदर्भात काटेकोर राहावे तसेच, त्यांचे खानपान, वेशभूषा, केशभूषा ही मुस्लीम संस्कृतीचीच आजन्म राहील, अशी परिस्थिती वातावरण या महिला निर्माण करतात. पण, गरीब आणि अज्ञानी वगैरे असतात, मजबूर असतात म्हणून त्या अशी भूमिका घेतात म्हणावे, तर तो अनुभव तर लिहायलाच हवा.

2021 साली तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केला. यावर महाराष्ट्रातील उच्चशिक्षित मुस्लीम विद्वान महिला तसेच, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर उच्चपदस्थ मुस्लीम महिलांचे मत काय आहे? तालिबान विरोधात त्या भारतात उघड निषेध करतील का, याविषयी माहिती घ्यायचा प्रयत्न केला. तर या सगळ्या महिला अगदी भरभरून बोलत होत्या. अगदी तिथे आपल्या मुस्लीम भगिनींचे काय होईल, म्हणून त्या रडल्याही. मी त्यांना म्हणाले, सगळ्याजणी मिळून मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया येथे जमा. तालिबान्यांचा निषेध करू. मात्र, यासाठी त्या सगळ्याजणींनी नकार दिला. नकाराचे कारण कळले की, त्या तालिबान्यांचा निषेध करू शकत नाहीत. कारण, म्हणे ‘तालिबानी हुए तो क्या हुआ? हैं तो हमारे कौमके।’ आपल्याच कौमवाल्याला विरोध करून त्यांच्या जमातीचा आणि मुख्यत: अल्लातालाचा रोष ओढवून घेण्यास त्या तयार नव्हत्या. कॉर्पोरेट स्तराचे जगणे जगणार्‍या त्या तथाकथित विदुषी महिलांचे हे विचार ऐकून त्यावेळी स्तब्ध झाले. पण, हा एक शेवटचा क्षण नव्हता. तर दै. ‘मुंबई तरूण भारत’मध्ये ‘जगाच्या पाठीवर’ सदरामध्ये मागे काही मुस्लीम राष्ट्रांमध्ये काही मुस्लीम पंथामध्ये महिलांचाही खतना होतो, यावर लेख लिहिला. त्यात संदर्भासहित महिलांना होणार्‍या यातना आणि खतन्याचे होणारे परिणाम यावर उघडपणे लिहिले.

दोन-चार दिवसांनी मला एका मुस्लीम महिलेचा फोन आला. अतिशय दर्जेदार फाडफाड इंग्रजीमधून ती संवाद साधत होती. तिचे म्हणणे, “खतना केल्यावर महिलांना त्रास होतो, असे कसे लिहिले तुम्ही? खतना केलेल्या एखाद्या तरी मुस्लीम महिलेने तुम्हाला असे काही सांगितले का?” मी म्हणाले, “खतना झालेल्या स्त्रीच्या जागी आपण स्वत:ला ठेवल्यावर कसे वाटेल?” तर तिचे म्हणणे, “तुम्ही हिंदू आहात ना? आमच्या खतना पद्धतीबद्दल तुम्ही न बोललेच बरे. तुमच्या राणी पद्मावतीने काय केले? हजारो बायकांसोबत जोहर केला. तुमच्या लाखो, हजारो बायकांनी धर्मासाठी स्वत:ला जाळून घेतले, आत्महत्या केली. ते क्रूर नाही का? आमच्या धार्मिक प्रथेनुसार आमच्या शरीराचा थोडा भाग कापला, तर ते तुम्हाला भयंकर वाटते? माय गॉड सच अ मॅडनेस. जसे राणी पद्मावातीने तिचे धार्मिक संस्कार जपले, तसे धर्म, प्रथा अबाधित राखण्यासाठी खतना करणे हे आमचे पवित्र कर्तव्य आहे.” हे ती मला समजावत होती. राणी पद्मावतीचा जोहर आणि खतना यांच्यात तुलनाच होऊ शकत नाही, असे म्हणत तिचे मुद्दे खोडून टाकण्याचा प्रयत्न करत असता ती म्हणाली “मोमीन और काफिर की सोच अलगही होगी ना।” तिच्यासोबत भरपूर वादविवाद केला. शेवटी वैतागून तिने फोन ठेवला. मात्र, पद्मावतीचा जोहर हा ‘क्रूर मॅडनेस’ आणि महिलांचा खतना ही पवित्र पद्धत आहे, असे मानणार्‍या त्या महिलेच्या मानसिकतेबद्दल मी अनेक दिवस नव्हे, आजही विचार करत आहे. हे असे विचार कुठून सुचत असतील?

दुसरीकडे आजही मुस्लीमबहुल भागात पोलिओसकट ‘कोरोना’चे लसीकरणही टाळण्याचा प्रयत्न होते. ‘जगभरातली आई इथून तिथून एकच’ यावर विश्वास ठेवून एका अम्मीशी मी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणत्याही प्रकारच्या लसीकरणाला तिचे समर्थन नव्हते. त्यांच्या मनात भीती आहे की, मुस्लिमांच्या मुलांना नंपुसक बनवण्यासाठी ती लस तयार केली आहे. इतका अविश्वास का बरे? पण, ‘आनंदाचा शिधा’ असू दे की, ‘लाडकी बहीण योजना’ याबद्दल जराही अविश्वास नाही. असे का? याचा मागोवा घेताना जाणवले की, त्यांचे मुस्लीम म्हणून एक वेगळे भावविश्व आहे. आपल्या देशात विविध वाहिन्यांच्या माध्यमातून स्थानिक भाषा आणि हिंदी भाषेतूनही अनेक मालिकांचा रतीब घातला जातो. पण, जरा मुस्लीम घरात डोकावलात तर दिसेल की, तिथे इंटरनेटच्या माध्यमातून मोठ्या आवडीने आणि श्रद्धेने पाकिस्तानी मालिका पाहिल्या जातात. मनोरंजनाच्या माध्यमातून पाकिस्तानी कट्टरतावाद त्यांच्यात रूजत असेल का? दुसरे असे की, अमुक एक नाही केले, तर त्यांना मृत्यूपश्चात नरकच मिळणार. तसेच माणसाचे जगणे खरे नाही, तर मृत्यूनंतर खरे जग सुरू होते.

अल्लाचा करम, दया हवी असेल आणि मृत्यूनंतरचे खरे जग कोणत्याही त्रासाशिवाय चांगले हवे असेल, तर शरीया, कुराण आणि मुल्ला- मौलवींच्या मर्जीनुसार नियम पाळून राहावे लागेल. हे लहाणपणापासून त्यांच्या मनात भरवलेले असते. कुराण, शरीयाचे शिक्षण घेतलेल्या महिला मुस्लीम वस्त्यांमध्ये घरोघरी जातात. त्या महिलांना ‘हलीमा’ म्हटले जाते. या ‘हलीमा’ धर्मासंदर्भात महिलांची त्यांच्या दृष्टिकोनातून जागृती करतात.(त्याला ‘इस्तिमा’ म्हणतात) त्यात मुस्लीम धर्माची श्रेष्ठता, तसेच मुस्लीम महिला, मुस्लीम आई म्हणून मुस्लीम महिलांनी काय करावे, याची माहिती दिली जाते. इस्लामनुसार वागले नाही, तर काय होणार या विषयावरचे त्यांचे त्यांच्या दृष्टिकोनातून प्रबोधनही असते. त्यामुळे इस्लमासंदर्भात जगण्यापलीकडे जीवनशैली पलीकडे आपण गेलो, तर अल्ला मेल्यानंतर जहन्नुम देईल, ही भीती असतेच, त्यापेक्षा आपण तसे वागलो तर आपलेच लोक आपल्याशी कसे वागतील ही भीतीही महिलांमध्ये सहजपणे रूजते.

त्या भीतीतूनच हिंसेचेही समर्थन केले जाते आणि संभलच्या दंगलीत मग ती हिजाबधारी म्हणते, ‘पत्थर तो मार रहे थे। जान थोडी न ले रहे थे।’ शेवटी पुरूष काय महिला काय आणि हिंदू काय, मुसलमान काय, लहानपणापासून जे मनात, डोक्यात ठसवले जाते, जे आजूबाजूला घडले, घडवले जाते, तेच संस्कार त्यांच्यावर होतात. एकदा ते पक्के झाले की, त्यानंतर बाहेरून कितीही काहीही करा पालथ्या घडावर पाणीच! आता कुणी म्हणेल की, नाही नाही माणूस परिस्थितीने बदलतो, नव्हे त्याला बदलवू शकतो. तर यानुसार क्षणभर आशावाद बाळगूया-
ना खौफ जिंदा रहते जिंदगी का,
ना खौफ मरने के बाद के जहन्नुम का,
इन्सान की बेटी,
जिंदगी इन्सानकी जियेगी
वो सुबह कभी तो आयेगी॥


9594969638

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.