हुडहुडीमुळे उबदार कपड्यांना मागणी वाढली

तरुणाईचा कल फॅन्सी स्वेटर, जॅकेटकडे

    30-Nov-2024
Total Views |
Winter

नाशिक : दिवसेंदिवस थंडी वाढत असून नाशिककरांना चांगलीच हुडहुडी भरली आहे. थंडीपासून आपला बचाव व्हावा यासाठी ग्रामीण भागात शेकोटीला तर शहरात उबदार कपड्यांना पसंती दिली जात आहे. शहरातील शालिमार, तिबेटीयन मार्केट आणि मेनरोड येथे स्वेटर, जॅकेटसह उबदार कपडे घेण्यासाठी नागरिकांची गर्दी होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात थंडीचा जोर वाढत चालला आहे. त्यातच मागील दोन ते तीन दिवसांपासून दिवसाही वातावरणात गारवा मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे. त्यामुळे थंडीपासून ( Winter ) बचाव करण्यासाठी नाशिककरांनी उबदार कपडे खरेदी करण्यासाठी गर्दी केल्याचे दिसून येत आहे.

हिवाळा ऋतूच्या सुरुवातीलाच पारा चांगलाच खाली जात असल्यामुळे दिवसेंदिवस थंडी अजून वाढणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे मागील १५ ते २० दिवसांपासून उबदार कपड्यांच्या मागणीत चांगलीच वाढ झाली आहे. तसेच विक्रीमध्ये ३५ ते ४० टक्क्यांची वाढ झाल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे. स्वेटर, हुडी, जॅकेटसोबतच हातमोजे, पायमोजे, कानटोपी आणि मफलर यांनाही चांगलीच मागणी वाढली आहे. लहान मुलांबरोबरच महिला वर्गाचा फॅन्सी स्वेटर खरेदीकडे कल वाढला आहे. थंडीच्या दिवसात लहान मुले आणि ज्येष्ठांची काळजी अधिक घ्यावी लागते. त्यांच्यासाठी पायापासून तर अगदी डोक्याचे संरक्षण व्हावे, यादृष्टीने उबदार कपडे खरेदी केले जात आहेत. ज्येष्ठांकडून लोकरी स्वेटरला पसंती दिली जात असल्याचे दिसून येत आहे.

लहान मुलांच्या कपड्यांना पसंती

थंडीपासून बचाव करण्याबरोबरच फॅन्सी स्वेटर खरेदीकडे तरुणाईचा चांगलाच कल आहे. यामध्ये विंटर कोट, स्वेट शर्ट, कॉटन जॅकेट, हाफ स्वेटर आणि जॅकेट खरेदी करण्याकडे तरुणाईचा कल आहे. तर लहान मुलांसाठी वेगवेगळ्या रंगाच्या उबदार कपड्यांना पसंती दिली जात आहे. यामध्ये कार्टून असलेले स्वेटर आणि जॅकेटची मागणी करण्यात येत आहे. तसेच किंमत अधिक असली तरीही यंदा युवा वर्गाकडून वूडलॅण्ड वॉशिंग जॅकेटला सर्वाधिक मागणी असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे.

ग्राहकांच्या कलानुसार विक्री
आता उबदार कपडे खरेदी करताना ग्राहक त्यांच्या कलानुसार खरेदी करतात. फॅशन जुनी न होऊ देता उबदार कपडे विक्रीसाठी ठेवावे लागतात. सध्या तरुणाईचा कल वूडलॅण्ड वॉशिंग जॅकेट खरेदी करण्याकडे आहे. त्यामुळे हे जॅकेट मोठ्या प्रमाणावर विक्रीला ठेवले आहे. तसेच लोकरीच्या स्वेटरला पूर्वीइतकीच मागणी आहे.

अमोल बागुल, विक्रेता


...अशा आहेत किमती (रूपयांमध्ये)

हुडी 400 ते 700.............................
जॅकेट जाड 700 ते 1,500.................
जॅकेट फॅन्सी 300 ते 700..................
स्वेटर 400 ते 800.......................
स्वेटर स्लीव्हलेस 300 ते 500.....
विंटर कोट 500 ते 1,100.........
स्वेट शर्ट 400 ते 900...............
स्वेटर वॉशिंग 900 ते 1,800........
लहान मुलांचे स्वेटर 300 ते 700.........
मोजे 50 ते 150..............................
कानटोपी 50 ते 150.....................