मुंबई, दि.२९: विशेष प्रतिनिधी अहिल्यानगर जिल्हा जसा काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या पराभवाने चर्चेत आला तसाच कर्जत जामखेड मतदारसंघातील शरद पवार यांचे नातू रोहित पवार आणि भाजप आमदार प्रा.राम शिंदे यांच्यात झालेल्या अटीतटीच्या सामान्यामुळेही चर्चेत आला होता. या अटीतटीच्या लढतीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार रोहित पवार केवळ १२४३ मतांनी विजयी झाले. या निकालांचा अन्वयार्थ घेऊया.
नुकतंच अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलून अहिल्यानगर जिल्हा असं करण्यात आले आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यात चौंडी हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मगाव आहे. यावरूनच या जिल्ह्याला आणि शहराला अहिल्याबाईंचे नाव देण्यात आले आहे. याच अहिल्यादेवींचा माहेराकडील वंशज असणारे प्रा.राम शिंदे यांनी कर्जत-जामखेडमध्ये आपली राजकीय कारकीर्द घडवली आहे. तब्बल २ वेळा येथून निवडून जात त्यांनी राज्यात मंत्रिपदापर्यंत मजल मारली. मात्र, २०१९ला राम शिंदे यांचा कर्जत-जामखेड विधानसभा निवडणुकीत पराभव झाला. यानंतर भाजपने राम शिंदे यांना विधानपरिषेदवर आमदारकीही दिली. मात्र २०१९च्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी राम शिंदे पूर्ण तयारीनिशी पुन्हा एकदा विधानसभेच्या रिंगणात उतरले. यावेळी अवघ्या हजार मतांनी राम शिंदे यांचा पराभव झाला.
विविध जाती समुद्यांनी नटलेला मतदारसंघ
कर्जत जामखेड मतदारसंघाचा विचार करता हा मतदारसंघ विविध जाती समुद्यांनी नटलेला आहे. येथे मराठा, धनगर, अनुसूचित जाती ज्यामध्ये नवबौद्ध, मातंग, चर्मकार आणि होलार या जाती येतात, यासोबतच माळी, मुस्लिम, वंजारी, पारधी, वडार या जाती समुदायाचे नागरिक वास्तव्य करतात. कर्जत जामखेडमध्ये भटक्या विमुक्त जमातींची संख्या देखील लक्षणीय आहे. हे सर्वच समुदायांची मते निवडणुकीत निर्णायक ठरतात. मात्र आजही कर्जत जामखेडमधील वाड्या वस्त्या आणि तालुक्यांची शहरे विकासापासून कोसो दूर आहेत.
प्रचारातील मुद्दे
कर्जत-जामखेड मतदारसंघामधला एमआयडीसीचा मुद्दा, दुष्काळी भागातील पाण्याचा प्रश्न, एसआरपीएफ प्रशिक्षण केंद्राचा श्रेयवादाचा मुद्दा याचबरोबर भूमिपुत्र विरुद्ध बाहेरचा उमेदवार हे मुद्दे प्रचारात राजकीय अजेंड्यावर होते.एकीकडे रोहित पवारांनी त्यांच्या कार्यकाळात कर्जत-जामखेडसाठी हजारो कोटींचा निधी आणि वेगवेगळ्या योजना आणल्याचा दावा प्रचारादरम्यान केला तर दुसरीकडे राम शिंदे यांनी महायुती सरकारची कामे, स्थानिक असल्याचा मुद्दा आणि २०१९आधी त्यांनी केलेल्या कामांचा दाखला देत प्रचाराला सुरुवात केली. 'भूमिपुत्र विरुद्ध बाहेरचा' या प्रचाराने कर्जत जामखेडमधील वातावरण चांगलंच ढवळून निघालं होतं.
पवारांच्या कार्यकर्त्यांचा धुमाकूळ
कर्जत-जामखेड मतदारसंघात रोहित पवारांचे कार्यकर्ते कधी पैसे वाटताना तर भाजप कार्यकर्त्यांना मारहाण करत असल्याचा आरोप भाजपकडून झाला. इतकंच नाहीतर ईव्हीएम ठेवलेल्या ठिकाणी डमी पोलीस बनून रोहित पवारांचे कार्यकर्ते पकडले गेल्याचे व्हिडीओही समाजमाध्यमात फिरले. शरद पवारांचे नातू म्हणून आम्ही मत दिलं मात्र रोहित पवारांनी पाच वर्षात कर्जत किंवा जामखेड याभागात कोणतीही नवी विकासकामे केली नसल्याचे स्थानिक सांगतात. केवळ राज्याच्या राजकारणात भाजप आणि महायुतीवर टीका करतानाच रोहित पवार कर्जत-जामखेडवासीयांना टिव्हीवरच दिसतात. स्थानिक कामे घेऊन आलेल्या सहकाऱ्यांना पीएला भेटण्याचे सल्ले रोहित पवारांनी कार्यकाळात दिले. मात्र, प्रचारदरम्यान याच पीए म्हणून फिरणाऱ्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनाही डावलले असल्याच्या चर्चाही याकाळात रंगल्या. त्यामुळेच की काय पवारांची बारामतीतून मोठी फलटण याकाळात पूर्ण वेळ कर्जत जामखेडमध्ये रोहित पवारांच्या प्रचाराची धुरा सांभाळत होती. एकीकडे भूमिपुत्र विरुद्ध बाहेरचा उमेदवार या मुद्द्याला तोंड देत असतानाच आपल्याच ताफ्यातील पदाधिकाऱ्यांच्या भावना जपण्याचे आव्हानही याकाळात रोहित पवारांसमोर होते.
मविआकाळात एमआयडीसीबाबत चिडीचूप
मविआचे सरकार गेल्यानंतर मात्र रोहित पवारांनी प्रत्येक अधिवेशनात या एमआयडीसीच्या मुद्द्यावरून आंदोलन केले.एमआयडीसी आणण्यावरून महायुती सरकार आल्यापासून रोहित पवार कायमच आक्रमक झालेले दिसतात. मात्र राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना आणि खुद्द काका अजित पवार अर्थमंत्री असताना रोहित पवारांना या एमडीसीचा सपशेल विसर पडला होता का ? असा सवाल उपस्थित होतो.
राम शिंदेच्या लढतीने पवारांना फुटला घाम
कर्जत-जामखेड मतदारसंघामधला एमआयडीसीचा मुद्दा, दुष्काळी भागातील पाण्याचा प्रश्न, एसआरपीएफ प्रशिक्षण केंद्राचा श्रेयवादाचा मुद्दा याचबरोबर भूमिपुत्र विरुद्ध बाहेरचा उमेदवार या मुद्द्यांना तोंड देत तारेवरची कसरत झालेल्या रोहित पवारांचे निकालाच्या शेवटच्या क्षणापर्यंत दिसली. यामुळेच भाजपने आणि राम शिंदेनी रोहित पवारांच्या तोंडच पाणी पळवलं होतं यात शंका नाही. शेवटच्या फेरीपर्यंत रंगलेल्या या लढाईत रोहित पवार केवळ १२४३ मतांनी विजयी झाले. पराभवाच्या दाट छायेत असताना थोडक्यात मतदारांनी रोहित पवारांना तारले.