ठाणे : महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या शिवछत्रपती शिवाजी महाराजांचे सिंधुदुर्ग या किल्ल्याची निर्मिती ज्या दिवशी करण्यास सुरुवात केली तो दिवस म्हणजे २५ नोव्हेंबर..याच दिवसाचे औचित्य साधून ठाण्याच्या ( Thane ) जलतरणपटूंनी २५ नोव्हेंबरला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग येथील मालपे ते वाघोटन सागरी जलतरण अंतर पार करून घवघवीत यश पटकावत शिवरायांना अनोखी मानवंदना दिली.
श्री दुर्गा माता मंडळ, विजयदुर्ग व जिम स्विम अकॅडमी
कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व महाराष्ट्र राज्य जलतरण संघटनेच्या मान्यतेने खुली सागरी जलतरण स्पर्धा विजयदुर्ग येथे घेण्यात आली. या स्पर्धेत देशभरातून ३० स्पर्धक सहभागी झाले होते. ठाण्यातील स्टारफिश स्पोर्ट्स फाउंडेशनच्या जलतरणपटूंनी विजयदुर्ग येथे अलौकिक विक्रम केला.या सर्व जलतरणपटूंचे ठाणे जिल्हा जलतरण संघटनेचे अध्यक्ष आमदार निरंजन डावखरे, महाराष्ट्र राज्य जलतरण संघटनेचे उपाध्यक्ष राजेश मोरे, ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी आदींनी कौतुक केले.
या स्पर्धेत पुरुष खुल्या गटामध्ये (१५ कि.मी.) मानव मोरे (वय १९) याने द्वितीय, आयुष तावडे याने तृतीय, ओजस मोरेने सातवा, आरुष राणे आठवा तर पाच वर्षीय जलतरणपटू रियांश खामकर याने नववा क्रमांक पटकावला. मुलींमध्ये आयुषी आखाडे हिने द्वितीय क्रमांक, श्रुती जांभळे चौथा, किमया गायकवाड हिने पाचवा आणि माही जांभळे हिने सहावा क्रमांक पटकाविला.तसेच, सोहम प्रशांत पाटील या जलतरणपटूने ३० किलोमीटर अंतर ५ तास १७ मिनिटात पार करून चौथा क्रमांक पटकावला.