आठवणीतील संगीत फनकार ‘मोहम्मद रफी’

30 Nov 2024 20:54:52
remembering evergreen singer mohd rafi


‘क्या हुआ तेरा वादा’, ‘बहारों फुल बरसाओ’, ‘बाबूल की दुवाएँ लेती जा’ ही सदाबहार गाणी भारतीय संगीत रसिकांच्या अक्षरश: मनामनांत कोरलेली. स्वर्गीय आवाजाची देणगी लाभलेल्या मोहम्मद रफींनी अजरामर केलेल्या अशा गीतांची यादी अफाट असून, त्यांच्या गायनाची मोहिनी आजही कायम आहे. वयाच्या अवघ्या 13व्या वर्षी रफी साहेबांनी जाहीर कार्यक्रमांमध्ये गायनाला सुरुवात केली. अशाच एका कार्यक्रमात श्याम सुंदर यांना रफींचे गाणे आवडले. यानंतर रफी यांचा गायनाचा प्रवास सुरू झाला. रफी मुंबईत आले तेव्हा त्यांनी पहिले गाणे ‘गाँव की गोरी’ या चित्रपटात 1945 साली गायले होते. त्यानंतर त्यांचा सांगीतिक प्रवास हा अबाधित राहिला. नुकताच 55व्या ‘आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा’त (इफ्फी) मोहम्मद रफी यांच्या आठवणींना आणि त्यांच्या संगीत कारकिर्दीला उजाळा देणारा एक कार्यक्रम संपन्न झाला. ज्यात मोहम्मद रफी यांचे सुपुत्र शाहिद रफी, गायक सोनू निगम, दिग्दर्शक सुभाष घई आणि ज्येष्ठ गायिका डॉ. अनुराधा पौडवाल यांनी रफी साहेबांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.


... अन् मला वडिलांची ख्याती समजली!

आमचे वडील मोहम्मद रफी आणि आई यांना त्यांच्या कोणत्याही मुलाने मनोरंजनसृष्टीत आपली कारकीर्द घडवावी, असे वाटत नव्हते. त्याचे प्रमुख कारण असे होते की, माझ्या वडिलांची अशी इच्छा होती की, जर का माझे कुठलेही अपत्य संगीत क्षेत्रात आले, तर एकतर माझ्याबरोबरीचे ते हवे किंवा माझ्या वरचढ तरी त्यांची कारकीर्द हवी. त्यामुळेच त्यांनी आम्हा सर्व भावंडांना लंडनमध्ये शिकण्यास पाठवले होते. मात्र, वडिलांच्या निधनानंतर आई पूर्णपणे एकटी पडली आणि तिला सांभाळण्यासाठी मी भारतात आलो आणि इथेच कायमचा स्थायिक झालो. खरे तर आमचे वडील इतके मोठ्या पट्टीचे गायक होते, हे आम्हाला त्यांच्या निधनानंतर समजले. कारण, घरात आमच्या सर्वसामान्य कुटुंबाप्रमाणे वातावरण होते. वडिलांनी कधीच उंबरठ्याच्या आत गाण्याचा रियाज केला नाही. केवळ गाण्याचे रेकॉर्डिंग करुन आल्यानंतर आम्हाला आज कुठल्या कलाकारासोबत रेकॉर्डिंग केले, इतकेच ते सांगायचे. त्यापलीकडे संगीत कधीच घरात नव्हते. रफी साहेबांच्या निधनानंतर ज्यावेळी लोक त्यांच्या गाण्याचे तोंडभरुन कौतुक करायचे, त्यावेळी मला माझ्या वडिलांची ख्याती समजली आणि त्यामुळेच मी त्यांचा संगीताचा वारसा पुढे घेऊन जाण्याचा निर्णय घेत ‘मोहम्मद रफी संगीत शाळा’ सुरु केली.
-शाहिद मोहम्मद रफी, मोहम्मद रफी यांचे सुपुत्र आणि गायक


एक विनम्र ‘सुपरस्टार’

मोहम्मद रफी यांच्यासोबत मला 35 गाणी गाण्याची संधी मिळाली, हे मी माझे अहोभाग्य समजते. ज्याकाळी आम्ही गाणी रेकॉर्ड करत होतो, तेव्हा आजच्या इतके प्रगत तंत्रज्ञान नव्हते. आम्ही वादकांसोबत लाईव्ह रेकॉर्डिंग करत होतो. मोहम्मद रफी यांच्यासोबतची इथे त्याच अनुषंगाने एक विशेष आठवण मला सांगावीशी वाटते. रफी साहेब इतके हळू आवाजात बोलायचे की, त्यांच्या बाजूला बसलेल्या व्यक्तीलाही ते काय बोलताहेत, हे ऐकू येत नव्हते. पण, ज्यावेळी ते माईकवर गाणे गाण्यासाठी उभे राहायचे, तेव्हा त्यांच्या गळ्यातून जो आवाज बाहेर येई, तो ऐकून मी थक्क होत असे. सुभाष घई दिग्दर्शित ‘कर्ज’ या चित्रपटासाठी जेव्हा मी आणि रफी साहेब गाण्याच्या रेकॉर्डिंगसाठी गेलो होतो, त्यावेळी खरेतर ते सुपरस्टार होते. पण, तरीही दिग्दर्शकासमोर नम्रपणे वाकून गाणे ऐकून घेणे, त्यांना नेमके कोणते भाव अपेक्षित आहे, हे जाणून घेण्याच्या त्यांच्या सवयीने आम्ही खूप काही शिकून गेलो.
- डॉ. अनुराधा पौडवाल, ज्येष्ठ गायिका


मोहम्मद रफी हे संगीत व्यासपीठ आणि विश्वकोश

संगीत क्षेत्रात मी केवळ एकाच व्यक्तीच्या गायनाचे एकलव्यासारखे धडे घेतले, ते म्हणजे मोहम्मद रफी! 1999 सालापासून माझ्या संगीत क्षेत्रातील कारकिर्दीची सुरुवात झाली आणि तेव्हापासून माझ्या गाण्यात मी मोहम्मद रफी यांची गायकी कशी वापरता येईल, याचाच प्रयास कायम केला. रफी साहेबांबद्दल एक गोष्ट सांगायला नक्की आवडेल की, बर्‍याचदा चित्रपटात ज्या कलाकारासाठी गाणे गायले जाते, ते त्या गायकाचे गाणे आहे असे संबोधले जाते. म्हणजे काय? तर अमुक गाणे किशोर कुमार यांचे आहे किंवा तमुक गाणे मुकेश यांचे आहे. पण, मोहम्मद रफी असे एकमेव गायक होते, ज्यांनी प्रमुख नायकासाठी अशाप्रकारे पार्श्वगायन केले होते, जे ऐकून ते त्याच नायकाने गायले आहे, असे जाणवते. शम्मी कपूर यांच्यासाठी गायलेली गाणी तेच गात आहेत, असे वाटायचे. त्याचे कारण असे की, मोहम्मद रफी यांनी त्यांच्या गायनात अदाकारी आणि हावभाव आणले होते, जेणेकरुन ते गाणे त्या कलाकाराला साजेसे असे व्हायचे. शिवाय 60-70च्या दशकात ज्यावेळी रफी साहेबांनी गाणी गायली होती, तेव्हा त्यांना गृहपाठ करण्यासाठी फारशा इतर रेकॉर्डिंग किंवा कॅसेट्स नव्हत्या. त्यामुळे गाण्यातील प्रत्येक शब्दांचे उच्चारण त्या भावना व्यक्त करताना कसे असावे, याचा अभ्यास स्वत:च करुन आजच्या आणि पुढच्या भावी संगीत क्षेत्रातील कलाकारांसाठी मोहम्मद रफी हे संगीत व्यासपीठ आणि विश्वकोश आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. माझ्या वैयक्तिक गायनाबद्दल सांगायचे झाल्यास, मी मोहम्मद रफी यांची गायलेली प्रत्येक गाणी माझ्या कोणत्याही गाण्याच्या रेकॉर्डिंगपूर्वी ऐकतो. त्यासोबतच चित्रपटातील अमुक प्रसंगासाठी मी जे गाणे गाणार असेन, त्यावेळी मोहम्मद रफी यांनी हे गाणे कसे गायले असेल, याचा विचार आधी करतो आणि नंतर ते गाणे सादर करतो.
- सोनू निगम, सुप्रसिद्ध गायक


रफींच्या गाण्यांचा विसर पडणे अशक्य!

मोहम्मद रफी यांनी माझ्या चित्रपटासाठी पहिले गाणे गायले होते ते म्हणजे ‘दर्दे दिल, दर्दे जिगर.’ रेकॉर्डिंगला ज्यावेळी आम्ही उभे राहिलो आणि रफी साहेबांनी पहिलीच ओळ गायली ‘दर्दे दिल दर्दे जिगर...’ आणि ते ऐकून मी स्वत:लाच म्हणालो, आता हे गाणे ‘हिट’ होणार आहे आणि तसेच झाले! बर्‍याचदा ज्यावेळी चित्रपटात गाणी गाण्यासाठी गायकांची निवड करण्याची वेळ येते, तेव्हा प्रसंगावरुन संगीतकार, दिग्दर्शक, गीतकार हे गायकाची निवड करत असतात. पण, मोहम्मद रफी यांची निवड कधीच करावी लागली नाही. कारण, चित्रपटातील कोणताही प्रसंग असला किंवा कोणताही प्रमुख नायक असला, तरी त्यासाठी मोहम्मद रफी यांचा आवाज तंतोतंत जुळत असत. इथे मला एक प्रसंग खास नमूद करावासा वाटतो, तो म्हणजे माझ्या ‘ताल’ या चित्रपटात ‘इश्क बिना’ हे गाणे गाण्यासाठी मी आणि ए. आर. रेहमान यांनी सोनू निगम यांना बोलावले होते. त्यावेळी सोनू यांनी मला ‘नेमके तुम्हाला गाण्याचा भाव कसा अपेक्षित आहे,’ असा प्रश्न विचारला. त्यावेळी माझे एकच उत्तर होते, ते म्हणजे, मोहम्मद रफी यांच्यासारखे हे कडवे तुम्ही गाणे अपेक्षित आहे आणि खरोखरच त्यांनी त्याच भावनेने ते गाण गायले होते. त्यामुळे हिंदी चित्रपटसृष्टीतील सांगीतिक वारसा जपणारे मोहम्मद रफी फार लवकर या जगातून निघून गेले, याची खंत दिग्दर्शक आणि संगीतप्रेमी म्हणून मला आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रेमगीत, देशभक्तीपर गीत, आनंद असो किंवा दु:ख असो, प्रत्येक प्रसंगासाठी मोहम्मद रफी या गायकाने अशी काही गाणी गाऊन ठेवली आहेत, ज्यांचा विसर पडणे अशक्य आहे.
-सुभाष घई, ज्येष्ठ दिग्दर्शक


Powered By Sangraha 9.0