सातार्‍यात ‘पृथ्वी’ उलट का फिरली?

30 Nov 2024 15:34:19
Prithviraj Chavan

मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या निकालाने महाविकास आघाडीची चांगलीच झोप उडाली आहे. काँग्रेसमधील दिग्गज नेत्यांनासुद्धा महायुतीने धूळ चारली आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण ( Prithviraj Chavan ) यांचाही पराभव झाला आहे. कराड दक्षिण मतदारसंघात भाजपच्या डॉ. अतुल भोसले यांनी चव्हाण यांचा ३९ हजार, ३५५ एवढ्या मताधिक्यांनी पराभव केला. त्यामुळे सातार्‍यात ‘पृथ्वी’ उलटी फिरल्याचे दिसून आले.

पृथ्वीराज चव्हाण यांच्या पराभवाचे प्रमुख कारण म्हणजे बाळासाहेब पाटील आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यातील अंतर्गत वाद होय. निवडणुकीच्या रिंगणात पक्षाची एकजूट नसेल, तर पक्षाचा पराभव हा नक्की असतो. कर्‍हाड दक्षिण आणि उत्तरेत भाजपने मोठ्या फरकाने विजय मिळवला. त्यात कर्‍हाड दक्षिणेत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, तर उत्तरेत माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांना पराभवाला सामोरे जावे लागले. वास्तविक पाटील यांचा गट शहरी भागात सक्रीय आहे. मात्र, विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीत बिघाडी झाल्यामुळे पाटील यांच्या गटाने चव्हाण यांच्याविरोधात काम केल्याचे बोलले जात आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्या पराभवाचे कारण म्हणजे लोकांशी तुटलेला संवाद. जनसंपर्काचा अभाव असल्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांना पराभव स्वीकारावा लागल्याची चर्चा आहे. कराड हा काँग्रेसचा बालेकिल्ला जरी असला, तरी त्यांचा लोकांशी संवाद नसल्यामुळे काहीसा नाराजीचा सूर लोकांमध्ये उमटल्याची चर्चा होती. पृथ्वीराज चव्हाण यांच्या पराभवाचे कारण म्हणजे, महायुतीला असलेला भोसले घराण्यातील दिग्गजांचा पाठिंबा हेदेखील आहे. खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, सातारा-जावळीचे आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आपली ताकद महायुतीच्या मागे उभी केली. आमदार अतुल भोसले यांच्या प्रचारार्थ देवेंद्र फडणवीस यांनी सातार्‍यात सभा घेतली होती. महाराष्ट्राच्या प्रगतीचा आलेख त्यांनी लोकांसमोर मांडला. तिथेच दुसर्‍या बाजूला काँग्रेसच्या नेत्यांनी मात्र, या महत्त्वाच्या गोष्टींकडे पाठ फिरवली. पृथ्वीराज चव्हाण आपल्या पारंपरिक कार्यक्रमावर अवलंबून राहिले आणि निवडणुकीत त्यांचा पराभव झाला.

पृथ्वीराज चव्हाण यांना आलेल्या अपयशाचे अजून एक कारण म्हणजे, सहकारी संस्थांवरची पकड सुटणे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष यांना निवडणुकीसाठी आधारभूत असणार्‍या सहकारी संस्था म्हणजे हक्काची मतपेटी आहे. त्यांची संघटनात्मक बांधणी जरी उत्तम असली तरीसुद्धा चव्हाण यांना त्यावर नियंत्रण ठेवता आले नाही. कराड तालुक्यात विकासकामे आणण्यात काँग्रेस पक्ष अपयशी ठरली. याच अपयशामुळे जनतेनेसुद्धा विकासाचा मार्ग निवडण्यासाठी महायुतीला कौल दिला. एकेकाळी पृथ्वीराज चव्हाण हे नाव केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर देशाच्या राजकारणात गाजत होते. २०१० साली ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. शरद पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादीने २०१४ साली आपला पाठिंबा तत्कालीन सरकारमधून काढून घेतल्याने सरकार कोसळले. यावर्षीच्या विधानसभेच्या रिंगणात काँग्रेसच्या दिग्गजांच्या माथी पराभवाचा शिक्का बसला. पक्ष म्हणून काँग्रेसला आता आत्मपरीक्षणाची गरज आहे.

Powered By Sangraha 9.0