बालकांच्या आरोग्यासाठी मनपाची विशेष मोहीम

१९ वर्षांपर्यंतच्या मुलांना देणार जंतनाशक गोळी; ‘राष्ट्रीय जंतनाशक दिना’निमित्त मनपाचा उपक्रम

    30-Nov-2024
Total Views |
Jantunashak

नाशिक : ( Nashik ) लहान बालकांना होणारे जंताचे आजार नष्ट करण्यासाठी महानगरपालिकेकडून विशेष मोहीम राबविण्यासाठी हालचाल सुरु करण्यात आली आहे. बुधवार, दि. ४ डिसेंबर रोजी ‘राष्ट्रीय जंतनाशक दिन’ आणि दि. १० डिसेंबर रोजी ‘मॉप अप दिना’निमित्त विशेष मोहीम हाती घेण्यात येणार आहे.

या मोहिमेंर्तगत एक ते १९ वयोगटातील बालकांना जंतनाशक गोळी देण्यात येणार आहे. जेणेकरुन शहरातील मुलांना जंताचे आजार होणार नाही. या वयोगटातील किमान २८ टक्के बालकांमध्ये आतड्यांचा कृमीदोष आढळतो. हा कृमीदोष आजार मातीतून प्रसारित होणार्‍या जंतापासून होत असतो. तसेच रहिवासी भाग असलेल्या ठिकाणी अस्वच्छतेमुळेदेखील हा आजार होण्याची शक्यता असते. त्यासाठी बालकांचे आरोग्य चांगले ठेवणे, उत्तम पोषण स्थिती, योग्य शिक्षण व जीवनाचा दर्जा उंचावणे या उद्देशातून ‘जंतनाशक मोहीम’ राबविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे बालकांमध्ये आढळून येणारा जंतदोष आजार वरवर साधारण असला, तरी त्याचे वाईट परिणाम आरोग्यावर दिसून येतात.

यामुळे बालकांना अ‍ॅनिमिया होण्याचा सर्वाधिक धोका असतो. शिवाय, आतड्यावर सूज येणे, भूक मंदावणे, उलट्या, अतिसार, पोटदुखी आदी आजार डोके वर काढण्याची शक्यता असल्याची माहिती महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. तानाजी चव्हाण यांनी दिली.

तसेच कृमीदोष हा आजार रक्तक्षय आणि कुपोषणाचे कारण असून बालकांची शारीरिक व बौद्धिक वाढ खुंटण्यासाठीही तो कारणीभूत ठरतो. त्यामुळे हा दोष टाळण्यासाठी बालकांना वर्षातून दोनवेळा जंतनाशक गोळी देणे गरजेचे असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. त्याअनुषंगाने नाशिक महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत वर्षातून दोनवेळा विशेष मोहीम राबविली जाते.
ही मोहीम शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र, अंगणवाडी, प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये राबविण्यात येणार आहे. तसेच सार्वजनिक आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, महिला व बालकल्याण विभाग, सर्व अंगणवाडी आणि सर्व विभागीय अधिकार्‍यांची यासाठी मदत घेण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अशोक करंजकर यांच्या अध्यक्षतेखाली सिटी टास्क फोर्सची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीला महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. तानाजी चव्हाण, मनपा उपायुक्त नितीन नेर, डॉ. जितेंद्र धनेश्वर, डॉ. प्रशांत शेटे, सर्व विभागीय नोडल वैद्यकीय अधिकारी, सर्व विभागीय अधिकारी उपस्थित होते.