आजही ‘मराठी विश्वकोश’ कालसुसंगत : डॉ. रवींद्र शोभणे

30 Nov 2024 21:36:09
interview with dr ravindra shobhane
 

मराठी भाषेसाठी काम करणार्‍या महत्त्वाच्या संस्थांपैकी एक म्हणजे ‘मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ.’ कुठलीही माहिती ऑफलाईन अथवा ऑनलाईन शोधण्यासाठी आपल्याला विश्वकोशाची खूप मदत होते. हा विश्वकोश निर्माण करण्यासाठी आणि काळासोबत तो अद्ययावत करण्यासाठी ‘मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ’ खूप महत्त्वाची भूमिका बजावत असते. अलीकडेच या मंडळाचे अध्यक्ष म्हणून डॉ. रवींद्र शोभणे यांची नियुक्ती झाली आहे. त्यानिमित्ताने डॉ. रवींद्र शोभणे यांच्याशी ‘मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ’ आणि आगामी साहित्य संमेलनाच्या अनुषंगाने साधलेला हा विशेष संवाद.


सर्वप्रथम मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल तुमचे मन:पूर्वक अभिनंदन. 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि आता विश्वकोश मंडळाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी, याकडे तुम्ही कसे पाहता?

मराठी विश्वकोशाला आणि विश्वकोश मंडळाला तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशींपासून मोठी अशी परंपरा लाभली आहे. त्यामध्ये मे. पुं. रेगे, रा. ग. जाधव, विजया वाड, दिलीप करंबळेकर, डॉ. राजा दीक्षित अशा काही अध्यक्षांची नावे आवर्जून घेता येतील. विविध क्षेत्रातील अशा विद्वानांची परंपरा लाभलेल्या ‘मराठी विश्वकोश निर्मिती मंडळा’च्या अध्यक्षपदी माझी निवड होणे ही माझ्या आयुष्यातील सर्वोत्कृष्ट संधी आणि अतिशय महत्त्वाची अशी पर्वणी आहे, असे मला वाटते. त्यामुळे माझी याबद्दलची प्रतिक्रिया ही नक्कीच आनंददायी आहे.


1980 साली ‘राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळा’चे विभाजन होऊन ‘मराठी विश्वकोश मंडळा’ची स्थापना करण्यात आली. त्यापूर्वी 20 वर्षे ‘विश्वकोश मंडळ’ हे साहित्य आणि संस्कृती मंडळाचाच एक भाग होते. मग ‘विश्वकोश मंडळ’ स्वतंत्र असावे हा विचार का पुढे आला?

1960 साली संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली. यशवंतराव चव्हाण हे त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. केवळ राजकारणच नाही, तर राजकारणासोबतच समाजकारण, संस्कृतीकारण आणि तत्सम अशा ज्या सामाजिक अभिसरणाच्या आणि सामाजिक उत्थानाची जी काही क्षेत्रे आहेत, अशा क्षेत्रांना वेगळ्याप्रकारे काम करण्याची ऊर्जा मिळावी, ही त्यांची भावना होती. त्यातूनच 1960 साली राज्यात ‘साहित्य आणि संस्कृती मंडळा’ची स्थापना झाली. या मंडळाच्या माध्यमातून समाजातील साहित्य, संस्कृती, ज्ञान, इतिहास आणि परंपरा या सगळ्या गोष्टींचे दर्शन सर्वसामान्य माणसाला, वाङ्मयप्रेमींना, मराठी भाषिकांना व्हावे, ही त्यामागची भावना होती. या भावनेतून आणखी एक गोष्ट घडली ती म्हणजे मराठी साहित्याला ‘वाङ्मय पुरस्कार’ देण्याची सुरुवात झाली. हा सगळा पसारा हळूहळू वाढत होता. मराठी विश्वकोशाचे काम या ‘साहित्य आणि संस्कृती मंडळा’च्या अधिपत्याखाली पूर्वी होत होते. या दोन्ही मंडळांची कामे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी एकहाती पाहत होते. पण, मराठी विश्वकोशाच्या कामाची व्याप्ती जेव्हा वाढू लागली, त्यावेळी शासनाने तर्कतीर्थांच्या नेतृत्वाखाली ‘मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ’ स्वतंत्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी ‘मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ’ स्थापन झाले. योगायोग असा की, ज्यावेळी ‘राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाची’ स्थापना झाली होती, तेव्हा त्याचे पहिले अध्यक्ष तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी होते आणि जेव्हा स्वतंत्र ‘मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ’ स्थापन झाले, त्यावेळी त्याचेही पहिले अध्यक्ष तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशीच होते.

 
60 वर्षांहून अधिक काळ ‘मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ’ कार्यरत आहेत. इतक्या वर्षांमध्ये या मंडळाची काम करण्याची पद्धत आणि कामाचे स्वरूप कसे बदलत गेले?

खासगीकरण, जागतिकीकरण आणि उदारीकरणाच्या संस्कृतीचा आपण जेव्हा स्वीकार केला, तेव्हा आपल्या ज्ञानकक्षा वाढल्या. माध्यमे वाढली, निर्मिती आणि प्रगती करण्याची साधनेसुद्धा वाढली. मग विश्वकोश फक्त लिखित माध्यमांपुरते मर्यादित राहू नये, ते दृकश्राव्य, समाजमाध्यमे आणि इतर सर्वप्रकारे कसे लोकांपर्यंत पोहोचवता येईल, याचा विचार व्हायला लागला आणि त्यातून मग विश्वकोशाचे ‘डिजिटायजेशन’ सुरू झाले. ‘पेनड्राईव्ह सिस्टिम’मध्ये सुद्धा या ‘मराठी विश्वकोश मंडळा’ने तयार केलेल्या विश्वकोशांचे रूपांतरण करण्यात आले. त्यामुळे हा ज्ञानसाठा सामान्य लोकांपर्यंत पोहोचू लागला. धकाधकीच्या काळात लोकांना प्रत्यक्ष विश्वकोश घेऊन त्याचा अभ्यास करणे शक्य नसताना डिजिटल माध्यमांमार्फत अभ्यासकांना, चिकित्सकांना कोणत्याही ठिकाणी, कोणत्याही वेळी आणि कोणत्याही परिस्थितीत विश्वकोशाची मदत घेता येईल, ही सोय करून देण्याचे काम ‘विश्वकोश मंडळा’ने केले आहे. साधारणत: विजया वाड यांच्या कार्यकाळात विश्वकोशाच्या माहितीला समाजमाध्यमांवरुन प्रसारित करण्याचे काम सुरू झाले, असे या मंडळाचा इतिहास सांगतो.


‘विश्वकोश मंडळा’ने आतापर्यंत बरेच काम केले आहे. विश्वकोशाचे 20 खंडदेखील प्रकाशित झाले आहेत. मग आता या मंडळाचे पुढचे नियोजन काय असणार आहे?

विश्वकोशाचा 19 आणि 20वा खंड अजून अपूर्णावस्थेत आहे. त्यामुळे आधी जे अपूर्ण काम आहे, ते पूर्ण करण्याकडे लक्ष दिले जाईल. त्या कामामध्ये काही त्रुटी असतील, ज्ञानसाठा अपूर्ण असेल किंवा काही नोंदी झाल्या नसतील, तर ते सगळे करून 19 आणि 20वा खंड पूर्ण करणे आणि अपूर्णावस्थेतील काम पूर्ण करणे, हे माझ्या अध्यक्ष म्हणून कार्यकाळातील पहिले कर्तव्य असेल. त्याशिवाय 1960 सालापासून हे काम सुरू झाले आणि 1973 साली पहिला खंड प्रकाशित झाला. त्याआधी ‘शब्दकोश’ आणि ‘माहितीकोश’ हे दोन खंड आले होते. विश्वकोश निर्मितीच्या कामाचा इतिहास पाहताना आपल्याला 50 वर्षांहून अधिक काळ मागे जावे लागते. हे काम जेव्हा सुरू झाले, तेव्हा फक्त लिखित माध्यमे होती. पण, बदलत्या काळात आपली जीवनशैली बदलत गेली. त्यातून नवे शब्द निर्माण झाले. ते शब्द आधीच्या खंडांमध्ये साहजिकच नसणार. त्यामुळे विश्वकोशाचे आधुनिकीकरण आणि अद्ययावतीकीकरण करणे सुद्धा महत्त्वाचे आहे. त्यामुळे ते सुद्धा काम मी माझ्या कार्यकाळात महत्त्वाचे मानतो.


आताच्या काळात मराठी भाषेसाठी विश्वकोश मंडळाचे काम का आणि कसे महत्त्वाचे आहे?

‘मराठी विश्वकोश’ हा आताच्या काळात अत्यंत महत्त्वाचा आहे. आपण वाचनाच्या संदर्भात विचार करताना केवळ छापील माध्यमांचा विचार करतो. परंतु, आजच्या नव्या पिढीच्या ज्ञान मिळवण्याच्या आणि ज्ञानग्रहण करण्याच्या साधनांमध्ये खूप बदल झालेला आहे. आजच्या काळात आपल्याला एखादी माहिती हवी असेल, तर ती माहिती मिळवण्यासाठी आपण ग्रंथालयात जात नाही, आपण ताबडतोब गुगलवर जातो आणि ती माहिती आपल्याला मिळते. ही सगळी आधुनिक माध्यमे ‘मराठी विश्वकोशा’ला पूरक ठरलेली आहेत. या आधुनिक माध्यमांमार्फत ‘मराठी विश्वकोश’ प्रत्येकापर्यंत आणि खास करून तरुण पिढीपर्यंत पोहोचत आहे आणि त्यांना मार्गदर्शन करत आहे. नवी पिढी वाचत नाही असे म्हणणे म्हणजे त्या पिढीवर अन्याय करण्यासारखे आहे. त्यांचे वाचन हे कदाचित कथा, कादंबरी, समीक्षाग्रंथ, चरित्र किंवा आत्मचरित्राचे वाचन नसेल, पण तांत्रिक पुस्तकांचे किंवा इतर माध्यमाचे त्यांचे वाचन आहे. उदाहरणार्थ, एखादा सिनेमा कधी चित्रित झाला, त्याचे चित्रीकरण कुठे झाले, त्यामध्ये नायक-नायिका कोण आहेत, ही जर माहिती आजच्या पिढीला हवी असेल, तर ती त्यांना ताबडतोब गुगलवर मिळते. अशी माहिती किंवा वैज्ञानिक माहिती असेल. उदाहरणार्थ, पायथागोरसचा सिद्धांत असेल तर तो सिद्धांत नक्की काय, तो पायथागोरसने का निर्माण केला, त्याच्या आधी त्याच्यावर कोणी काम केले आहे का, त्याचे स्वरूप कसे आहे, हे सगळे ही पिढी गुगलवर शोधेल, वाचेल आणि त्यांच्या ज्ञानात भर पडेल. कदाचित कथा-कादंबरीचे वाचन या सगळ्याचा पुढचा टप्पा असेल.


नवसाहित्यिक, नव्या पिढीला किंवा ज्यांना अजून ‘मराठी विश्वकोशा’विषयी फारशी माहिती नाही, अशा नागरिकांना विश्वकोशाशी जोडून घेण्यासाठी तुमचे काय प्रयत्न असतील?

‘मराठी विश्वकोशा’विषयी त्यांना माहिती नाही असे नाही. कारण, आपण एखादी गोष्टी गुगलवर शोधली आणि ती विश्वकोशातील असेल, तर खाली संदर्भ म्हणून ‘मराठी विश्वकोश’ असे लिहून येते. त्यामुळे त्यांना इथपर्यंत माहिती असतेच. ‘मराठी विश्वकोशा’च्या निर्मितीची कल्पना ज्यावरून सुचली ते ‘एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका.’ त्याचाही संदर्भ आपल्याला दिसतो. अनेक शाळांमध्ये विश्वकोशाविषयी माहिती दिली जाते. मुलांना त्याविषयी सांगितले जाते. तशी माहिती जर शाळांमध्ये दिली जात असेल, तर आम्ही मंडळातर्फे त्यासाठी प्रयत्न करू. शाळांमध्ये, महाविद्यालयांमध्ये विश्वकोशाचे खंड पोहोचवणे याकडेही आम्ही लक्ष देऊ.


मराठी भाषेला अलीकडेच अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. त्याचा विश्वकोश मंडळाला काय फायदा होईल?


‘मराठी विश्वकोश निर्मिती मंडळा’ला या ‘अभिजात’ दर्जाचा प्रत्यक्ष असा काय फायदा होईल, हे अजून तरी स्पष्ट नाही. ‘मराठी विश्वकोश मंडळा’चा आणि या अभिजात दर्जाचा तसा थेट संबंध आपल्याला सांगता येणार नाही. आपली भाषा ही अभिजात होतीच. राजा झाला, पण राज्याभिषेक झाला नाही, अशा स्थितीत ती होती. त्यामुळे ‘अभिजात’ दर्जाचा मिळालेला मुकुटमणी महत्त्वाचा आहे. त्यामुळे इतर भाषिक लोकांनासुद्धा तिचे महत्त्व कळण्यास मदत होईल.


अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे तुम्ही मावळते अध्यक्ष आहात. यंदाचे साहित्य संमेलन दिल्लीत पार पडणार आहे. त्याविषयी काय सांगाल?

महाराष्ट्राबाहेर ही साहित्य संमेलन व्हावीत, या मताचा मी आहे. जेव्हा ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन’ अशी आपण संकल्पना राबवितो, तेव्हा भारतातल्या इतर ठिकाणांपर्यंतही ते जाणे गरजेचे असते. याआधी ग्वाल्हेर, मडगाव, इंदौर, हैदराबाद अशा ठिकाणी महाराष्ट्राबाहेर अनेक साहित्य संमेलने झालेली आहेत. तिथल्या मराठी लोकांना संमेलनांची, संमेलन परंपराची ओळख व्हावी, याच भावनेतून ‘अखिल भारतीय साहित्य महामंडळ’ ही संस्था महाराष्ट्राबाहेरच्या संस्थांच्या सुद्धा निमंत्रणांचा सुद्धा स्वीकार करते. 1954 साली सुद्धा साहित्य संमेलन दिल्लीला झाले होते. त्यामुळे साहित्य संमेलनाचा मी मावळता अध्यक्ष आहे आणि माझ्या साक्षीने ते होत आहे, याचा निश्चितच मला आनंद आहे.


हे झाले ‘मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ’ आणि ‘साहित्य संमेलना’विषयी. पण, एक साहित्यिक म्हणून वाचकांना तुमच्या नवीन लिखाणाची प्रतीक्षा आहेच. तुमच्याकडून वाचकांना आता नवीन काय वाचायला मिळणार आहे?

मी भरपूर लिहिले आहे आणि वाचकांनीही त्याला भरपूर प्रेम दिले आहे. आता माझे आणखी दोन-तीन प्रकल्प आहेत. त्यातला पहिला म्हणजे महाभारतातला जो उत्तर कालखंड आहे म्हणजे पांडव जेव्हा स्वर्गारोहणाला जातात, त्याविषयी मला वेगळ्या पद्धतीने कादंबरीच्या माध्यमातून मांडायचे आहे. त्यानंतर संत नामदेवांवरचा एक प्रकल्प माझ्या विचाराधीन आहे. ते या दोन-तीन वर्षांमध्ये होईल, अशी मला आशा आहे. तुमच्या सगळ्यांच्या माझ्यावरील प्रेमामुळे, आस्थेमुळे हे काम मी करू शकेन असा विश्वास वाटतो.

दिपाली कानसे
Powered By Sangraha 9.0