हिंदू अस्मितेचे धमाके असेच फुटत राहतील...

भाऊ तोरसेकर यांचे आगामी निवडणुकीबाबत भाकित

    30-Nov-2024
Total Views |
Bhau Torasekar

ठाणे : लोकसभा निवडणुकीवेळेस हिंदूंमध्ये मतदानाबाबत उदासिनता होती. मात्र, बांगलादेश, सिलीगुडी आणि सिमला येथील हिंदूवरील अन्यायाच्या घटनांनंतर हिंदू ( Hindu ) अस्मिता जागी झाली. हिंदू धर्मियांना आपल्या उदासिनतेबाबत पश्चाताप झाल्यानंतर आधी हरियाणा तर आता महाराष्ट्रात अनुकूल निकाल लागले. तेव्हा, यापुढील निवडणुकांमध्येही हिंदू अस्मितेचे धमाके असेच फुटत राहतील, असे भाकीत ज्येष्ठ पत्रकार व राजकीय विश्लेषक भाऊ तोरसेकर यांनी केले.

भाजपाचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष व विश्वास सामाजिक संस्थेचे अध्यक्ष संजय वाघुले यांच्या वतीने भाऊ तोरसेकर यांचे `कारणं महायुतीच्या विजयाची, भाजपाच्या यशाची' या विषयावर शुक्रवारी (ता.२९ नोव्हे.) व्याख्यान पार पडले. त्यावेळी तोरसेकर बोलत होते. नौपाड्यातील उमा निळकंठ व्यायामशाळेलगतच्या हितवर्धिनी सभेच्या मैदानात झालेल्या या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांसह शेकडो ठाणेकरांनी गर्दी केली होती. या कार्यक्रमात भाऊ तोरसेकर यांच्या हस्ते सामाजिक कार्यकर्ते व हिंदुत्वाचे अभ्यासक अजय जगताप यांनी `लव्ह जिहाद'वर लिहिलेल्या `व्हायरस' पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

लोकसभा निवडणुकीत भाजपाला मिळालेला २४० हा आकडा पंतप्रधान नरेंद्र मोदींना खुपला नाही. पण तो हिंदूंना खुपला. त्यानंतर हळूहळू हिंदू संघटीत होत गेले. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात मविआने संपूर्णपणे ताकद लावल्यामुळे भाजपाची हाराकिरी झाली. तरीही महायुती व मविआच्या मतांमध्ये केवळ ०.०३ टक्क्यांचा म्हणजे दोन लाख मतांचा फरक होता. लोकसभेच्या निकालानंतर देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सातत्याने भाजपाचा पराभव झाला नसल्याचे सांगण्यात येत होते. परंतु, ते ध्यानात घेतले गेले नाही, याकडे भाऊनी लक्ष वेधले. तसेच २०१९ पासून देवेंद्र फडणवीस यांची पाच वर्ष यथेच्छ टिंगल केली गेली. मात्र, त्यांनी संयम बाळगून आज इतर सर्वांना चेष्टेचा विषय केला आहे, असा टोला तोरसेकर यांनी मारला.

सध्या सक्षम विरोधी पक्ष नसल्यामुळे राजकारणाचा `चुथडा' झाला आहे. एकेकाळी महाराष्ट्रात अभ्यासू विरोधी आमदारांची फळी होती. परंतु, आता ती फळी संपल्यामुळे लोकशाहीपुढे आव्हान निर्माण झाले आहे, अशी खंत भाऊ तोरसेकर यांनी व्यक्त केली. प्रारंभी विश्वास संस्थेचे संजय वाघुले व संस्थेच्या सदस्या वृषाली वाघुले यांच्याकडून भाऊ तोरसेकर यांचे स्वागत करण्यात आले. तर, सूत्रसंचालन मकरंद मुळे यांनी केले.