मुंबई : देशाच्या अर्थव्यवस्थेच्या ( Economy ) दुसर्या तिमाहीचे निकाल जाहीर झाले असून त्यामध्ये देशाच्या अर्थव्यवस्थेची वाढ ही ५.४ टक्के इतकी झाली आहे. देशाच्या शहरी भागातील घटलेली मागणी आणि अन्नधान्याच्या वाढलेल्या किमती यामुळे देशाच्या अर्थवृद्धीच्या दरात काहीशी घट झाल्याचे दिसून येत आहे.
जुलै ते सप्टेंबर या तिमाहीचे निकाल जाहीर झाले असून त्यामध्ये देशाच्या अर्थव्यवस्थेची वाढ ही ५.४ टक्के दराने झाल्याचे समोर आले आहे. याच कालखंडात चीनचा जीडीपी ४.६ इतकाच असल्याचेदेखील समोर आले आहे. देशाच्या कृषिक्षेत्राच्या मूल्यवर्धित दर हा या तिमाहीत ३.४ टक्के झाला असून, गेल्यावर्षी याच कालखंडात तो १.७ टक्के इतकाच होता. मात्र, उत्पादनक्षेत्राची या तिमाहीमध्ये समाधानकारक कामगिरी झालेली नाही. देशात अन्नधान्याच्या किमतीमध्ये वाढ झाली असून, हवामानाचा फटका हे यामागील प्रमुख कारण. तसेच, उच्च कर्ज दर आणि स्थिर वेतनवाढ या घटकांचा प्रभाव अर्थव्यवस्थेवर पडला असल्याचे दिसून येते. दुसर्या तिमाहीमध्ये उत्पादनक्षेत्राचा विकास दर हा २.२ टक्के होता, तर खाणकामक्षेत्राचा विकासदर हा उणे एक टक्के इतका होता. मात्र, बांधकामक्षेत्रात वाढत्या स्टीलच्या मागणीमुळे ७.७ टक्के वाढ झाली असून, सेवाक्षेत्रामधील वाढ ही ७.१ टक्के इतकी नोंदवण्यात आली आहे. त्याचवेळी हॉटेल उद्योग आणि वाहतूकक्षेत्राची वाढ ही सहा टक्के नोंदवली गेली आहे.
भांडवली बाजारामध्ये तेजी,
गुंतवणूकदारांची खरेदीला पसंती
भांडवली बाजारात गुंतवणूकदारांनी भारतीय अर्थव्यवस्थेवर विश्वास दाखवत जोरदार खरेदी केली. त्यामुळे शुक्रवार, दि. २९ नोव्हेंबर रोजी भांडवली बाजारामध्ये तेजी दिसून आली. दिवसाअखेर ‘सेन्सेक्स’ ७५९.०५ अंकांच्या वाढीसह ७९,८०२ वर बंद झाला, तर ‘निफ्टी’ २१६.९५ अंकांची उडी घेऊन २४१३१ .१० वर बंद झाला. रिलायन्स, अदानी, एअरटेल, एचडीएफसी बँक यांसारख्या कंपन्यांच्या समभागामध्ये तेजी दिसून आली, तर इन्फोसिस, आयटीसी, टीसीएस आणि पॉवर ग्रिड या कंपन्यांच्या समभागात घट दिसून आली. मात्र, भांडवली बाजारातील वाढीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर गुंतवणूकदारांचा विश्वास असल्याचे चित्र अधिक ठळकपणे दिसून आले आहे.