नवी दिल्ली : महाराष्ट्र आणि हरियाणा या राज्यातील निवडणुकांमध्ये पराभवाची धूळ चाखल्यानंतर काँग्रेस पक्षाने आता दिल्ली विधानसभेच्या निवडणुका स्वतंत्र लढणार असल्याची माहिती माध्यमांना दिली. काँग्रेसचे शहर प्रमुख देवेंद्र यादव यांनी २९ नोव्हेंबर रोजी जाहीर केले की काँग्रेस पक्ष ७० जागा लढवणार असून, इतर कुठल्याही पक्षासोबत युती करणार नाही.
२०२० साली झालेल्या दिल्लीच्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये काँग्रेस पिछाडीवर गेली होती. मुख्यमंत्री पदाचा दावेदर कोण असेल याची विचारणा केली असता, यादव यांनी सांगितले की आम्ही निवडणुक जिंकल्यानंतरच आमच्या नेत्याची निवड करू. तसेच आम्ही इतर कुठल्याही पक्षासोबत जाणार नसून, स्वबळावर निवडणुक लढवणार आहोत.
'आप'वर दिल्ली नाराज
दिल्ली न्याय यात्रेच्या दरम्यान, यादव दिल्लीच्या राजकीय वातावरणावर भाष्य करताना म्हणाले की लोकांच्या मनामध्ये आम आदमी पक्षाच्या कामाबद्दल मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली गेली आहे. वाढती बेरोजगारी, महागाई याच्या जोडीला पर्यावरणाचा ढासळणारा तोल, दिल्लीच्या नागरिकांना अशा अनेक समस्यांना तोंड द्यावा लागत आहे. आम आदमी पक्षाने मोहाल्ला क्लिनीकची निर्मीती केली, परंतु ती सुद्धा केवळ दिखाव्यापुरती आहे. नागरिकांना त्याचा काही एक फायदा अद्याप तरी झाला नाही. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस नेते प्रियव्रत सिंग यांची ‘वॉर रूम’च्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ऐतिहासिकदृष्ट्या, दिल्ली हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता.परंतु अलीकडीच्या काळात मात्र काँग्रेसला संघर्ष करावा लागला असून, मागच्या दोन लढतींमध्ये एकही जागा काँग्रेसला जिंकता आली नाही.