राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचा काश्मिरी विद्यार्थ्यांशी संवाद

    30-Nov-2024
Total Views |
Kashmiri Students

मुंबई : केंद्रीय गृह मंत्रालयाच्या ‘मेरा युवा भारत : वतन को जानो’ कार्यक्रमांतर्गत मुंबई भेटीवर आलेल्या काश्मीरच्या १२५ युवक-युवतींनी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन ( C. P. Radhakrushnan ) यांची शुक्रवार, दि. २९ नोव्हेंबर रोजी राजभवन येथे भेट घेऊन संवाद साधला. ‘नेहरू युवा केंद्र संघटन संस्थे’तर्फे या मुंबई भेटीचे आयोजन करण्यात आले होते. “काश्मीर हा भारताचा सर्वात सुंदर प्रदेश आहे आणि जीवनात एकदा तरी काश्मीरला भेट देण्याची इच्छा प्रत्येक भारतीयाला असते,” असे सांगून एम. जी. रामचंद्रन यांच्या तामिळ चित्रपटात आपणास काश्मीरचे दर्शन घडल्यापासून आपण काश्मीरला भेट देण्याचे स्वप्न बाळगून असल्याचे राज्यपालांनी सांगितले.

“परस्परांना समजून न घेतल्यास समस्या निर्माण होतात असे सांगून, एक दुसर्‍याच्या प्रदेशाला भेट दिल्यास आपण परस्परांना चांगले समजून घेऊ शकतो,” असे राज्यपालांनी सांगितले. “या दृष्टीने काश्मीरच्या युवकांची महाराष्ट्र भेट परस्पर संबंध दृढ करण्यास उपयुक्त ठरेल,” असे राज्यपालांनी सांगितले. “काश्मीर हे भारताचे अभिन्न अंग असून, पुढेदेखील ते राहील,” असे प्रतिपादन राज्यपालांनी केले. “आपण सर्वांनी एक देश म्हणून राहिल्यास जगातील कोणतीही महाशक्ती आपल्याला आव्हान देऊ शकणार नाही,” असे राज्यपालांनी सांगितले.

दरम्यान श्रीनगर, अनंतनाग, कुपवाडा, बारामुल्ला, बडगाम आणि पहलगाम या जिल्ह्यातील युवक युवतींनी राज्यपालांशी प्रश्नोत्तर रूपाने संवाद साधला.