नवी दिल्ली : भाजपने दिल्लीच्या उत्तम नगरमधील आम आदमी पक्षाचे (आप) आमदार नरेश बालियान यांची एक ऑडिओ क्लिप जारी केली आहे, ज्यामध्ये ते एका गुंडाशी बोलत आहेत. भाजपचे ( BJP ) म्हणणे आहे की बालियान यांचे गुंडांशी संबंध असून ते खंडणीची टोळी चालवतात. भाजपने बालियान यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते गौरव भाटिया म्हणाले, 'आप'चे खंडणखोर नरेश बालियान गुंडाशी बोलत आहेत. त्यांचे वागणे असे आहे की जणू एका आईचे दोन भाऊ आहेत. बिल्डरला धमकावून त्याच्याकडून मिळालेले पैसे हवालानुसार वाटून घेतले जातील, असे या ऑडिओमध्ये बोलले जात आहे. त्यामुळे जनतेने आपला दारू घोटाळा करण्यासाठी किंवा खंडणीचे रॅकेट चालवण्यासाठी निवडून दिले नव्हते, असा टोला भाटिया यांनी लगावला आहे.
दिल्ली भाजपचे प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र सचदेव यांनीही नरेश बालियान यांच्यावर हल्लाबोल केला आहे. तपास यंत्रणेने या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, असे ते म्हणाले. सापडलेल्या पुराव्याच्या आधारे आमदार फरार होण्यापूर्वी त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी. दिल्लीच्या जनतेने निवडून दिलेले लोक राजधानीतील जनतेची लूट करत आहेत. त्याचे धागेदोरे रोहिंग्या आणि बांगलादेशी यांच्याशीही जोडलेले आहेत. आप नेते आणि आमदार जे खेळ खेळत आहेत ते दिल्लीतील जनतेच्या सुरक्षेसाठी मोठे आव्हान आहे. अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाने दिल्लीला गुन्हेगार आणि भ्रष्टाचाऱ्यांचे अड्डे बनवले आहे, असाही आरोप त्यांनी केला आहे.