मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते, राष्ट्रवादीचे माजी मंत्री बाबा सिद्दिकी ( Baba Siddiqui ) यांची ऑक्टोबरमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. सिद्दिकी यांचे पुत्र, आमदार झिशान सिद्दिकी यांच्या वांद्रे इथल्या निर्मलनगर परिसरातील कार्यालयाबाहेरच ही घटना घडली होती. माजी आमदार बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली. या प्रकरणात अटकेत असलेल्या सर्व २६ आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा म्हणजेच 'मोक्का' लावण्यात आला. लॉरेन्स बिश्नोई गॅंगकडून बाबा सिद्दीकी यांची हत्या घडवून आणल्याचा आरोप आहे. तर या प्रकरणी अनमोल बिश्रोई हा मुख्य सूत्रधार असून त्याला दुसऱ्या एका प्रकरणात अमेरिकेत अटक करण्यात आली. याप्रकरणी अद्यापही तीन आरोपी फरार आहेत.
बाबा सिद्दिकी यांच्यावर १२ ऑक्टोबर रोजी आमदार झिशान सिद्दिकी यांच्या वांद्रे इथल्या कार्यालयाबाहेर गोळ्या झाडण्यात आल्या. यानंतर त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांनी प्राण गमावला. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी आतापर्यंत २६ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यामध्ये मुख्य गोळी झाडणारा शिवकुमार गौतम याचा समावेश आहे, तर शुभम लोणकर, जिशान मोहम्मद अख्तर हे आरोपी अजूनही फरार आहेत. लॉरेन्स बिश्नोई गॅंगकडून बाबा सिद्दीकी यांची हत्या घडवून आणल्याचा आरोप आहे. गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला दुसऱ्या एका प्रकरणात अमेरिकेत अटक करण्यात आली आहे.
राजकीय वर्तुळात प्रसिद्ध असलेले बाबा सिद्दिकी हे काँग्रेस पक्षातून तीन वेळा आमदार झाले होते. २००४ ते २००८ या काळात मंत्री राहिलेले बाबा सिद्दिकी यांनी २०२४ च्या फेब्रुवारीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार) प्रवेश केला होता. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरु आहे.
मोक्का म्हणजे नेमकं काय ?
मोक्का म्हणजे (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा). १९९९ मध्ये महाराष्ट्र सरकारने हा कायदा लागू केला. अंडरवर्ल्ड संबंधित गुन्हेगारी नष्ट करणे हा या कायद्याचा मुख्य हेतू आहे. या कायद्यामध्ये अंडरवर्ल्डशी संबंधित खंडणी, गुन्हेगारी, हत्या किंवा हत्येचा प्रयत्न, अपहरण, कमी वेळात जास्त पैसे कमावण्यासाठी केलेले बेकायदेशीर काम या सर्वाचा समावेश होतो.