'शासन आपल्या दारी'चा आंतरराष्ट्रीय गौरव- महाराष्ट्राला प्रतिष्ठेचा 'स्कॉच' पुरस्कार प्रदान

    30-Nov-2024
Total Views |

skoch
 
मुंबई : (Skoch award) महायुती सरकारचा महत्त्वाकांक्षी उपक्रम 'शासन आपल्या दारी'ला प्रतिष्ठीत स्कॉच पुरस्कार प्राप्त झाला आहे. शनिवार, दि. ३० नोव्हेंबर रोजी नवी दिल्ली येथे या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. देशभरातील विविध श्रेणींतील २८० प्रकल्पांमधून 'शासन आपल्या दारी' या महाराष्ट्राच्या मॉडेलची निवड करण्यात आली आहे.
 
तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या या उपक्रमासाठीचा पुरस्कार मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाचे प्रमुख डॉ. अमोल शिंदे यांनी स्वीकारला. याप्रसंगी 'स्कॉच ग्रुप' चे अध्यक्ष समीर कोचर, उपाध्यक्ष डॉ गुरुशरण धंजल, व्यवस्थापकीय संचालक दीपक दलाल उपस्थित होते. 'शासन आपल्या दारी'ने सार्वजनिक सेवा वितरणातील उदाहरण निर्माण केले आहे. आता 'शासन आपल्या दारी २.०' हे लक्ष्य असेल, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे स्कॉच अवार्ड मिळाल्यावर व्यक्त केली आहे.
 
नागरिकांना शासनाचे विविध लाभ कुठल्याही अडथळ्याविना, सुलभरीत्या त्यांच्यापर्यंत मिळावेत म्हणून सुरु करण्यात आलेला हा उपक्रम यापुढेही असाच प्रयत्नपूर्वक राबविण्यात येईल. विविध शासकीय योजनांचे लाभ कोणत्याही अडथळ्याविना सर्वसामान्य नागरिकांना मिळावेत, त्यासाठी त्यांना वारंवार सरकारी कार्यालयात चक्कर मारावी लागू नये, त्यासाठी नागरिकांच्या वेळेचा अपव्यय होऊ नये यासाठी 'शासन आपल्या दारी' हा उपक्रम सुरू करण्यात आला होता. आज या उपक्रमाला मानाचा स्कॉच पुरस्कार मिळणे ही निश्चितच आनंदाची आणि अभिमानाची बाब असून याद्वारे सार्वजनिक सेवांच्या यशस्वी वितरणाचे एक आदर्श उदाहरण देशासमोर आले आहे याचा सार्थ आनंद आणि अभिमान वाटत असल्याचे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.