अहिल्यानगर : बॅलेट पेपरवर निवडणूका घेत असतील तर मी आज माझ्या आमदारकीचा राजीनामा देईल, असे वक्तव्य शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केले होते. यावर भाजप नेते राहुल नार्वेकरांनी सुप्रिया सुळेसुद्धा राजीनामा देणार का? ते आव्हाडांना विचारा, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
शनिवार, ३० नोव्हेंबर रोजी राहुल नार्वेकर यांनी शिर्डीला साईबाबांचे दर्शन घेतले. नव्या सक्षम सरकारच्या माध्यमातून या राज्याची सेवा करण्याची बुद्धी सर्वांना प्राप्त व्हावी. राज्यातील बळीराजा, गोरगरीब कामगार-मजूरींचे कल्याण होवो आणि तमाम जनतेला चांगले आयुष्य लाभो, अशी प्रार्थना त्यांनी साईबाबांच्याचरणी केली.
हे वाचलंत का? - दरवेळी अंगावर पाऊस पडल्याने...; संजय शिरसाटांचा पवार-ठाकरेंना टोला
त्यानंतर माध्यमांशी बोलताना राहुल नार्वेकर म्हणाले की, "संविधानिकरित्या होत असलेल्या कामांवर त्यांचा विश्वास नाही. त्यामुळे सुप्रिया सुळेसुद्धा राजीनामा देणार आहेत का? हे जितेंद्र आव्हाडांना विचारा. हा सगळा रडीचा डाव असून सुज्ञ जनता यावर विश्वास ठेवणार नाही."
"विरोधकांकडून सातत्याने रडीचा खेळ होतच आहे. लोकसभेला याच ईव्हीएम प्रक्रियेतून निवडणूका घेतल्या. त्यावेळी याच विरोधकांनी निवडणूक आयोगाचे कौतुक केले आहे. ज्या ज्या वेळी त्यांच्या ईच्छेविरुद्ध एखादी घटना घडते त्यावेळी संबंधित संस्थेला दोषी ठरवणे, हा त्यांचा नेहमीचाच प्रकार आहे. सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगावरसुद्धा त्यांनी टीका केल्या. त्यामुळे कोणत्याही संविधानिक संस्थेवर त्यांचा विश्वास नाही. यातून त्यांच्या मनात संविधानाबद्दल किती आदर आहे, हे दिसून येते," अशी टीका त्यांनी केली.
तसेच येत्या ५ तारखेच्या सुमारास शपथविधी होऊन सरकार स्थापन होईल, असेही ते म्हणाले. सरकार स्थापनेबाबत शरद पवारांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना राहुल नार्वेकर म्हणाले की, "२००४ मध्ये स्पष्ट बहुमत असतानाही सरकार स्थापन व्हायला अनेक दिवस लागले. अशी कितीतरी उदाहरणे आहेत. पण हे सरकार स्थापन होत असताना आमच्यासोबत असलेल्या समविचारी पक्षांना विश्वासात घेऊन, त्यांच्याशी चर्चा करून स्थिर आणि मजबूत सरकार स्थापन करणे, हे आमचे ध्येय आहे. त्यामुळे ५-६ दिवसांनी एवढा काही मोठा फरक पडत नाही. योग्यवेळी सरकार स्थापन होईल."