ठाणे : श्रीफळ अर्थात नारळाचा उपयोग मंगल कार्यासाठी करण्यात येतो. नारळापासून अनेक खाद्यपदार्थही तयार करण्यात येतात. पण नारळापासून मुखवटा आणि तोही महालक्ष्मी ( Mahalakshmi ) देवीचा तयार झाला तर.. ऐकून काहीसे आश्चर्य वाटेल. पण ही किमया घडवली आहे, ठाणे पाचपाखाडी परिसरात राहणा-या दत्तात्रय खराटकर या मूर्तीकाराने. ठाण्यातील त्यांच्या कारखान्यात नारळावर बनवलेले हे मुखवटे हारिने मांडून ठेवण्यात आले आहेत. दरवर्षी असे शेकडो मुखवटे हा हरहुन्नरी कलाकार घडवत असतो.
मार्गशीर्ष महिन्यात महालक्ष्मी देवीची पूजा करण्यात येते. अनेक घरांमध्ये ही परंपरा अव्याहतपणे सुरू आहे. येत्या आठवड्यात मार्गशिर्ष महिन्यातील पहिला गुरुवार असुन त्यासाठी गृहिणींचीही लगबग सुरू झाली आहे. देवी पुजनासाठी देवीची सुबक मूर्ती किंवा मुखवटा वापरला जातो. यासाठी कलावंत दत्तात्रय खराटकर यांनी नारळावर तयार केलेला मुखवटा केवळ सुरेखच नाही, तर तो तितकाच रेखीव आहे. नजाकतीने बनवण्यात आलेल्या या मुखवट्यात देवीचे मंगलमय रूपच अविष्कृत होत असते. हा मुखवटा बनवताना त्यात नारळाचा वापर करण्यात आल्याने देवीचे चार गुरुवार पूजन झाल्यावर उद्यापन करून मग हा देवीचा मुखवटा विसर्जित करता येतो. श्रीफळाचा असा पर्यावरणपूरक वापर करून खराटकर यांनी एकप्रकारे निसर्ग संवर्धनाला हातभार लावला आहे.
मार्गशिर्ष महिन्यातील गुरुवारच्या महालक्ष्मी व्रतासाठी नारळावर कोरीव काम करून मुर्ती साकारण्यात आली आहे. चार गुरुवारी देवी पुजनाच्या व्रतानंतर महालक्ष्मी रुपातील हा नारळ पाण्यात विसर्जित करण्याचे आवाहन दत्तात्रय खराटकर यांनी केले आहे.