पुणे : गदिमा प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा ‘गदिमा पुरस्कार’ यंदा ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे ( Asha Kale ) यांना जाहीर झाला आहे. सोबतच गदिमांच्या पत्नी विद्याताई माडगूळकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा ‘गृहिणी सखी सचिव पुरस्कार’ दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या पत्नी प्रिया बेर्डे यांना, तर ‘चैत्रबन पुरस्कार’ प्रसिद्ध कथा, पटकथा, संवादलेखक, गीतकार क्षितीज पटवर्धन, ‘विद्या प्रज्ञा पुरस्कार’ प्रसिद्ध गायिका मनीषा निश्चल यांना जाहीर झाला आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्वस्त आनंद माडगूळकर यांनी शुक्रवार, दि. २९ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली. आधुनिक महाराष्ट्राचे वाल्मिकी ग. दि. माडगूळकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त दि. १४ डिसेंबर रोजी संध्याकाळी ५ वाजता टिळक स्मारक मंदिर येथे होणार्या गदिमा स्मृती समारोहात या पुरस्कारांचे वितरण होणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ नाटककार श्रीनिवास भणगे उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यानिमित्त गदिमांचे निकटवर्ती स्नेही तथा ज्येष्ठ लेखक डॉ. न. म. जोशी यांचा प्रतिष्ठानच्यावतीने विशेष सत्कार करण्यात येणार आहे. पुरस्कार प्रदान सोहळ्याच्या उत्तरार्धात गदिमांचे कनिष्ठ बंधू डॉ. अंबादास माडगूळकर यांच्या स्मरणार्थ गदिमा पुरस्कार विजेत्या आशा काळे यांच्या आवडीच्या गदिमा गीतांचा खास कार्यक्रम स्वरानंद प्रतिष्ठानतर्फे सादर केला जाणार आहे.