मोठी बातमी! अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न

    30-Nov-2024
Total Views |

Arvind Kejriwal
 
नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्ली येथे एका अज्ञात व्यक्तीने आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल  (Arvind Kejriwal) यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पदयात्रेवेळी ग्रेटर कैलास येथे ही घटना घडली आहे. याप्रकरणात हल्ला करणाऱ्या संबंधिताला दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच त्याला आप समर्थकांनी मारहाण केली आहे.
 
या घटनेच्या व्हि़डिओमध्ये अरविंद केजरीवाल यांच्या पदयात्रेचा भाग म्हणून पक्षाच्या सदस्यांनी वेढलेल्या परिसरात हल्लेखोर फिरत असताना दिसत होता. त्यावेळी अचानकपणे एक अनोळखी व्यक्ती केजरीवाल यांच्या जवळ येतो आणि एका छोट्या बाटलीतून द्रव फेकण्याचा प्रयत्न करतो. यावेळी सभोवताली गर्दी असल्याने संबंधित हल्लेखोराचा प्रयत्न पूरता फसला. त्यावेळी काही समर्थकांनी हल्लेखोराला मारहाण करत पोलिसांच्या ताब्यात दिले.
 
 
 
त्या व्यक्तीने अरविंद केजरीवार यांच्यावर नेमके कोणते द्रव फेकले याप्रकरणाची माहिती अद्यापही समोर आलेली नाही. याप्रकरणात हल्लेखोरांची ओळख पटली नसल्याची माहिती आहे. याआधी अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ले करण्यात आले होते. शाईफेक, चप्पलफेक असे हल्ले करण्यात आल्याचा प्रकार घडला होता.