देशात सध्या सणासुदीच्या दिवसात वैभव म्हणून सुवर्ण खरेदी करून घरी आणले जाते. रिझर्व्ह बँकेने देखील परदेशातील देशाचे सुवर्ण मायदेशी आणले. ही जशी देशाची संपत्ती तसेच उत्तम कामगिरी करणारे खेळाडू ही देखील देशाची संप्पतीच. मात्र, अनेक खेळांना राष्ट्रकुल मधून बाहेर करण्यात आले आहे. त्यामुळे भारताच्या पदकतालिकेवर परिणाम होणार नक्की...
रिझर्व्ह बँकेच्या सुवर्णसाठ्यात 102 टनांची भर. या बातमीने दिवाळीच्या काळात सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. सोने खरेदीसाठी मुहूर्ताच्या मानल्या जाणार्या धनत्रयोदशीला भारतातील केवळ घरगुती ग्राहकांनीच नव्हे, तर जागतिक पातळीवरील घडामोडींवर लक्ष ठेवत, भारताच्या रिझर्व्ह बँकेनेदेखील तब्बल 102 टन सोने बँक ऑफ इंग्लंडमध्ये असलेल्या आपल्या सेफ डिपॉझिट व्हॉल्टमधून घरातल्या तिजोरीत आणून ठेवले. जागतिक स्तरावरील रशिया-युक्रेन युद्धामुळे, इराण-इस्त्रायल युद्धाने सोन्याची मागणी कधी घटली, तर कधी सोने खरेदी वाढल्याने त्याच्या भावावर परिणाम होताना दिसला. अशा युद्धजन्य परिस्थितीने अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर सोने खरेदीचा परिणाम होत असतो. भारतातील अजूनही खालच्या स्तरावरील जनता सोने खरेदी करायला आर्थिक कमकुवतेने पुढे येताना दिसत नाहीत. अशा विविध कारणांमुळे सुरक्षित गुंतवणूक, पारंपरिक महत्त्व आणि आंतरराष्ट्रीय स्थितीमुळे सोने महाग होत असल्याने त्याच्या खरेदीवर परिणाम होऊन त्यात घट होतानादेखील अनेकदा दिसत आली आहे. असे हे सुवर्ण, ज्याप्रमाणे अर्थकारणात मोलाची भूमिका पार पाडत असते, तशीच मोलाची भूमिका ते सुवर्ण क्रीडाविश्वातही पार पाडत असते.
क्रीडाविश्वातही ’सुवर्ण पदकां’च्या स्वरुपात हे सोन्याचे चढउतार होत असतात. आज देशभरात चालू असलेली सणासुदीची धामधुम, तसेच काही राज्यात होत असलेल्या निवडणुकांची धामधुम, या बातम्यांमध्ये भारताच्या सुवर्णसाठ्यात घट या वार्तेकडे क्रीडाप्रेमी बहुदा हवे तेवढे ध्यान देताना दिसले नाहीत. धनत्रयोदशीला सोन्याच्या बातमीनंतर नरकचतुर्दशीला दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर भारतीय शेअर बाजार सपाट उघडल्याची बातमी आपण ऐकली असेल. बाजारपेठेतील तज्ज्ञांच्या मते, यंदाच्या दिवाळीत शेअर बाजारात मोठे फटाके वाजण्याची शक्यता नव्हती. हे फटाके जसे शेअर बाजारात मोठ्या प्रमाणावर वाजले नाहीत. तसे फटाके नंतर क्रीडाप्रेमींनाही मोठ्या प्रमाणावर आता वाजवता येणार नाहीत. यामागचे मोठे कारण आहे ते कॉमनवेल्थ गेम्स, सीडब्ल्यूजी अर्थात राष्ट्रकुल क्रीडास्पर्धांमधील क्रीडाप्रकारांची कपात. असे काही क्रीडाप्रकार आता त्यात खेळवले जाणार नाहीत की, ज्यात भारतीय खेळाडू हमखास पदके आणि तीदेखील सुवर्णपदके मिळवून भारतीयांना आनंदी करतील आणि त्यांना फटाके उडवून त्याचा आनंद द्विगुणीत करता येईल.
जागतिक क्रीडाक्षेत्रात, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा (कॉमनवेल्थ गेम्स, सीडब्ल्यूजी) ही ऑलिम्पिक आणि आशियाई क्रीडा स्पर्धा यांच्या पाठोपाठ तिसर्या क्रमांकाची स्पर्धा मानली जाते. राष्ट्रकुल खेळ ही राष्ट्रकुल परिषदेमधील सभासद राष्ट्रांची एक क्रीडा स्पर्धा असून इ. स. 1930 सालापासून राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा दर चार वर्षांनी भरवल्या जातात. सुरूवातीस ब्रिटिश एम्पायर खेळ नंतर इ. स. 1954 सालापासून ब्रिटिश एम्पायर व राष्ट्रकुल खेळ व इ. स. 1970 सालापासून ब्रिटिश राष्ट्रकुल खेळ या नावांनी ही स्पर्धा ओळखली जात असे. 1978 साली ‘राष्ट्रकुल खेळ’ हे नाव या स्पर्धेला दिले गेले. ‘कॉमनवेल्थ गेम्स फेडरेशन’ ही लंडन येथे मुख्यालय असलेली संस्था या खेळांचे आयोजन करण्यास जबाबदार आहे. राष्ट्रकुल खेळांत अनेक ऑलिम्पिक क्रीडाप्रकार तसेच, इतर काही विशेष क्रीडाप्रकार घेतले जातात. राष्ट्रकुल परिषदेचे 54 सदस्य असले, तरीही राष्ट्रकुल खेळांमध्ये 71 देश भाग घेतात. अनेक ब्रिटिश परकीय प्रदेश तसेच युनायटेड किंग्डममधील इंग्लंड, स्कॉटलंड, आयर्लंड व वेल्स हे घटक देश वेगवेगळे संघ त्या स्पर्धेत खेळण्यासाठी पाठवतात. प्रारंभी एकूण 71 देश त्याचे यजमानपद घेण्यात रस घेत असत. परंतु, आज मात्र दिवसेंदिवस नको रे बाबा या स्पर्धेचे यजमानपद असा एक मतप्रवाह जोर धरताना आढळत आहे. आज का होत आहे या स्पर्धेच्या बाबतीत असे, हा एक मोठा प्रश्न क्रीडाप्रेमींपुढे उभा ठाकला आहे.
आगामी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून (कॉमनवेल्थ गेम्स) सहा खेळांना वगळण्यात आले आहे. इंग्लंडमधील ग्लास्गो शहरात 2026 सालामध्ये दि. 23 जुलै ते दि. 2 ऑगस्ट दरम्यान या स्पर्धा नियोजित असून त्यात थलेटिक्स आणि पॅरा थलेटिक्स (ट्रॅक आणि फील्ड), पोहणे आणि पॅरा स्विमिंग, जिम्नॅस्टिक्स, ट्रॅकिंग आणि पॅरा ट्रॅकिंग, नेटबॉल, वेटलिफ्टिंग आणि पॅरा पॉवरलिफ्टिंग, मुष्टियुद्ध, ज्युडो, बोल्सचा समावेश आहे. तसेच, पॅरा बाऊल्स, 3ु3 बास्केटबॉल आणि 3ु3 व्हीलचेअर बास्केटबॉल हे क्रीडाप्रकार समाविष्ट केले गेले आहेत. यामध्ये नेमबाजी, हॉकी, कुस्ती, बॅडमिंटन, टेबल टेनिस, स्क्वॅश व क्रिकेट या खेळांचा समावेश न करण्याचा निर्णय संयोजकांनी घेतला आहे. या नियोजित राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या क्रीडाप्रकारातून क्रिकेट, हॉकी, कुस्ती वगैरेंना का वगळले असावे, या कारणांमागे सर्वात मोठे कारण म्हणजे या खेळांसाठी आवश्यक असणार्या पायाभूत सुविधा आणि त्यासाठी येणारा खर्च. राष्ट्रकुल स्पर्धा ग्लासगोतील केवळ चार केंद्रांवर पार पडणार आहेत. या चारही केंद्रांपैकी एकाही केंद्रावर क्रिकेट आणि हॉकी खेळासाठी लागणार्या साध्या पायाभूत सुविधा म्हणजे आवश्यक अटींनुसार मैदाने उपलब्ध नाहीत. केवळ राष्ट्रकुल स्पर्धेसाठी या दोन खेळांची मैदाने उभी करण्याची आर्थिक क्षमता ग्लासगो शहराने दाखवली नाही. या दोन खेळांच्या मैदानावर सर्वाधिक खर्च होऊ शकला असता हा विचार करून हे खेळ वगळण्यात आले. कुस्ती आणि अन्य वगळलेल्या खेळांबाबत विचार करायचा झाल्यास यजमान देशाने आपल्या या खेळातील क्रीडा क्षमतेचा अधिकार वापरला असे म्हणता येईल. या अन्य खेळात स्कॉटलंडचे फारसे खेळाडू उपलब्ध नाहीत किंवा या खेळांचा देशात फारसा प्रसार झालेला नाही. यामुळे त्यांनी या खेळांना वगळण्याचा निर्णय घेतला असावा. असे मतप्रवाह राष्ट्रकुल क्रीडास्पर्धेला कमी महत्त्वाची स्पर्धा ठरवण्यात कारणीभूत ठरत आहेत. असे मत होण्याला अजून कारणीभूत ठरत आहे ती त्याची कमी स्पर्धात्मकता, उच्च श्रेणीतील (सुपरस्टार) खेळाडूंचा यास्पर्धांमध्ये भाग घेण्याचा निरुत्साह.
मागच्याच वर्षी ऑस्टेलियाच्या व्हिटोरीया (व्हिक्टोरीया) प्रांताने 4.5 बिलियन डॉलर्सचा खर्च आपल्या खिशाला परवडणारा नसल्याचे सांगत आपण राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे यजमान पद स्वीकारु शकत नसल्याचे राष्ट्रकुल क्रीडा महासंघाला कळवले होते आणि तेव्हा लगेचच कॉमनवेल्थ गेम्स महासंघ दुसर्या यजमानाच्या शोधाला लागला होता. नवीन यजमान शोधत महासंघाने मलेशियाकडे ते यजमानपद स्वीकारणार का अशी विचारणा केली. त्यासाठी महासंघाने मलेशियाला काही मदत ही देऊ केली. या बहुविध क्रीडा स्पर्धेत काही क्रीडाप्रकार वगळूनही बराच खर्च करावा लागतो. एवढ्या कमी वेळात तयारी करणे अनेकांना अवघडच असते. देशाच्या अर्थकारणाचा विचार करावा लागतो. हे सगळे पैलू लक्षात घेत मलेशियानेही यजमानपद नाकारले.
दिल्लीत झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेची पातळी उंचावण्यासाठी आणण्याचे प्रयत्न केले गेले, तेव्हा आठ वेळा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता उसेन बोल्ट याला ही स्पर्धा खूपच सरासरी सामान्य दर्जाची वाटली होती. या कल्पनेने बोल्टला रोमांचित करत आकर्षित केले नव्हते. याच उसेन बोल्टने 2014 सालच्या ग्लासगो येथील राष्ट्रकुल स्पर्धेत सहभाग घेतला होता. पण, बोल्टने त्याच्या आवडत्या असलेल्या 100 आणि 200 मीटर धावण्याच्या स्पर्धेत सहभाग न घेता तो फक्त 4ु100च्या रिलेमध्ये धावला होता. त्या राष्ट्रकुल स्पर्धेचे यजमानपद 2010साली भारताने स्वीकारले होते. ते खेळांपेक्षा आर्थिक कारणांनेही कसे गाजले होते हे अनेकांना स्मरत असेल. दिल्ली 2010 सालच्या राष्ट्रकुल स्पर्धेचा प्रत्यक्ष खर्च बजेटपेक्षा तब्बल 16 टक्क्यांनी जास्त झाला होता. त्याच्यावर पक्षपातीपणासह अनेक दोषारोपही झाले होते. आज तब्बल 164 वर्षे जुनी असलेल्या घटनात्मक संस्थेने म्हणजे कॅग अर्थात (द कन्ट्रोलर अॅण्ड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया) या यंत्रणेच्या अध्यक्षांनी तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग यांना राष्ट्रकुल स्पर्धेत सुरेश कलमाडींच्या भ्रष्टाचाराबद्दल धारेवर धरले होते. त्याचबरोबर दिल्लीच्या तत्कालीन महापौर शिला दिक्षित यांच्यावरही आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप ठेवले होते. नरेंद्र मोदींनी 2010 सालच्या दिल्ली राष्ट्रकुल स्पर्धेने विश्वभरात सर्वत्र भारताची कशी अपकीर्ति झाली होती, त्याबद्दल ‘जी-20’ परिषदेच्या यशस्वी आयोजनानंतर आपल्या एका व्याख्यानात त्यांनी मत व्यक्त केले होते. मोदींनी सद्य सरकारची तुलना युनायटेड प्रोग्रेसिव्ह अलायन्स (यूपीए) अर्थात संयुक्त प्रगतीशिल आघाडीतील मुख्य पक्ष असलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या नेतृत्वाखाली असलेल्या सरकारशी केली आहे.
दिग्गज खेळाडूंच्या अनुपस्थितीमुळे राष्ट्रकुल स्पर्धेच्या आर्थिक संभाव्यतेला आता धक्का बसू लागला आहे. कारण, प्रायोजक त्याकडे पाठ फिरवू लागले आहेत. त्यामुळेच त्याच्या आयोजनाला पैशांची चणचण आता भासत आहे. मागील राष्ट्रकुल क्रीडास्पर्धा 2022 साली इंग्लंडच्या बर्मिन्गहॅम येथे झाल्या होत्या. तेव्हाच्या पदकतालिकेत 67 सुवर्ण पदके पटकावून ऑस्ट्रेलिया प्रथम, 57 सुवर्ण पदके पटकावून इंग्लंड दुसर्या, 26 सुवर्ण पदके पटकावून कॅनडा तिसर्या, तर पाचव्या स्थानावर 20 सुवर्णपदके मिळवणार्या न्यूझीलंडच्या वर चौथ्या स्थानावर 22 सुवर्ण पदके भारताने पटकावत समाधानकारक कामगिरी केली होती. राष्ट्रकुल स्पर्धेतील हॉकी आणि कुस्ती या क्रीडाप्रकारांच्या बाबतीत आपल्या शेजारी देशाने गेल्या काही वर्षांत, पाकिस्तानने राष्ट्रकुलमधील सहभागामध्ये एकूण 27 सुवर्ण, 27 रौप्य आणि 28 कांस्य पदके मिळवली आहेत. अलीकडील निर्णयांचा देशाच्या एकूण कामगिरीवर आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रातील प्रतिनिधित्वावर गंभीर परिणाम होऊ शकतो, अशा स्थितीवर भारताचा शेजारी आणि पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्ताननेही राष्ट्रकुल स्पर्धेतील काही लोकप्रिय क्रीडाप्रकारांना वगळण्यात आल्याबद्दल आपली नाराजी व्यक्त केली आहे. गेल्या सप्टेंबरमध्ये मालदीवमध्ये झालेल्या प्रादेशिक बैठकीदरम्यान, ‘पाकिस्तान कॉमनवेल्थ गेम्स असोसिएशन’ने सीजीएफ अधिकार्यांना औपचारिक आवाहनाद्वारे हॉकी आणि कुस्तीचा समावेश करण्याची शिफारस केली. आता होणार्या आगामी राष्ट्रकुल क्रीडास्पर्धेत या खेळांना त्यातून वगळ्यात तर आले आहेच. पण, त्याचबरोबर शुटिंग, नेटबॉल, रस्त्यावरील सायकल शर्यती हे खेळही त्या वगळण्यात आलेल्या एकूण नऊच्या यादीत घातलेले आहेत. आता ही 16 रौप्य आणि 23 कांस्य पदके तर आगामी स्पर्धेत आपल्या पदकतालिकेत नसतीलच शिवाय 22 सुवर्णपदक पुढच्या वेळेपासून मिळणार नसल्याने भारताच्या पदकांच्या सुवर्णसाठ्यात घट होणार आहे.
बर्मिन्गहॅमच्या स्पर्धेत क्रिकेट प्रथमच समाविष्ट झाले व भारतीय महिलांनी रौप्य पदक जिंकले. सायना नेहवाल, पी. व्ही. सिंधु या बॅडमिंटनपटुंनी या स्पर्धेद्वारेच जगात आपले स्थान निर्माण केले होते. ग्लास्गो स्पर्धेच्या संयोजकांच्या या निर्णयावर भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्ष पीटी उषा यांच्यासह विविध क्रीडा संघटनांनी नाराजी व्यक्त केली. राष्ट्रकुल क्रीडा महासंघ या स्पर्धेत किती आणि कोणत्या खेळांचा समावेश करायचा याचा निर्णय किंवा याबाबतचे अधिकार यजमान देशाला देतो. खर्चाच्या ओझ्यामुळे ही स्पर्धा अंतिम घटका मोजत आहे का? असाही प्रश्न अनेकांना पडलेला आहे. भारताने राष्ट्रकुल स्पर्धेच्या नादी लागू नये, असादेखील एक मतप्रवाह आहे.
आपल्या पदकांच्या सुवर्णसाठ्यात भर घालायला मदतीला येणारे काही क्रीडाप्रकार आता नसले तरी बिघडते कोठे! जेवढ्या क्रीडाप्रकारात भारत उतरेल तेवढ्यात चांगली कामगिरी करून त्यात पदके मिळवायचा प्रयत्न आपण करुया. भारताची जनसंख्या, विविधतेने नटलेला प्रदेश यात लपलेले अनेक क्रीडापटू असे आहेत की, जे राष्ट्रकुल स्पर्धेत उपलब्ध क्रीडाप्रकारात सहभागी होत भारताला अगदीच सुवर्ण नव्हे, तर रौप्य आणि कांस्य पदके पटकावून देऊ शकतात आणि तसे त्यांनी मागील स्पर्धेत करुनही दाखवल आहे. अशा सोन्यासारख्या क्रीडापटूंना लवकरात लवकर लॉकरमधून काढून त्यांना झळाळी आणत जगापुढे आपण मांडू. उर्वरित क्रीडाप्रकारातले एक उदाहरण त्यासाठी पुरेस आहे. भारताने बर्मिन्गहॅममध्ये जी कामगिरी केली होती तीदेखील स्पृहणीयच होती. 2022 सालच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय लॉन बॉल्स क्रीडाप्रकारात सहभाग घेतलेल्या चार महिलांचा असलेल्या भारतीय महिला संघाने अंतिम फेरी गाठून इतिहास रचला होता. रुपा राणी टिर्की, लवली चौबे, पिंकी आणि नयनमोनी सैकिया यांचा समावेश असलेल्या संघाने बर्मिन्गहॅम येथे झालेल्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव करताना भारताला लॉन बाऊल या क्रीडाप्रकारात राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील पहिले सुवर्णपदक जिंकून दिले होते. राष्ट्रकुल खेळ 2022 सालासाठीचा भारतीय पॅरा खेळाडूंचा संघ लोकप्रिय ठरला होता. ठराविक क्रीडाप्रकारात न अडकता उर्वरित खेळातही भारत चांगलीच कामगिरी करु शकतो, हे लोकांनी ध्यानात घ्यायला हवे. त्याने भारतीय क्रीडांगणावरील निराशा दूर होऊ शकेल.
राष्ट्रकुल स्पर्धेबद्दल आपल्या भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या पीटी उषाचे वक्तव्य भारतीय क्रीडाप्रेमींना दिलासा देणारे सकारात्मक आहे. त्यात पीटी उषा सांगते की, माझी राष्ट्रकुल क्रीडा संघटनेच्या अध्यक्षांशी चर्चा झाली असून, त्यांनी मला आश्वासन दिले आहे की, 2026 सालच्या कार्यक्रमातून काही खेळांना वगळण्याचा हा निर्णय कायमचा पायंडा पाडणारा नसेल, भविष्यातील स्पर्धांसाठी या निर्णयाने चुकीचा आदर्श ठरणार नाहीत आणि सर्व राष्ट्रकुल क्रीडास्पर्धांमधील आधीचे क्रीडाप्रकार नंतर होणार्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांसाठी महत्त्वाचे असतील, त्या क्रीडाप्रकारांना भविष्यातील आवृत्त्यांमध्ये परत येण्याची संधी नक्कीच मिळू शकते. तेव्हा अशा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेला परत पूर्वीचे दिवस येवोत आणि भारतीय क्रीडापटूंच्या सुवर्ण(पदकांच्या) साठ्यात घट न होता त्यात रिझर्व्ह बँकेच्या सुवर्णसाठ्यात होत असते, तशी भर पडत राहो. अशी सदिच्छा येथे आपण सारे भारतीय क्रीडाप्रेमी व्यक्त करु.
इति ।
श्रीपाद पेंडसे
(लेखक माजी खेलकूद आयाम प्रमुख, पश्चिम महाराष्ट्र प्रांत, जनजाती कल्याण आश्रम आणि माजी हॉकीपटू आहेत.)
9422031704