मुंबई : भारत विरुध्द न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळविण्यात आली. न्यूझीलंड संघाने मुंबई, वानखेडेवरील अंतिम सामन्यात टीम इंडियाचा २५ धावांनी पराभव करत, अशारितीने तीन्ही सामने जिंकत कसोटी मालिका आपल्या खिशात घातली. तब्बल २४ वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर टीम इंडियाला मायदेशात पहिल्यांदाच क्लीन स्वीपला सामोरे जावे लागले. याआधी २००० साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध क्लीन स्वीपला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर आता २०२४ मध्ये तिसऱ्या सामन्यात न्यूझीलंड संघाने विजय प्राप्त करत टीम इंडियाला व्हाईट वॉश दिला आहे.
दरम्यान, न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत ०-३ अशा पराभवानंतर टीम इंडियाला जागतिक कसोटी चॅम्पियनशिप(डब्ल्यूटीसी) क्रमवारीत मोठा धक्का बसला आहे. आताच्या आकडेवारीनुसार, भारतीय संघ दुसऱ्या स्थानावर घसरला असून अंतिम फेरी गाठणे हे समीकरणही भारतासाठी कठीण झाले आहे. महत्त्वाचे म्हणजे या सामन्याआधी टीम इंडियाची गुणांची टक्केवारी ६२.८२ होती जी आता घसरून ५८.३३ इतकी झाली आहे. ऑस्ट्रेलियन संघ आता पहिल्या स्थानावर आला असून दुसरीकडे, न्यूझीलंडने या विजयासह अंतिम फेरी गाठण्याच्या आपल्या आशा जिवंत ठेवल्या आहेत.
कसोटी मालिका गमाविल्यानंतर कर्णधार रोहित शर्माने पत्रकारांशी संवाद साधला. तो म्हणाला, आम्ही दोन्ही कसोटींमध्ये पहिल्या डावात चांगल्या धावा करू शकलो नाही त्यामुळे आम्ही मागे पडलो. तिसऱ्या कसोटीत आम्ही ३० धावांची आघाडी मिळवली होती त्यानंतर आम्हाला वाटले की आम्ही सामन्यात पुढे आहोत. न्यूझीलंडने दिलेले १४७ धावांचे लक्ष्य नक्कीच गाठण्यासारखे होते. पण आम्हाला चांगली कामगिरी करण्याची गरज होती, असे कर्णधार रोहित शर्माने सांगितले.
तिसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने प्रथम नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना सर्वबाद २३५ धावा केल्या. रविंद्र जाडेजाने पाच विकेट्स घेत निर्णायक गोलंदाजी केली. २३५ धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाने २६३ धावा करत २८ धावांची आघाडी घेण्याचा प्रयत्न केला. यानंतर न्यूझीलंड संघाने १७४ धावा करत टीम इंडियाकरिता विजयासाठी १४७ धावांचे लक्ष्य दिले.
१४७ धावांचे लक्ष्य गाठताना टीम इंडियाने २९ धावांवरच पाच विकेट्स गमावल्या. त्यानंतर आलेल्या यष्टीरक्षक रिषभ पंतने एकाकी झुंज देत महत्त्वपूर्ण ५७ चेंडूत ६४ धावा करत टीम इंडियाला लक्ष्य गाठण्यासाठी पुढे नेले. परंतु, फिरकीपटू अजाज पटेलने त्याला टॉम बंडल करवी झेल बाद केले. एजाज पटेलने दोन्ही डावांत प्रत्येकी ५ व ६ विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर, सामन्याअंती त्याला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. त्याचबरोबर, अंतिम सामन्यात पहिल्या डावात ७१ धावा तर दुसऱ्या डावात १०० चेंडूत ५१ धावा करत महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या विल यंग(३ सामन्यात २४४ धावा)ला मालिकावीर घोषित करण्यात आले.