नाशिक : दुचाकी वेगाने चालविणार्या चालकास हटकल्याचा राग येऊन कामगारनगर येथील काळेनगर भागात राहणार्या माजी नगरसेविका योगिता आहेर ( Yogita Aher ) यांच्या घरावर टोळक्याने दगडफेक केली. तसेच क्षुल्लक कारणावरून वाद घालत बुधवार, दि. २७ नोव्हेंबर रोजी आहेर यांच्यासह त्यांचा मुलगा व भावाला मारहाण केल्याचीदेखील घटना घडली. आहेर यांच्या घरासमोरील रस्त्यावरून दुचाकीस्वार संशयित करण कटारे (२२, रा. संत कबीरनगर) वेगात दुचाकी चालवत होता. यावेळी आहेर यांनी त्याला हटकले व गाडी हळू चालवण्यास सांगितले. त्याचा या दुचाकीस्वाराला राग आला. त्याने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली असता, आहेर यांचा मुलगा आश्लेष व भाऊ युवराज पवार घराबाहेर आले. यावेळी त्या दुचाकीस्वाराने त्याच्या आणखी काही साथीदारांना बोलावून घेतले. संशयित करण याचा भाऊ संशयित महेश कटारे हादेखील त्यांच्यासोबत घटनास्थळी आला. या टोळक्याने आश्लेष व युवराज दोघांना मारहाण करत तेथून पळ काढला. यावेळी करणला दुखापत झाल्याने त्यास शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. आहेर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सातपूर पोलीस ठाण्यात पाच ते सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक राजू पठाण करीत आहेत.