कुलस्वामिनी तुळजाभवानी मंदिराचा जीर्णोद्धार सुरू

29 Nov 2024 11:45:46
Tuljabhawani Temple

मुंबई : कुलस्वामिनी तुळजाभवानी ( Tuljabhawani Temple ) देवीच्या तीर्थक्षेत्राचा कायापालट करण्यासाठी मंदिर समितीच्या स्वनिधीतून ६० कोटी रुपयांची कामे हाती घेण्यात आली आहेत. यातून तुळजाभवानी देवीच्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात येणार आहे. पुजारी वर्ग आणि भाविकांच्या या कामाबाबतच्या सूचनांचा अंतर्भाव करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार जीर्णोद्धाराचे काम पूर्ण केले जाणार असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.

आमदार राणा जगजितसिंह यांनी सांगितले की, “कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या तीर्थक्षेत्राचा संपूर्ण कायापालट करण्यासाठी दोन हजार कोटींचा आराखडा अंतिम करण्यात आला आहे. हा विकास आराखडा उच्चाधिकार समितीकडे सादर करण्यात आला आहे. लवकरच त्यास मान्यता मिळेल आणि प्रत्यक्ष कामास सुरुवात होईल.” दरम्यानच्या काळात तुळजाभवानी मंदिर समितीच्या स्वनिधीमधून मंदिराच्या जीर्णोध्दाराचे काम हाती घेण्यात आले आहे. यासाठी निविदा काढण्यात आली होती. यापूर्वीच कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत. पुढील वर्षभरात हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. ही कामे आता सुरू होणार आहे. यात मंदिराचा जीर्णोद्धार आहे. पुरातत्त्व खात्याच्या निगराणीखाली कुलस्वामिनी तुळजाभवानी देवी मंदिराच्या सभामंडपचा काही भाग पूर्ण उकलून पुन्हा नव्याने मजबूत केला जाणार आहे. त्यासाठी मंदिरातील ओवर्‍या थोड्या मागे घेण्यात येणार आहेत, असे त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकार्‍यांना कामे सुरू करण्याच्या सूचना यापूर्वीच देण्यात आल्या आहेत. कामादरम्यान भाविक, पुजारी बांधव आणि व्यापारी वर्गाला त्याचा त्रास होणार नाही, याची काळजी घेतली जाणार आहे. एक वेळापत्रक ही नागरिकांच्या आणि व्यापारीवर्गाच्या सूचना घेऊन तयार करण्यात येणार आहे. ही सर्व माहिती जनतेसमोर मांडण्यात येणार आहे. कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या तीर्थक्षेत्राचा दर्जा आणि भाविकांच्या सोयी-सुविधांमध्ये यामुळे मोठी गुणात्मक वाढ होईल, असा विश्वास आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला आहे.

मोठे महाद्वार उभारणार
तुळजा भवानी मंदिरासह आसपासंचा भागही मोकळा करून घेतला जाणार असून मोठे महाद्वार उभारण्यात येणार आहे.
लिफ्ट आणि सरकत्या जिन्यांची सोय ज्येष्ठ नागरिकांसाठी करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकात एक मोठी कमानदेखील उभारण्यात येणार आहे.


Powered By Sangraha 9.0