शिर्डी : (Ramdas Kadam) शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी गुरुवार दि. २८ नोव्हेंबर रोजी सहकुटुंब शिर्डीला साईदरबारी पोहोचत साईसमाधीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधतेवेळी महायुतीच्या यशाबद्दल व एकनाथ शिंदेंच्या कारकिर्दीवर भाष्य केले.
"मोदी आणि शाह यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात कोट्यवधींचा निधी येईल आणि अपेक्षेपेक्षा जास्त विकास महाराष्ट्राचा होईल"
रामदास कदम म्हणाले, "महायुतीला जोरदार यश मिळालं असून पुढील दोन दिवसात सरकार स्थापन होणार आहे. साईबाबांनी महायुतीला चांगला कौल दिला आहे. एकनाथ शिंदे यांनी अडीच वर्षात घेतलेले निर्णय जनतेपर्यंत पोहोचले. ज्या पद्धतीने अडीच वर्षात लोकाभिमुख निर्णय महायुती सरकारने घेतले त्याच पद्धतीने चांगले निर्णय महाराष्ट्रात होऊ देत,असे साकडे मी साईंना घातले आहे. पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात कोट्यवधीचा निधी येईल आणि अपेक्षेपेक्षा जास्त विकास महाराष्ट्राचा होईल", असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
हे वाचलंंत का - "उद्धव ठाकरे रात्री २ वाजता आपल्या कुटूंबासह देश सोडून पळून जातील", रामदास कदमांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
"एकनाथ शिंदे यांच्या रूपाने महाराष्ट्राने १८ ते २० तास जनतेचे काम करणारा मुख्यमंत्री पाहिला"
पुढे ते म्हणाले, "मागच्या वेळी आमचा आकडा कमी असताना आम्हाला भाजपच्या वरिष्ठांनी संधी दिली. एकनाथ शिंदे यांच्या रूपाने महाराष्ट्राने १८ ते २० तास जनतेचे काम करणारा मुख्यमंत्री पाहिला. आता भाजपचे १३३ हून अधिक स्वतःचे आमदार, त्यामुळे आम्ही किती मागावे? काय मागावे? याचे भान ठेवलं पाहिजे. आम्हा सर्वांचीच इच्छा की एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत. त्यांना देखील त्यांचा पक्ष चालवायचा आहे. त्यामुळे भाजपचे वरिष्ठ जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. आमच्यात कुठलाही मतभेद नसतील" असे कदम यांनी म्हटले आहे.