हिंदूंच्या रक्षणाची जबाबदारी घ्यावीच लागेल

29 Nov 2024 18:50:55
S. Jaishankar

नवी दिल्ली : मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकार बांगलादेशातील नागरिकांसह अल्पसंख्याकांचे संरक्षण ( Protect Hindus ) करण्यासाठी जबाबदार आहे, असे प्रतिपादन परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी शुक्रवारी संसदेत केले आहे.

बांगलादेशात हिंदूंसह अल्पसंख्याकांवर होत असलेल्या हिंसाचाराबद्दल लोकसभेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना जयशंकर यांनी हे विधान केले. परराष्ट्र मंत्री म्हणाले की, ऑगस्ट २०२४ पासून जेव्हा शेख हसीना यांना बांगलादेशातून पळून जाण्यास भाग पाडले गेले, तेव्हापासून सरकारने हिंदू आणि इतर अल्पसंख्याकांविरूद्ध हिंसाचाराच्या अनेक घटना पाहिल्या आहेत. बांगलादेशात नुकत्याच झालेल्या दुर्गा पूजा उत्सवादरम्यान मंदिरे आणि पूजा मंडपांवर हल्ले झाल्याच्या बातम्याही समोर आल्याचे त्यांनी सांगितले. भारत सरकारने या घटनांची गांभीर्याने दखल घेतली आहे आणि बांगलादेश सरकारला आपल्या चिंता सामायिक केल्या आहेत, असे जयशंकर यांनी आपल्या लेखी उत्तरात नमूद केले आहे.

जयशंकर म्हणाले की, ढाका येथील भारतीय उच्चायुक्तालय बांगलादेशातील अल्पसंख्याकांशी संबंधित परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. अल्पसंख्याकांसह बांगलादेशातील सर्व नागरिकांच्या जीवनाचे आणि स्वातंत्र्याचे रक्षण करण्याची प्राथमिक जबाबदारी बांगलादेश सरकारची आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

बांगलादेशातील अल्पसंख्यांकांवरील अत्याचाराच्या मुद्द्यावर परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनीदेखील बांगलादेशला सुनावले आहे. ते म्हणाले की, अंतरिम सरकारने सर्व अल्पसंख्याकांच्या संरक्षणाची जबाबदारी पार पाडली पाहिजे. अतिरेकी भाषणबाजी, हिंसाचार आणि चिथावणीच्या वाढत्या घटनांबद्दल आम्ही चिंतित आहोत. या घडामोडी प्रसारमाध्यमांद्वारे केवळ अतिशयोक्ती म्हणून नाकारता येणार नाहीत. इस्कॉन ही सामाजिक सेवेची भक्कम नोंद असलेली जागतिक स्तरावरील प्रसिद्ध संस्था आहे. भारत पुन्हा एकदा बांगलादेशला अल्पसंख्याकांच्या संरक्षणासाठी सर्व पावले उचलण्याचे आवाहन करत असल्याचे जयस्वाल यांनी म्हटले आहे.

Powered By Sangraha 9.0