मुंबई : काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी अजित पवार यांच्याविरोधात एक वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याला भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. अजित पवार यांची निदान उपमुख्यमंत्री म्हणून जागा फिक्स आहे. तुमची विरोधी पक्षनेता म्हणून जागा कुठे आहे याचा शोध घ्यावा. दुसऱ्याच्या जागेची काळजी घेण्यापेक्षा आपली जागा कुठे गायब झालीय ती शोधा, असा टोला दरेकर ( Pravin Darekar ) यांनी वडेट्टीवार यांना लगावला आहे.
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपा नेत्यांच्या भावना काय आहेत असा प्रश्न पत्रकारांकडून विचारण्यात आल्यावर दरेकर म्हणाले की, भाजपचा कार्यकर्ता म्हणून निश्चितच आनंद होईल. तथापि अजून भाजपा किंवा केंद्राकडून अधिकृत घोषणा, महायुतीची एकत्रित बैठक होणे बाकी आहे. आमची महायुती चिरकाळ टीकावी, वातावरण उत्तम, सशक्त राहावे यासाठी कुठल्याही प्रकारची घाईगर्दी, तशा प्रकारची वक्तव्य आम्ही करत नाही. महायुतीचा मुख्यमंत्री होणार आहे. मुख्यमंत्री पदासाठी काही वादविवाद आहेत अशा प्रकारचे चित्र उभे राहता कामा नये. केंद्रीय समिती आणि अमित शहा यांच्यासोबत बैठक झालेली आहे. लवकरच अंतिम निर्णय अधिकृतपणे कळेल.
ते पुढे म्हणाले की, निवडणुकीची एक प्रक्रिया असते. दोन्ही पक्षांनी आपले गटनेते ठरवले आहेत. भाजपचा गटनेता ठरवायचा आहे. तो ठरवणे क्रमप्राप्त आहे. दिल्लीतील नेतृत्वाने काही सूचना दिल्या असतील त्याप्रमाणे महाराष्ट्र भाजपा व आमचे प्रदेशाध्यक्ष योग्य तो निर्णय केंद्रीय नेत्यांशी बोलून घेतील.
दरेकर पुढे म्हणाले की, वक्फ बोर्ड जीआर प्रकाराची मला माहिती नाही. पण जेव्हा मुख्यमंत्री काळजीवाहू असतात तेव्हा शासन दरबारी अशा प्रकारचे शासन निर्णय काढले जात नाही. तेव्हा असा कसा जीआर काढण्यात आला याबद्दल माहिती घ्यावी लागेल.
संजय राऊत यांच्या विधानावर बोलताना दरेकर म्हणाले की, संजय राऊत यांना खासदार व्हायचे म्हटले तर खासदार होण्याइतपत त्यांच्याकडे मतं नाहीत. संजय राऊत यांना मी खासदार राहीन की नाही याचे माहित नाही आणि ते अजित पवारांच्या उपमुख्यमंत्री पदाची उठाठेव करताहेत. स्वतःचे धड नाही आणि दुसऱ्याची काळजी घेण्याचा प्रयत्न दिसतोय.