मुंबई बँक लवकरच २५ हजार कोटींचा टप्पा गाठणार

29 Nov 2024 14:38:25
Pravin Darekar

मुंबई : जिटल क्षेत्रात क्रांती घडवण्यासाठी मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ( Mumbai Bank ) ‘मोबाईल बँकिंग सेवा’ सुरू करत एक पाऊल पुढे टाकले आहे. या बँकेत सर्वसामान्यांचा पैसा आहे. ही बँक सक्षम झाली पाहिजे आणि तिच्या आर्थिक ताकदीचा उपयोग हा सर्वसामान्यांना झाला पाहिजे, ही संकल्पना घेऊन आम्ही काम करतोय. ही बँक लवकरात लवकर २५ हजार कोटींचा टप्पा पार करेल,” असा विश्वास भाजप गटनेते आणि मुंबई बँकेचे अध्यक्ष आमदार प्रविण दरेकर यांनी गुरुवार, दि. २८ नोव्हेंबर रोजी व्यक्त केला. मुंबई बँकेच्या मोबाईल बँकिंग सेवेच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते.

या सोहळ्याला माजी मंत्री आणि आमदार सदाभाऊ खोत, मुंबई बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ कांबळे, सहकारातील ज्येष्ठ नेते शिवाजीराव नलावडे, माजी अध्यक्ष नंदकुमार काटकर, सहकार खात्याचे विभागीय सहनिबंधक शहाजी पाटील, हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष प्रकाश दरेकर, संचालक विठ्ठलराव भोसले, विष्णू घुमरे, पुरुषोत्तम दळवी, अनिल गजरे, विनोद बोरसे, नितीन बनकर, कविता देशमुख, जयश्री पांचाळ, बँकेचे जीएम संदीप सुर्वे यांसह कर्मचारी वर्ग उपस्थित होते. यावेळी आमदार दरेकर म्हणाले की, “मुंबई बँकेच्या वाटचालीतील आपण सगळे साक्षीदार आहात. मुंबई बँक कशा पद्धतीने, कलाकलाने प्रगतीकडे गेली. या सगळ्या गोष्टीचे आपण साक्षीदार आहात. सातशे-आठशे कोटीवर असणारी ही बँक आम्ही सर्व सहकार्‍यांनी तेराशे कोटींचा पल्ला पार पाडण्याचे धाडस केले, ते केवळ तुम्हा संस्थांच्या, कार्यकर्त्यांच्या जीवावर आणि विश्वासावर मुंबई बँक हा टप्पा पार पाडू शकली. मोबाईल बँकिंग सेवेमुळे तुम्हाला सोयीसुविधा उपलब्ध होणार आहेत.”

आताचे युग हे डिजिटल युग आहे. आपल्या हातात मोबाईल असतो, त्यावर सर्व काम होत असते. डिजिटल लायझेशनमुळे पारदर्शकता असते. डिजिटल लायझेशनमुळे पैसे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात येतात. लाडक्या बहिणींनाही पैसे थेट खात्यात जातात. नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान झाल्यानंतर हे डिजिटल युग गतीने पुढे जायला लागले. देशाची आर्थिक राजधानी असलेले आमचे मुंबई शहर, त्या शहरात असणारी आमची शिखर बँक त्यापासून वंचित राहू शकत नाही. ती सल आमच्या मनात सातत्याने असायची, आज ती स्वप्न पूर्ण होताहेत याचा आनंद होत असल्याचेही दरेकर म्हणाले.

‘शेड्युल’ दर्जा मिळण्यासाठी वाटचाल सुरू

“लाडकी बहीण योजना आणली. त्यावेळी काही महिलांकडे खाते उघडण्यासाठी पाचशे-हजार रुपयेही नव्हते. तात्काळ सर्व सहकार्‍यांशी चर्चा करून लाडक्या बहिणींसाठी झीरो बॅलन्स खाते उघडण्याचा निर्णय घेतला. आज ६० हजार महिलांची झीरो बॅलन्स खाती मुंबई बँकेत आहेत. तसेच बँकेला ‘शेड्युल’ दर्जा मिळाला पाहिजे, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. अहमदाबाद जिल्हा बँकेला जर शेड्युल दर्जा मिळू शकतो, तर आम्हालाही मिळायला हवा, त्या दृष्टीने आमची वाटचाल सुरू आहे. लवकरच तो दर्जा मिळवून घेऊ,” असा विश्वासही आमदार प्रविण दरेकरांनी व्यक्त केला.

Powered By Sangraha 9.0