मुंबई : दिवंगत कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी उभारलेला कर्जत येथील एन.डी.स्टुडिओ ( N D Studio ) ‘महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळा’ने (फिल्मसीटी) परिचालनासाठी ताब्यात घेतला असून सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी गुरुवार, दि. २८ नोव्हेंबर रोजी एन.डी. स्टुडिओला भेट देऊन येथील कामकाजाची पाहणी केली. त्यामुळे आता एन.डी.स्टुडिओचे परिचालन व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार आहे.
राष्ट्रीय कंपनी विधी प्राधिकरणाने ‘महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळा’ने सादर केलेल्या रिसोल्यूशन प्लॅनला दि. १४ नोव्हेंबर रोजी मान्यता दिल्याने यापुढे एन.डी.स्टुडिओचे दैनंदिन प्रशासन, सुरक्षा, चित्रीकरणे, महसूल वाढ, लेखा विषयक कामे शासनाच्या वतीने महामंडळाच्या नियंत्रणाखाली सुरु राहणार आहेत.