मुंबई : समीर रमेश सुर्वे दिग्दर्शित कृष्णा दादाराव शिंदे निर्मित आणि योगिता कृष्णा शिंदे यांच्या आर. के. योगिनी फिल्म्स प्रॉडक्शन प्रा.लि.तर्फे बनवण्यात आलेला ‘मिशन अयोध्या’ ( Mission Ayodhya film ) हा चित्रपट दि. २३ जानेवारी २०२५ रोजी राममंदिर स्थापनेच्या प्रथम वर्षपूर्तीचे औचित्य साधून महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या ऐतिहासिक निर्मितीनंतर प्रथमच मराठी चित्रपटाच्या रुपेरी पडद्यावर भव्य दृश्यांमधून रामललाच्या मूर्तीचे दर्शन चित्रपट भक्तांना घडणार आहे. चांदण्याच्या तेजाने झळाळणारी मूर्ती, भक्तांच्या हृदयात विश्वास जागवणारे रामललाचे मोहक हास्य आणि त्यांचे करुणामय डोळे हे सगळे प्रेक्षकांना त्यांच्या श्रद्धेच्या गाभार्यात घेऊन जाणार आहे. रामललाचे अनोखे दर्शन घडवणारा ‘मिशन अयोध्या’ हा भारतातील पहिला चित्रपट आहे. अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या मंदिराची स्थापना झाल्यानंतर कोणत्याही चित्रपटाचे अयोध्येत चित्रीकरण झाले नाही.
दिग्दर्शक समीर रमेश सुर्वे हे या चित्रपटाच्या चित्रीकरणाचा अनुभव वर्णन करताना म्हणाले की, “अयोध्येत प्रभू श्रीराम मंदिराच्या पवित्र परिसरात चित्रीकरण करणे हे केवळ माझ्यासाठी नव्हे, तर संपूर्ण युनिटसाठी एक अभूतपूर्व अनुभव ठरला. विषम तापमानाच्या आव्हानांवर मात करीत असताना लाखो रामभक्तांच्या गर्दीत, त्या पवित्र भूमीत चित्रीकरण करताना प्रत्येक क्षण प्रेरणादायी होता. हा केवळ एक चित्रपट नसून अयोध्या, श्रीराम मंदिर व श्रीरामांचे आदर्श विचार जगभर पोहोचविण्याचे एक मिशन आहे.”
निर्माते कृष्णा दादाराव शिंदे आणि योगिता कृष्णा शिंदे त्यांचे मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, “या चित्रपटातून अत्यंत ज्वलंत विषयावर प्रकाश टाकण्यात आला असून, प्रेक्षकांना मनोरंजनासोबतच रामभक्ती, श्रद्धा आणि सामाजिक मूल्यांचा अनोखा संगम पाहायला मिळणार आहे.”