मुंबई : महाविकास आघाडीच्या ( MVA ) प्रस्थापित नेत्यांनी विधानसभा निवडणुकीतील पराभवाचा राग मतदारांवर काढण्यास सुरुवात केली आहे. या नेत्यांच्या ताब्यातील दूध संघांनी संघटितरित्या दुधाचे दर पाडून दूध उत्पादक शेतकर्यांना वेठीस धरले आहेत. त्यामुळे दूध उत्पादकांचे दररोज पाच कोटींचे नुकसान होत आहे.
याविषयी दै. ‘मुंबई तरुण भारत’ने शेतकरी नेते आणि माजी मंत्री आमदार सदाभाऊ खोत यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की, “राज्यातील साखर आणि ‘दूध उत्पादक संघ’ हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या ताब्यात आहेत. विधानसभा निवडणुकीत त्यांचा सुपडा साफ झाल्यानंतर विशेषतः काँग्रेस आणि शरद पवार गटाच्या नेत्यांनी पराभवाचा राग काढण्यासाठी आपापल्या ताब्यातील दूध संघात मनमानी कारभार सुरू केला आहे. दुधाचा खरेदी दर ३ रुपयांनी कमी करीत तो ३५ वरून ३२ रुपयांवर आणण्यात आला आहे.”
“गोकुळ, कोयना, शिवामृत, सोनई, राजहंस आणि ‘राजारामबापू दूध संघा’चा त्यात समावेश आहे. ‘राजारामबापू दूध संघा’वर शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांचे वर्चस्व आहे. तर, ‘कोयना दूध संघ’ उदयसिंह पाटील उंडाळकर यांच्या ताब्यात आहे. ‘गोकुळ दूध संघा’वर काँग्रेसचे सतेज पाटील, ‘शिवामृत दूध संघा’वर मोहिते पाटील, ‘सोनई दूध संघा’त प्रवीण माने आणि ‘राजहंस दूध संघा’वर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचे वर्चस्व आहे. या सगळ्यांनी संघटितरित्या दूध दर पाडले आहेत. नवे सरकार आल्यावर त्याविषयी तोडगा काढेल. परंतु, ही गुलामगिरी मोडीत काढण्याची वेळ आली आहे,” असेही सदाभाऊ खोत म्हणाले.
तात्काळ कारवाई करा!
महाराष्ट्र सरकारने याची दाखल घेऊन संबंधित दूध संघांवर तत्काळ कारवाई करावी. या प्रश्नावर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी दोन कारखान्यांमधील २० किमी हवाई अंतराची अट काढून टाकावी. ‘महानंद’ हा सरकारी दूध उत्पादक संघ तातडीने सक्षमपणे उभा करावा. त्याच्या संचालक मंडळावर आयएएस अधिकारी नेमण्यासह मुख्यमंत्री, कृषी आणि पदुम मंत्र्यांना सदस्य करावे. तालुका पातळीवर महिला दूध संघ स्थापन करून त्यांचे दूध संकलन महानंदमार्फत व्हावे.
सदाभाऊ खोत, आमदार तथा माजी मंत्री