नवी दिल्ली : पक्षातील अंतर्गत कलह, नेत्यांची बेताल वक्तव्ये आणि एकजुट नसल्यानेच काँग्रेसचा पराभव होत आहे, असा निष्कर्ष काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे ( Mallikarjun Kharge ) यांनी काढल्याचे समजते.
हरियाणा आणि महाराष्ट्रातील दणदणीत पराभवानंतर काँग्रेस पक्ष चिंतन मोडमध्ये गेल्याचे दिसते. पराभवाची समीक्षा करण्यासाठी नवी दिल्ली येथे शुक्रवारी काँग्रेस कार्यसमितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पक्षातील नेत्यांना कानपिचक्या दिल्याचे समजते.
निवडणुकीच्या निकालातून धडा घेऊन कठोर निर्णय घ्यावे लागतील, असे खर्गे यांनी बैठकीत सांगितले. जबाबदारी निश्चित करावी लागेल आणि उणिवा दूर कराव्या लागतील. तीन राज्यांचे निकाल अपेक्षेप्रमाणे लागले नसल्याचे ते म्हणाले. जोपर्यंत आपण एकमेकांविरोधात वक्तव्ये करणे थांबवत नाही आणि एकदिलाने निवडणुका लढवणार नाही, तोपर्यंत विरोधकांचा पराभव कसा होणार, असा सवाल खर्गे यांनी केला. प्रत्येकाने शिस्तीचे काटेकोरपणे पालन करावे. काँग्रेस पक्षाचा विजय हा आमचा विजय आणि पक्षाचा पराभव हा आमचा पराभव आहे, असा विचार प्रत्येकाने केला पाहिजे असाही सल्ला खर्गे यांनी दिला आहे.
निवडणुकीवेळी वातावरण काँग्रेसच्या बाजूने होते, असे खर्गे म्हणाले. मात्र केवळ काँग्रेसच्या बाजूने वातावरण असणे ही विजयाची शाश्वती नाही. वातावरणाचे निकालामध्ये रूपांतर करायला शिकले पाहिजे. त्यासाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांना कामगारांना मेहनत घ्यावी लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. बूथ स्तरावर संघटना मजबूत करण्यापासून ते मतदारयादी बनवण्यापर्यंतच्या कार्यशैलीत आमूलाग्र बदल गरजेचा असल्याचेही खर्गे यांनी म्हटले आहे.