‘आव्हाडांनी आमदारकीचा राजीनामा देऊन बॅलेट पेपरवर निवडणूक लढवावी’

29 Nov 2024 13:17:25
Jitendra Avhad

ठाणे : “जितेंद्र आव्हाड ( Jitendra Avhad ) यांना वाटत असेल की, ईव्हीएम मशीन हॅक होते आहे, तर त्यांनी त्यांच्या आमदारकीचा राजीनामा देऊन बॅलेट पेपरवर निवडणुकीला सामोरे जावे,” असे खडेबोल राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी सुनावले. बॅलेट पेपरवर महाराष्ट्रातील पहिली निवडणूक मुंब्रा-कळवा विधानसभेमध्ये घेऊ. म्हणजे दूध का दूध आणि पानी का पानी होईल, असा टोलाही त्यांनी आव्हाड यांना लगावला.

लोकसभेला महाविकास आघाडीला मिळालेल्या यशानंतर महाराष्ट्रातील जनता ही महाविकास आघाडीच्या मागे मजबुतीने उभी आहे अशाप्रकारचा टाहो, महाविकास आघाडीचे सर्वच नेत्यांनी फोडला होता. मात्र, या निवडणुकीत महायुतीला जे अभूतपूर्व यश मिळाले ते नाकारण्याचा हा केविलवाणा प्रयत्न चालू आहे. विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने नाकारल्यानंतर ईव्हीएम हॅक झाल्याचा रडीचा डाव विरोधकांकडून सध्या सुरू आहे. त्यावर आनंद परांजपे यांनी जितेंद्र आव्हाड यांना खुले आव्हान दिले आहे.

आव्हाडांना वाटत असेल की, ईव्हीएम मशीन हॅक होते, तर त्यांनी त्यांच्या आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि बॅलेट पेपरवर महाराष्ट्रातील पहिली निवडणूक ही मुंब्रा-कळवा विधानसभेमध्ये लढवावी, असे आव्हान आव्हाडांना दिले. दरम्यान, या विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांनी घेतलेल्या वेगळ्या भूमिकेच्या बाजूने उभे राहून महाराष्ट्रातील जनतेने अजित पवार हेच राष्ट्रवादी विचाराचे व पक्षाचे खरे वारसदार असल्याचे दाखवून दिले आहे, असे मतही राष्ट्रवादी आनंद परांजपे यांनी व्यक्त केले.

Powered By Sangraha 9.0