जिल्ह्यातील धान्य साठवण क्षमता वाढवणार

सात संस्थांमार्फत उभारणार गोदाम; एका गोदामासाठी दोन कोटी खर्च; ३३ टक्के मिळणार अनुदान

    29-Nov-2024
Total Views |
Storage

नाशिक : जिल्ह्यातील धान्य साठवण ( Grain Storage ) क्षमता वाढविण्यासाठी लवकरच करार करण्यात येणार आहे. त्याअंतर्गत जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात विविध तालुक्यांतील सात सहकारी संस्थांसोबत ‘धान्य साठवण योजनें’तर्गत ‘नॅशनल को-ऑपरेटिव्ह कन्झ्युमर्स फेडरेशन’ (एनसीसीएफ) या भारत सरकारच्या धान्य खरेदी संस्थेकडून पुढील सात वर्षांसाठी कराराला लवकरच मंजुरी दिली जाणार आहे. केंद्रात स्वतंत्र सहकार खाते सुरू झाल्यानंतर विविध योजना सुरू करण्यात आल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर देशभरात अन्न धान्य साठवण क्षमता वाढविण्यासाठी सहकार खात्यामार्फत समृद्धी योजना आणण्यात आली आहे.

जिल्ह्यातील सात संस्थांमार्फत धान्य साठवणूक क्षमता वाढविली जाणार आहे. त्यानुसार या संस्थांकडून स्व-मालकीच्या अथवा भाडे तत्त्वावरील जागेत धान्य गोदाम उभारण्यात येणार आहेत. ‘धान्य साठवण योजनें’तर्गत गोदाम उभारण्यासाठी विविध कार्यकारी संस्था आणि एनसीसीएफ यांच्यातील प्राथमिक स्तरावरील बैठक नुकतीच सी. बी. एस. येथील जिल्हा बँकेच्या हॉलमध्ये पार पडली. यावेळी व्यासपीठावर एनसीसीएफचे प्रकल्प व्यवस्थापक तापसकुमार राय, सहकार खात्याचे सहकार अधिकारी, समन्वयक प्रदीप महाजन, योजनेचे अंमलबजावणी अधिकारी, अंधेरी येथील अ‍ॅग्रिबिड प्रायव्हेट कंपनीचे सह संचालक किशोर महाले यांच्यासह विविध कार्यकारी सहकारी संस्थांचे प्रतिनिधी आणि व्यवस्थापक उपस्थित होते.

यावेळी भारत सरकारच्या सहकारचे ‘समृद्धी’ या योजनेंतर्गत सहकारी सोसायट्यांचे महाराष्ट्रात १२ हजार, ५००, तर नाशिक जिल्ह्यात ६१८ सोसायट्यांच्या डिजिटायझेशनची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू आहे. मागील तीन वर्षांपासून नफ्यात असलेल्या सोसायट्यांसोबत सात वर्षांचा करार करून त्यांच्या स्वमालकीच्या जागेवर धान्य साठवण गोदाम उभारण्यात येणार आहेत. प्रत्येक गोदाम उभारणीसाठी दोन कोटी रुपयांचा खर्च लागणार आहे. यासाठी ३३ टक्के अनुदानही देण्यात येणार आहे. या गोदामात एनसीसीएफमार्फत खरेदी केलेले धान्य साठवले जाणार आहे. तसेच खासगी संस्थांनाही धान्य साठवण्यासाठी गोदाम उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

या संस्थांसोबत केला जाणार करार

नांदगाव येथील बाणगाव विविध सहकारी संस्था, सटाणा येथील ‘नामपूर गृहविकास संस्था’, मालेगाव येथील पाटणे ‘विकास सहकारी संस्था’, देवळा येथील ‘देवळा पूर्व सहकारी संस्था’ व रामेश्वर ‘विकास संस्था, नाशिकची ‘वाडगाव गिरणारे विकास संस्था’, चांदवड येथील ‘चांदवड विकास सहकारी संस्था’ या विविध तालुक्यांमधील संस्थांसोबत करार करण्यात येणार असून जिल्ह्यातील धान्य साठवण क्षमता वाढविण्यात येणार आहे.