पर्यावरणपूरक कुंभमेळ्यासाठी ‘एक थैलू एक थाली’

29 Nov 2024 15:55:26
Vishal Tibarewala

मुंबई : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे ‘कुंभमेळा २०२५’ला ( Kumbha Mela ) सुरुवात होणार आहे. हिंदू धर्मात कुंभमेळ्याचे विशेष महत्त्व असून, आपल्या संस्कृती आणि संस्कारांचा जागर आहे. कोट्यवधी भाविक या कुंभमेळ्यात सहभागी होतात. पण, त्यावेळी व्यवस्थापन आणि परिसराच्या स्वच्छतेची आव्हानेसुद्धा उभी राहतात. याच आव्हानांवर मात करण्यासाठी ‘एक थैलू एक थाली’ हा प्रकल्पाची सुरुवात झाली आहे. याच प्रकल्पानिमित्ताने ‘माय ग्रीन सोसायटी’चे ’विशाल टिबरेवाला’ यांच्याशी साधलेला हा संवाद...

‘एक थैलू एक थाली’ हा प्रकल्प नेमका काय आहे?

आता जो कुंभमेळा होईल, त्या कुंभमेळ्यात ४० ते ४५ दिवसांसाठी जवळपास ४० हजार लोक जमा होतील. त्यामुळे ४८ हजार टन कचरा त्या ठिकाणी जमा होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये प्रत्येक प्रकारचा कचरा असेल. तो कसा कमी करता येईल, याचा विचार सुरू झाला. त्यावेळी वापरल्या जाणार्‍या प्लास्टिकच्या पिशव्यांऐवजी कापडी पिशव्या वापरल्या गेल्या आणि कुंभमेळ्याच्या ठिकाणी जे अन्न दिले जाते ते प्लास्टिक किंवा इतर कशातून देण्याऐवजी लोकांकडे असणार्‍या स्टीलच्या ताटातच दिले गेले, तर प्रदूषणाचे प्रमाण कमी करता येईल हा विचार पुढे आला. त्यातूनच ‘एक थैलू एक थाली’ ही कल्पना सुचली.

माय ग्रीन सोसायटी’तर्फे किती पिशव्या आणि थाळ्या पोहोचवल्या जाणार आहेत?

मुंबईतून २५ हजार पिशव्या आणि थाळ्या पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. तो सफल होईल अशी आमची अपेक्षा आहे. पर्यावरण संरक्षण गतिविधी नावाची जी संघटना आहे, त्या संघटनेने देशभरातील ‘एनजीओं’ना या प्रकल्पासाठी शक्य तितक्या पिशव्या आणि थाळ्या पाठवण्याचे आवाहन केले आहे.

कुंभमेळ्यात सहभागी होणार्‍या लोकांनाही पिशवी आणि थाली कशी मिळणार?

त्याठिकाणी एअरपोर्ट, रेल्वेस्थानक आणि बसस्थानकांवर आमचे प्रतिनिधी असतील. तिथे उतरणार्‍या लोकांकडे ज्या प्लास्टिकच्या पिशव्या असतील त्या घेऊन कापडी पिशव्या दिल्या जातील आणि सोबतच त्यांना स्टीलच्या थाळ्यासुद्धा दिल्या जातील. तिथल्या प्रशासनासोबत बोलणे सुरू आहे की, तिथल्या सामान विक्रेत्यांना कापडी पिशव्या देऊन त्यातून त्यांना सामान विकायला सांगावे. त्यासाठी भारतभरातून २० ते २५ हजार पिशव्या पाठवल्या जाव्यात, असा आमचा प्रयत्न आहे.

या प्रकल्पासाठी वापरण्यात येणार्‍या कापडी पिशव्या कोणी तयार केल्या आहेत?

या पिशव्या वनवासी समाजातील भगिनींनी तयार केलेल्या आहेत. त्यासाठी वापरले गेलेले कापड मिळवण्यासाठी आम्हाला ‘ताज’सारख्या हॉटेल्सची खूप मदत होते. ते मिळालेले कापड आम्ही आदिवासी समाजातील महिलांपर्यंत पोहोचवतो. त्यामुळे त्यांनाही रोजगार मिळतो.

या प्रकल्पामुळे काय बदल होईल?

आपल्या देशाला कार्बन न्यूट्रल बनवण्यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत. या प्रकल्पामुळे प्रदूषण कमी होईल, पर्यावरणाची हानी कमी होईल आणि आपला पवित्र कुंभमेळासुद्धा आनंदात पार पडेल.

विशाल टिबरेवाला (९८२००७१३८५)


Powered By Sangraha 9.0