दिव्यांगांना करावे लागणार मोफत पासचे नूतनीकरण

29 Nov 2024 16:40:32
Disable

नाशिक : महानगर परिवहन मंडळाकडून दिव्यांगांना देण्यात येणार्‍या मोफत पासचे ( Free Pass ) नूतनीकरण रविवार, दि. १५ डिसेंबर रोजीपासून करावे लागणार आहे. नाशिक महानगरपालिका हद्दीत राहणार्‍या दिव्यांग प्रवाशांना मोफत प्रवास करता यावा यासाठी मोफत दिव्यांग कार्डची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

ही सुविधा दि. १ नोव्हेंबर २०२२ रोजीपासून उपलब्ध करून देण्यात आली आहे. तर दि. २५ ऑक्टोबर २०२३ रोजीपासून दिव्यांग प्रवाशांना साध्या कार्डऐवजी अद्ययावत आरएफआयडी कार्डचे वितरण करण्यात आले आहेत. या आरएफआयडी कार्डची मुदत मंगळवार, दि. ३१ डिसेंबर रोजी संपत असल्याने आता दिव्यांग प्रवाशांना आपले कार्डचे नूतनीकरण करून घ्यावे लागणार आहे. रविवार, दि. १५ डिसेंबर रोजीपासून आरएफआयडी कार्डचे नूतनीकरण करण्याची सुविधा सिटीलिंकच्यावतीने उपलब्ध करून देण्यात आली असून दि. ३१ डिसेंबर ही अंतिम मुदत आहे. याचा लाभ केवळ नाशिक महानगरपालिका हद्दीत राहणार्‍या दिव्यांग प्रवाशांनाच घेता येणार आहे. त्यामुळे आरएफआयडी कार्डचे नूतनीकरण करताना जुन्या कार्डसह रहिवासी पुरावा म्हणून आधारकार्ड, घराचे वीजबील, घरपट्टी यांपैकी कोणताही एक पुरावा सोबत असणे आवश्यक आहे. तसेच नूतनीकरण न करणार्‍या प्रवाशांना दि. १ जानेवारी २०२५ रोजीपासून कोणत्याही परिस्थितीत मोफत प्रवासाचा लाभ घेता येणार नसल्याचे सिटीलिंककडून स्पष्ट करण्यात आले आहे. सिटिलिंक बससेवेच्या माध्यमातून ७ हजार, ७८२ दिव्यांग मोफत प्रवासाचा लाभ घेत आहेत. यापैकी २ हजार, २१९ दिव्यांग प्रवाशांकडून २०२४ या वर्षात नव्याने प्रवास करण्यासाठी मोफत पास काढण्यात आला आहे.

Powered By Sangraha 9.0