ठाणे गडात उबाठा आणि मनसेच्या एकत्रित मतांपेक्षा भाजपचा टक्का सर्वाधिक

29 Nov 2024 14:25:42
Thane

ठाणे : विधानसभा निवडणुकीत ठाणे गडात उबाठा आणि मनसेला मिळालेल्या एकत्रित मतांपेक्षा भाजपचा टक्का सर्वाधिक असल्याचे समोर आले आहे. ठाणे मतदारसंघात भाजप ( BJP In Thane ) महायुतीच्या अथक प्रयत्नांमुळे आमदार संजय केळकर यांनी प्रतिस्पर्धी दोन्ही उमेदवारांवर लिलया मात केली आहे. उबाठाच्या राजन विचारे यांना ६२ हजार तर, मनसेच्या अविनाश जाधव यांना ४२ हजार, ८०७ आणि आमदार संजय केळकर यांना १ लाख, २० हजाराहून अधिक मते मिळाली आहेत.

ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार संजय केळकर, ठाकरे गटाचे उमेदवार राजन विचारे आणि मनसेचे उमेदवार अविनाश जाधव यांच्यात तिरंगी लढत होती. २०१९ सालच्या निवडणुकीतही भाजपच्या संजय केळकर यांनी एकांगी लढा देऊन सर्व पक्षांची सोबत लाभलेल्या मनसेच्या अविनाश जाधव यांना तब्बल २० हजार मतांनी धूळ चारली होती. तर २०२४ सालच्या विधानसभा निवडणुकीत संजय केळकर यांना १ लाख, २० हजार, ४२४ मते मिळाली.

ठाकरे गटाचे उमेदवार राजन विचारे यांना ६२ हजार, १४१ मते तर, मनसेचे उमेदवार अविनाश जाधव यांना ४२ हजार, ८०७ इतकी मते मिळाली.

मराठा समाजासह मुस्लिमांचेही भरघोस मतदान

आमदार संजय केळकर यांना ठाण्यात मराठा समाजासह मुस्लीमबहुल भागातही घसघशीत मतदान मिळाले. आमदार केळकर यांना ठामपा प्रभाग क्र. २ मध्ये १० हजार, ४४२, प्रभाग ३ मध्ये ४ हजार, ५६३, प्रभाग ४ मध्ये ७ हजार, २०१, प्रभाग ८ मध्ये ९ हजार, ७४०, प्रभाग ११ मध्ये ७ हजार, ३५९, प्रभाग १२ मध्ये ६ हजार, १६, प्रभाग २१ मध्ये ११ हजार, २८९ आणि प्रभाग क्रमांक २२ मध्ये ८ हजार, ९९३ असे मताधिक्य मिळाले. तर, ठाकरे गटाच्या विचारे यांना राबोडी या प्रभाग क्र. १० मधून १४ हजार, १७६ तर केळकर यांना ५ हजार, ६१९ इतकी मते मिळाली. दुसरीकडे मनसेला एकाही प्रभागात किंचीतही मताधिक्य मिळालेले नाही.

Powered By Sangraha 9.0