मुंबई : देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होत आहेत, याचा विदर्भाच्यादृष्टीने आनंद आहे. देवेंद्र फडणवीस लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून काम करतील आणि विदर्भाचा बॅकलॉग भरून काढतील, अशा शब्दांत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी फडणवीसांवर स्तुतीसुमने उधळली. त्यांनी शुक्रवार, २९ नोव्हेंबर रोजी माध्यमांशी संवाद साधला.
हे वाचलंत का? - मी ८२ जागा निवडून आणल्या, नानांनी त्या १६ वर आणल्या!
विजय वडेट्टीवार म्हणाले की, "देवेंद्र फडणवीस यांना आता कुबड्यांची गरज नाही. उलट कुबड्या देवेंद्र फडणवीस यांच्यावर विसंबून आहेत. आता त्यांना फ्री हँड करण्यापासून कुणीही थांबवू शकत नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होत असताना विदर्भाचा लेक म्हणून विदर्भाचे प्रश्न ते प्राधान्याने सोडवतील, विदर्भाला न्याय देतील अशी अपेक्षा. देवेंद्र फडणवीस यांच्याकडून दुसरी अपेक्षा आहे, की ते सुडाचे राजकारण करणार नाहीत. मुख्यमंत्री झाल्यावर ते तसे वागणार नाहीत, असे आम्हाला वाटते, असे ते म्हणाले. मात्र, एखाद्या काँग्रेस नेत्याने अशाप्रकारे देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केल्याने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.