मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Rambhadracharya warned Bangladesh) बांगलादेशात इस्कॉनशी संबंधित चिन्मय कृष्ण दास यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक केल्यामुळे जगभरातून प्रतिक्रिया येत आहेत. या प्रकरणी जगद्गुरू श्री रामभद्राचार्य यांनी देखील तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. "बांगलादेशने असे करायला नको होते. भारत बांगलादेश सरकारला समजावत आहे, परंतु जर त्यांना समजत नसेल तर मग आम्हाला आमच्या पद्धतीने समजवावे लागेल!", असे ते म्हणाले.
मध्य प्रदेशच्या चित्रकूट येथे माध्यमांशी संवाद साधताना पुढे ते म्हणाले, "विश्वभरातील हिंदूंनी संघटित होण्याची वेळ आली आहे. हिंदू संघटित झाले तर आसुरी शक्ती आपोआप पराभूत होतील. केंद्रातील राजकीय नेते बांगलादेश सरकारला समजावत आहेतच. त्यातूनही ते नाही समजले तर मग आम्हाला आमच्या पद्धतीने समजावावे लागेल." मोहम्मद युनुस यांच्या नेतृत्वातील सरकारमध्ये हिंदूंना सातत्याने लक्ष्य केले जात आहे. सोबतच हिंदू मंदिरे, देवदेवतांनाही लक्ष्य केले जात आहे. हिंदू धर्मगुरू चिन्मय कृष्ण दास यांच्यावर बांगलादेश सरकारने देशद्रोहाचा आरोप लावला असून, या अटकेच्या निषेधार्थ हिंदू समाजातील लोक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले आहेत.