तीनदा अपयश आले. मात्र, तरीही सर्व संकटांवर मात करत त्यांनी स्वतःचा व्यवसाय उभा केला आणि त्याचा विस्तारही केला. जाणून घेऊया नाशिकच्या प्रदीप कुलकर्णी यांच्याविषयी...
प्रदीप दिनकरराव कुलकर्णी यांचा जन्म छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील चित्ते पिंपळगाव गावी झाला. वडील प्रादेशिक परिवहन कार्यालयात नोकरीला, आई गृहिणी. ग्रामपंचायतीच्या शाळेत त्यांनी इयत्ता तिसरीपर्यंतचे शिक्षण घेतले. आईच्या आग्रहास्तव प्रदीप यांच्या पुढील शिक्षणासाठी सर्वजण शहरात गेले. ‘मॉन्टेसरी बाल मंदिर’ शाळेत त्यांनी पुन्हा तिसरीत प्रवेश घेतला. त्यानंतर इयत्ता चौथी ते दहावीपर्यंतचे शिक्षण त्यांनी ‘सरस्वती भुवन’ शाळेतून पूर्ण केले. क्रिकेटची प्रदीप यांना विशेष आवड. इयत्ता दहावीनंतर प्रदीप आणि त्यांच्या मित्राने ‘पोस्टर लायब्ररी’ सुरू केली. ज्यातून त्यांना महिन्याकाठी 100 रूपये मिळत असे. यातून त्यांचा इतर खर्च भागत असे. इयत्ता बारावीत अनुत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी साड्या विकल्या. व्यायामाचे महत्त्व जाणून घेत त्यांनी व्यायामाचा छंदही जपला. देवगिरी कॉलेजमध्ये त्यांनी विज्ञान शाखेला प्रवेश घेतला. छत्रपती संभाजीनगरमधील क्रांती चौकात प्रदीप यांनी सहकार्यांसमवेत पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनी पाकिस्तानचा ध्वज जाळला होता. ज्यामुळे त्यांना दीड दिवस पोलीस स्थानकात राहावे लागले. पुढे 1989 साली विज्ञान शाखेत पदवी मिळाल्यानंतर त्यांनी नोकरीचा शोध सुरू केला. विलास कुलकर्णी यांनी निर्लेपमध्ये नोकरी करण्याविषयी विचारले, तेव्हा प्रदीप यांनी होकार दिला आणि तत्काळ रुजूही झाले. त्यावेळी 1 हजार, 050 रूपये वेतन मिळत असे. हळूहळू त्यांनी संगणकीय ज्ञान आत्मसात केले. दरवर्षी त्यांचा उत्तम कर्मचारी म्हणून गौरव व्हायचा. भांडवल जमा झाल्यानंतर स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचे त्यांनी ठरवले होते. मध्यंतरी त्यांनी जागा बळकावणार्या एका इसमालाही चांगलाच धडा शिकवला.
1995 साली प्रदीप यांच्या भावाचे अपघाती निधन झाले. भावासोबत व्यवसाय करण्याचे त्यांचे स्वप्न स्वप्नच राहिले. पत्नी देवकी यांच्याशी चर्चा करून पुढे कोल्हापूर येथे नोकरी सुरू केली. निराली कंपनीची शाखा भागीदारीत सुरू केली. मात्र, तीही नंतर बंद करावी लागली. मात्र, तेव्हा निरालीकडून प्रदीप यांना नोकरी करण्याविषयी विचारले गेले. त्यानंतर प्रदीप 2011 साली नाशिकला स्थायिक झाले. निरालीत काम करत असतानाही त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. पुढे ‘लाओपाला’ कंपनीतही त्यांनी चांगला जम बसवला. ‘लिविंग लाईफस्टाईल’ कंपनीतही त्यांनी जवळपास सव्वा वर्ष काम केले. मात्र, दररोज मुंबईला जाणे-येणे अशक्य असल्याने त्यांनी व्यवसाय सुरू करण्यासाठी चाचपणी सुरू केली.
नाशिकमध्ये एका व्यक्तीने सर्वप्रथम पाच-सहा महिने काम केल्यानंतर भागीदारीत व्यवसाय सुरू करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर प्रदीप यांनी जवळपास वर्षभर काम केले. मात्र, ठरल्याप्रमाणे समोरील व्यक्तीने व्यवसाय करण्यास नकार दिला. मात्र, या कालावधीत प्रदीप यांना अनेक नव्या गोष्टी शिकता आल्या. याचदरम्यान त्यांची उदय पंडित यांच्याशी भेट झाली. प्राथमिक स्तरावर पंडित यांच्या म्हणण्यानुसार, प्रदीप यांनी काम करण्यास सुरूवात केली. पुढे त्यांनी 2013 साली ‘देवदीप’ नावाने व्यवसायाची नोंदणी केली. पंडित यांच्या ‘कॉम्प्रेसर एनर्जी सेवर प्रोडक्ट’वर त्यांनी अधिक लक्ष केंद्रित केले. पंडित यांना हे तंत्रज्ञान विक्री करायचे होते, जे पुढे प्रदीप यांनी विकत घेतले. त्यानंतर मात्र, प्रदीप यांच्या व्यवसायाचा आवाका वाढत गेला. 2016 सालानंतर हा व्यवसाय प्रचंड यशस्वी झाला.
10 ते 40 टक्के वीजबचत सेव कॉम्प एअर कंट्रोलरमुळे होते. प्रदीप एअर कॉम्प्रेसरचे ऑडिटदेखील करतात. वीचबचत करणार्या उपकरणांपैकी एक म्हणे हे ‘एअर कॉम्प्रेसर.’ वीचबजत नाही झाल्यास पैसे परत अशी मनी बॅक गॅरंटीदेखील प्रदीप देतात. ‘महिंद्रा अॅण्ड महिंद्रा’, ‘सीएट’, ‘टाटा मोटर्स’, ‘मर्सिडीज बेंज’ अशा जवळपास 150हून अधिक कंपन्यांना त्यांनी आपले प्रोडक्ट दिले आहे. अनेक परदेशी कंपन्यांमध्येही प्रदीप यांच्या या प्रोडक्टला प्रचंड मागणी आहे. प्रचलित ऐवजी काहीतरी नवीन करण्याकडे प्रदीप यांचा कल असतो. प्रदीप यांना व्यवसाय उभा करताना पत्नी देवकी यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. प्रदीप यांना संगीताचीही विशेष आवड आहे. उत्तम खाणे, चांगले खाणे या उक्तीनुसार ते उत्तम खवय्येदेखील आहेत.
जगातील प्रत्येक प्राणी जन्मजात अभियंता आहे. अभियांत्रिकी पुस्तकात नाही किंवा अभियंता पदवीने नाही, अभियांत्रिकी मनात असावी लागते. जेव्हा तुम्हाला कोणत्याही ‘डेड ब्लॉक’चा सामना करावा लागतो, तेव्हा अभियांत्रिकी सुरू होते. तीनवेळा व्यवसायात अपयश आले. मात्र, तरीही सर्व संकटांवर मात करत त्यांनी आज स्वतःचा व्यवसाय उभा केला आणि त्याचा विस्तारही केला. “माझ्या तंत्रज्ञानामुळे वीजबचत होते, ही एकप्रकारे देशसेवाच आहे. लोकांनीही वीजबचत करण्यासाठी प्राधान्य द्यायला हवे. तंत्रज्ञान महाग असले तरीही यातून आपला नफा होतो, हे लोकांना समजत नाही. आपल्या परिने आपण जशी शक्य होईल, तशी देशसेवा केली पाहिजे. जीवनात कोणतीही गोष्ट अशक्य नाही. फक्त ते मिळवण्याची इच्छाशक्ती आपल्यामध्ये हवी,” असे प्रदीप सांगतात. तीनवेळा अपयशी होऊनही आपला व्यवसाय उभा करून वीजबचतीचा आग्रह धरणार्या प्रदीप कुलकर्णी यांना आगामी वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरूण भारत’तर्फे मनःपूर्वक शुभेच्छा!