मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Sambal Audio Clip Viral) उत्तर प्रदेशच्या संभळ येथे कथित मशिदीच्या पुरातत्व सर्वेक्षणादरम्यान झालेल्या हिंसाचारात अनेक पोलीस बांधव जखमी झाले. मशिदीलगतच्या घरावरून दगडफेक सुद्धा करण्यात आली. या हिंसाचारासंबंधीत एक धक्कादायक ऑडिओ क्लिप समोर आली आहे. "तू सामान लेकर आ, मस्जिद के पास मेरे भाई का घर है”, अशा प्रकारचा संवाद झाल्याचे या ऑडिओ क्लिपमधून स्पष्ट होत आहे. यावरून हिंसाचाराचा पूर्वनियोजित कट असल्याचे मिळालेल्या ऑडिओतून उघडकीस येत आहे. मिळालेल्या वृत्तानुसार या प्रकरणी आतापर्यंत तीन प्रमुख आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून ४९ इतर संशयितांची देखील ओळख पटली आहे.
हे वाचलंत का? : धक्कादायक! संभळ मधील दंगलीचे महिलेकडून समर्थन
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ऑडिओ क्लिपमध्ये एक व्यक्ती मशिदीजवळ आणखी काही लोकांना शस्त्रास्त्रांसह येण्यास सांगत असल्याचे ऐकू येत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंसाचारात सहभागी असलेल्या तीन आरोपींच्या फोनमधून ही क्लिप जप्त करण्यात आली आहे. आमिर पठाण, मोहम्मद अली आणि फैजान अब्बासी अशी त्यांची नावे आहेत. या तिघांनी ४९ दंगलखोरांची नावेही दिली असून, त्यांची ओळख पटवण्याचे काम पोलीस सध्या करत आहेत. त्या सर्वांनी आपापसात बोलून जमावाला मशिदीजवळ येण्यास सांगितले. त्याचबरोबर या प्रकरणी आतापर्यंत २५ जणांना अटक करण्यात आली असून सात जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.
स्थानिक न्यायालयाच्या आदेशानुसार सर्वेक्षण पथक रविवारी मशिदीत पोहोचले तेव्हा तेथे आधीच उपस्थित असलेल्या इस्लामिक कट्टरवाद्यांच्या जमावाने पोलिसांवर प्राणघातक हल्ला केला. हल्ल्यादरम्यान, धर्मांधांनी दगडफेक केली, खुलेआम गोळीबार केला आणि अनेक वाहनांना आग लावली आणि रस्त्यावर उन्माद पसरवला. दगडफेक आणि जाळपोळीच्या घटनेत २० हून अधिक पोलीस जखमी झाले, तर अनेक वाहने जाळण्यात आली. हिंसाचारानंतर कठोर कारवाई करण्याच्या सूचना सरकारने दिल्या असून, हिंसाचारात सहभागी असलेल्या संशयितांची ओळख पटवण्यासाठी त्यांची छायाचित्रे सार्वजनिक करण्याचे आदेशही राज्य सरकारने दिले आहेत.