लिफ्ट दुरुस्तीसाठी आलेल्या नराधमाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग!

29 Nov 2024 18:16:16
 
Chitra Wagh
 
मुंबई : भांडूप येथील एका शाळेत लिफ्ट दुरूस्त करण्यासाठी आलेल्या एका नराधमाने विद्यार्थिनीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याची घटना पुढे आली आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी याबाबतची माहिती दिली असून यासंदर्भात त्यांनी पोलिस उपायुक्तांची भेटही घेतली आहे.
 
 
 
चित्रा वाघ यांनी आपल्या 'X' अकाऊंटवर दिलेल्या माहितीनुसार, भांडूपमधील एका शाळेत लिफ्ट दुरूस्त करण्यासाठी आलेल्या एका नराधमाने विद्यार्थिनीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. मुलीने तात्काळ शाळा प्रशासनाला या घटनेची माहीती दिली. शाळेने पोलिसांना कळवताच पोलिसांनी गुन्हा नोंद केला आणि आरोपी पकडला गेला.
 
हे वाचलंत का? -  काँग्रेस नेतृत्वहीन! विचार स्पष्ट नाहीत; ईव्हीएमवरील आरोपानंतर केशव उपाध्येंची टीका
 
त्यानंतर चित्रा वाघ यांनी नगरसेविका जागृती पाटील यांच्यासह भेट यासंदर्भात पोलिस उपायुक्त विजय सागर तसेच भांडूप वरीष्ठ पोलिस निरिक्षक खंडागळे यांची घेतली. या भेटीत पोलिसांकडून घटनेची तसेच केलेल्या कार्यवाहीची माहीती घेतली. तसेच त्यांना दोन सुचनाही केल्या.
 
सगळ्याच शाळांमध्ये शाळेच्या कुठल्याही दुरूस्तीची कामं ज्यात बाहेरून लोक येऊन काम करणार आहेत, अशी कामे सुट्टीच्या दिवशी करावीत. तसेच सगळ्याच शाळांमध्ये शाळेचे सगळे सीसीटीव्ही सुरू असावेत. बऱ्याचदा सीसीटीव्ही तर आहेत पण ते नादुरुस्त आहेत बंद आहेत, असे दिसून येते, असे त्या म्हणाल्या.
 
तसेच मुंबई पोलिसांकडून प्रत्येक शाळेत 'गुड टच बॅड टच'सारख्या मोहीमा सातत्याने राबवल्या जात आहेत, त्याचं कौतुक आहे. पण त्याची व्याप्ती अधिक वाढवण्याचीही गरज वाटते. शिवाय अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी सगळ्याच शाळेतील प्रशासनानेही काळजी घेणे अत्यावश्यक आहे, असेही त्या म्हणाल्या.
 
 
 
Powered By Sangraha 9.0