‘ब्रिंग देम डाऊन’: नातेसंबंध आणि सूडभावनेचा समतोल राखणारा चित्रपट

29 Nov 2024 23:28:54
 
Bring them down Movie
 
 
चित्रपट हे जरी प्रेक्षकांच्या मनोरंजनाचे माध्यम असले, तरी त्यातून कायम जीवन जगण्याचा संदेश मिळतोच. मात्र, कुठलीही कलाकृती एकाग्रतेने पाहणेही तितकेच गरजेचे असते, याचं उत्तम उदाहरण म्हणजे ‘ब्रिंग देम डाऊन’ हा चित्रपट. या चित्रपटाचे खास स्क्रिनिंग नुकतेच गोव्यातील 55व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात जगभरातील चित्रपटप्रेमींसाठी करण्यात आले. जगभरात हा चित्रपट 2025 रोजी प्रदर्शित होणार असून, थोडक्यात जाणून घेऊयात या चित्रपटाबद्दल...
 
चित्रपटाचे कथानक मेंढपाळ आणि त्याच्या वडिलांभोवती फिरते. आपल्या आजारी वडिलांना सांभाळत उदरनिर्वाहासाठी मेंढ्या पाळून, त्या विकून पैसे मिळवणं, हा त्यांचा व्यवसाय. त्याच्यासारखेच गावातील इतर गावकरी हाच व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा सांभाळ करत असतात. परंतु, अधिक पैसे कमवण्याची गैर पद्धत गावातील एक तरुण स्वीकारतो आणि त्यामुळे प्रमुख नायकाचे कसे नुकसान होते, त्याची कथा म्हणजे ‘ब्रिंग देम डाऊन.’ ही कथा केवळ स्वतःचे अस्तित्व टिकवण्याची नसून, सुडाची आणि वडिलांना दिलेलं वचन पाळण्याचीदेखील आहे. जागतिक स्तरावरील चित्रपट कसे वेगळे असतात, त्यांची कथामांडणी का वेगळी असते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे ‘ब्रिंग देम डाऊन’ हा चित्रपट.
 
‘ब्रिंग देम डाऊन’ चित्रपटात भूतकाळातील प्रसंग फार सफाईदारपणे मांडलेले दिसतात. खरं तर संपूर्ण चित्रपटाची कथा फार सोपी आहे. पण, माणूस आपले अस्तित्व टिकवण्यासाठी सूडभावनेतून कोणत्या स्तरावर जाऊ शकतो, याचं उत्तम चित्रीकरण या चित्रपटात करण्यात आले आहे. संपूर्ण चित्रपट नातेसंबंधांवरही भाष्य करणारा आहे. हॉलिवूड चित्रपटांचे सादरीकरण इतर कुठल्याही भाषेतील चित्रपटसृष्टीपेक्षा सरस असतेच आणि त्याचं प्रमुख कारण म्हणजे, तेथील मेकर्स विचारांच्या पलीकडे जाऊन मांडणी करतात. चित्रपटातील एका लहानशा प्रसंगाचा इथे उल्लेख करावासा वाटतो. मिट्ट काळोख आहे आणि त्या काळोखात नायक एका गाडीचा पाठलाग करतोय. एखादी व्यक्ती पळत गाडीचा पाठलाग करत असताना त्याच्या नजरेला गाडीचा उजेड किती जास्त प्रमाणात हलताना दिसेल, याचा अतिशय योग्य क्षण कॅमेर्‍याने टिपला आहे. अशा अनेक प्रसंगांमध्ये कॅमेर्‍यातील कमाल तोंडातून ‘वा...’ हीच दाद देऊन जाते. त्यामुळे जागतिक स्तरावरील चित्रपटांकडून नवोदित दिग्दर्शक, निर्माते, लेखक यांनी का प्रोत्साहित व्हावे, याचं उत्तर म्हणजे ‘ब्रिंग देम डाऊन’ हा चित्रपट आहे, असं म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. शिवाय, या चित्रपटाचा प्रीमियर यापूर्वी ‘टॉरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2024’मध्ये करण्यात आला होता आणि दि. 7 फेब्रुवारी 2025 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
 
चित्रपट : ब्रिंग देम डाऊन
दिग्दर्शक : क्रिस्थोफर एण्ड्रज्यूज
कलाकार : क्रिस्थोफर अबोट, बेरी केओघन, पॉल रेडी, एरॉन
रेटिंग :
Powered By Sangraha 9.0